रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

पेचप्रसंग

मला सहसा का कुणास ठाऊक पण प्रश्न पडत नाहीत, किंवा पेचात अडकत नाही पण आज तसं झालयं खरं. आज माझा वाहन चालक सकाळी सकाळी मला कळवतो कि तो आजारी आहे. पर्याय हाच होता कि भाड्याची मोटारगाडी शोधायची. आज माझं अहो भाग्य कि मला ती ताबडतोब मिळाली देखील. आणि मी व्यवस्थित कचेरीत पोचले देखील. आता वेळ आहे ती त्या अभिरुची मापन अक्का गूण द्यायची. रेटिंग काय द्यावं हा भलामोठ्ठा प्रश्न उभा ठाकला आहे माझ्या पुढ्यात. वेळेवर गाडी मिळाली, त्याने शांतपणे कचेरीला सोडलं हे महत्वाचं कारण माझं ऑफीसा शहराबाहेर असल्यामुळे बरेचसे ड्राईव्हर्स राईड कॅन्सल करतात, यायला बघत नाहीत काही कारणास्तव. पण हा आला गपगुमान. पण गाडी इतक्या भयानक परिस्थतीत होती, अस्वच्छ आणि डबडाच जणू. कधीही म्हणजे कधीही त्याला फडकं दाखवलं नव्हतचं जणू. बरं झालं आज ढगात अतिशय अप्रतिम रंगरंगोटी करणं सुरु होतं, उंचचउंच झाडं आमच्या गाडी सोबत अक्षरशः पळत होती. उंच झाडांवर आणि डोंगरांवर धुकं होतं, विलोभनीय असं दृश्य होतं. प्रत्येक डोंगर सुरेख हिरव्या रंगांच्या छटांनी नटले होते. गगनचुंबी इमारती जास्त सुरेख दिसत होत्या, बऱ्याच नवीन इमारती आकार घेत आहेत ते दृश्य देखील बघण्यालायक होतं आणि त्यात भरीसभर म्हणजे आपल्या भारताची पुढली पिढी पण संपूर्ण रस्त्यात आणि सौंदर्यात भर घालत होती, त्यांच्या पोशाखांनी, वैविध्य दप्तरानी आणि इतर बऱ्याच पद्धतीने. प्रवास झाला, वेळ निघून गेली पण मग गूण देणं राहिलं आहे. द्यावे का ना द्यावे? दिले तर किती? लिहावं का अस्वच्छते बद्दल, समजेल का त्या माणसाला का त्याची परिस्थिती अशी काही आहे कि त्याला सातत्याने गाडी चालवावी लागते आहे म्हणून तो साफसफाई करू शकत नाही? आणि मी कमी गूण दिले तर त्याच्या धंद्यावर परिणाम होईल? प्रश्नाचं भज झालयं नुसतं डोक्यात. असो. हि अनुकथा लिहून झाल्यावर उमगेल तर ठिक नाहीतर सोडून देणं जास्त योग्य. तो आणि त्याची गाडी, बघून घेतील. मी वेळेत / वेळेआधी पोचले हे महत्वाचं. किती जणांना आणि काय काय शिकवायचं नाही का?  

आणि हो एक महत्वाचं लिहायचं राहूनचं गेलं कि, असं ऐकिवात आहे कि जर मी त्या गाडी ला, एकंदरीत प्रवास किंवा राईड ला कमी गूण दिले तर म्हणे ह्या पुढे मला हवी तेव्हा भाड्याची गाडी मिळणार नाही / मिळण्यास अडचण होईल. आता हे काय नवीन? म्हणजे मग करायचं तरी काय? मौनं सर्वार्थसाधनम्॥


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...