माझ्या मते साधारणतः १९९४ किंवा १९९५ पासून भारतीय शिक्षित मुलं परदेशी जाऊ लागली, किंबहुना त्यांच्या कंपन्या त्यांना पाठवू लागल्या. हि सगळी सॉफ्टवेअर तय्यार करणारी मंडळीच होती. ह्या कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेत तरुण आणि बाकी सर्व वयोगटातील मुलं पाठवत असतं कारण कलायन्ट्स तेथील होते, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या गरजा समजणे आवश्यक होते, म्हणजे मग यथायोग्य बदल करून त्यांना हवी तशी सिस्टिम देता येईल. म्हणजे सगळेच खुश. ह्या व्यतिरिक्त अजून एक उद्देश होता इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय मंडळींना पाठवण्याचा. आधी मोठ्या प्रमाणात फक्त मुलं पाठवली जायची, नंतर मुलींनी पण नंबर लावले आणि जिंकल्या देखील. तो उद्देश असा होता कि तिथली संस्कृती, किंवा खूप सुंदर गोष्टी आत्मसात करून भारतात रुजवणं, मग त्या सामाजिक असो, वयक्तिक असो नाही तर वैचारिक असो. कुठल्याही थरावर असतो पण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाकडून काही ना काही तरी शिकण्यासारखे नेहेमीच असते. उदाहरणार्थ, अमेरिकेचे म्हटले तर तेथे मला जाणवलं तेवढं च इथे नमूद करते आहे, तेथे दुसऱ्यांचा आदर आहे, शिस्त आहे, स्वच्छता आहे, दुजाभाव किंवा दुय्यम वागणूक नाही मुलं आणि मुलींमधे, त्यामुळे घरचे सगळेच सगळीच कामे नेटाने करतातच. त्यांना तारीफ करणं मस्त जमतं. प्रत्येक काम तेथे महत्वाचे आहे, एखादा व्यक्ती स्वकमाईने खातोय हे जास्त महत्वाचे आहे. मुन्ना भाई त्याच्या चित्रपटात म्हणतो तशी जादू कि झप्पी तेथे सर्रास दिली जाते. रस्त्यावर एखादी व्यक्ती जर रस्ता ओलांडत असेल, मग कुठल्याही वयाची असो, तेथे हॉर्न वाजवून भंडावून सोडत नाहीत चारी दिशांनी पायी चालणाऱ्याला.
मुंबईची वेस ओलांडली कि ताबडतोब म्हणजे क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण जग हिंडलेली व्यक्ती टिपिकल भारतीय, मध्यम वर्गीयांसारखी कशी काय वागू शकते ह्याचं महद आश्चर्य वाटतं मला. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, कुठल्याही थराला काहीच कसा बदल होत नाही, अनेक वर्ष तिथल्याच लोकांबरोबर काम करून सुद्धा? किती तो दुटप्पी पणा. मला ह्या वरून भारतीय मध्यम वर्गीय सासवा आठवल्या ज्यांना फक्त हवं तेवढंच ऐकू येतं हवं तेव्हाच. कशासाठी इतके चेहेरे घेऊन / बाळगून फिरायचं? काय मिळतं हे सगळं करून? बरं फक्त कामासाठी नाही तर फिरायला म्हणून किंवा इतर काही कारणांनी पण खूप जणं जाऊन आली आहेत अनेक देशात, ह्या २०२४ साला पर्यंत. मग देश पातळीवर तर सोडाच साधा घर किंवा समाज पातळीवर पण यत्किंचित बदल नाही हो. जैसे थे. तेथे जाऊनच शिकता येतं का? तर नाही. इतके सिनेमे बघितले जातात त्या देशात तय्यार केलेले, वेब सिरीज आहेत, व्हिडीओ आहेत, तरी देखील बदल शून्य. नको ते बरोबर उचलले जातेच, मग त्याच बरोबरीने चांगले का नाही? आणि तरी देखील स्वतःला सुधारक म्हणून मिरवतात, मी कित्ती मोकळा आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे ह्याचेच पाढे सतत. उपवाद आहेत, पण नगण्य आणि अदृश्य स्वरूपात, सहज नजरेस पडत नाहीच. १९९५-२०२४ म्हणजे जवळपास ३० वर्षांचा काळ गेला, सरला पण स्थितीत सुधारणा नाहीच. आज पासून जमल्यास इतरांच्यात नाक खुपसणे सोडा, सर्वांनां आदर देऊन तर बघा, घरची कामे व्यायाम म्हणून करून बघा स्वतः, हॉर्न न वाजवता थोडेसे आधी घरून निघून बघा जमतंय का (इतकी वर्ष मी चारचाकी चालवते आहे न हॉर्न वाजवता भारतीय रस्त्यांवर, भारतीय चालकांमधे), रस्त्यावर घाण करू नका आणि इतर असे अनेक मुद्दे आहेत. क्षमस्व, मी फक्त माझ्या डोक्यात आलेले विचार मांडले आहेत, सळसळत मला जेव्हा मी हे असे धेडगुजरे लोक बघते. असो. "तबला हि माझा आणि डग्गा सुद्धा".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा