गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

उत्साहवर्धक

असं असंख्य वेळा माझ्या कानावर पडलं आहे, वाचनात आलं आहे, स्वानुभव तर आहेच आहे आणि अर्थात तथ्य आहे असं वाटतं देखील. प्रत्येक लेखात बहुतांशी हेच नमूद केलं आहे कि दिवसातून दोनदा केस विंसरले पाहिजेत, अर्थात भारतीय प्रथे प्रमाणे. केस विंसरण्याचे प्रचंड, आभाळाएवढे किंबहुना अगणित फायदे आहेतच. उत्साहवर्धक वाटतं, चैतन्यशील, ताजेतवाने, अगदी फुलपाखरू झाल्यासारखे ई. वाटते. अजूनही असंख्य प्रकार असतील जाणिवांचे पण वेगळाची भावना प्रगट होते, प्रत्येक वेळी, वेळोवेळी, अर्थात प्रेमाने, वेळ देऊन कृती केली तर, संवाद साधला तर, कृतज्ञ होऊन कंगवा केला तर, देखरेख केली तर, नेहेमीच, मग त्या केसांची उंची, लांबी, खोली, दाटपणा कसा हि असो. प्रत्येकाला जमेल, रुचेल, पचेल आणि भावेल तसे, पण काळजी घेणं, सांभाळणं अत्यावश्यक आहेच. असं काहीसं ऐकतच मी लहानाची मोठी झाले. सातत्याने सर्वत्र हेच दृश्य होतं आणि गरीब / श्रीमंत, लहान / थोर सगळेच ह्यात सहभागी होते, किंबहुना हा एक दररोजच्या रोजनिशीचा अविभाज्य घटक आहे, जो वगळू शकत नाहीच.

अर्धशतकी वाटचाल करतांना अचानक माझ्या समोर खूप सुंदर नावीन्याने नटलेले दृश्य उभे ठाकले, एक नाही, दोन नाही पण चार जणांच्या स्वरूपात. मी अवाकच झाले, नि:शब्द जशी. मी आधी एक जण बघितला ज्याचे केस उत्कृष्ट, अद्वितीय, लई भारी आणि जगावेगळे असे आहेत. मी खूपदा फक्त बघितले पण एक दिवस न राहवून विचारणा केलीच. माहिती अशी मिळाली कि अगदी जन्मापासून मिळालेली हि भेट आहे, प्रचंड कुरळे, म्हणजे हाईट आहे, कुठल्याही मशीनने होऊच शकत नाहीत इतके. त्याच्या वडिलांचे देखील होते म्हणे असे. मग साहजिकच माझा पुढील प्रश्न: मग ह्या सर्वोत्कृष्ट भेटीची देखभाल? काही शब्द माझ्या ओठांवरच विरले, कारण त्याने उत्साहाने मला उत्तर द्यायला सुरवात केली कि मी काहीच करत नाही, कंगवा पण नाहीच, कधीच, लावतच नाही, हा, अगदीच वाटलं तर कधीतरी कापतो, क्वचितच. ह्या नंतर अजून एक, दोन, तीन जणांनी तेच / तशीच उत्तरे दिली. अर्थात फक्त एकालाच ते शोभत होतं, बाकींनी काही तरी खास करणं आवश्यक होतं माझ्यामते. असो. मला हे कदापि म्हणायचं नाही कि पचपच तेल लावा, घट्ट बांधा, अगदी बारीक कापा ई. मुळीच नाही पण अहो कंगवा करणं हे गरजेचं आहेच. फक्त केसांकरता नाही तर त्या खालच्या कातडीकरता, रक्ताभिसरणाकरता, आणि बाकी वैज्ञानिक कारणांकरता, रोजनिशीतला भाग म्हणून तरी. मला फार म्हणजे फारच मोठ्ठा धक्का बसला. कंगवा केला नाही तर कितपत आयुष्य राहील त्या डोक्यावरच्या टोपलीचं? मला काहीही घेणं देणं नाही, केस त्याचे, निर्णय पण त्याचे, तरी का कुणास ठाऊक मला जरासं अस्वस्थ व्हायला झालं आणि हे लिहिलं गेलं. त्या केसांचं सौंदर्य टिकण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी आणि त्याला सजीव ठेवण्यासाठी कदाचित असंख्य, वैविध्य उपयुक्त अवजारं उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून बघावा, सल्ला घ्यावा, काळजीपूर्वक कंगवा करावा, नाही का? अर्थात फक्त कंगवाच करण्याने उत्साहवर्धक वाटतं असं नाही, अजून बरेच तरणोपाय आहेत, पण डोकं चालणं जास्त उपयुक्त नाही का? बघा, डोक्याला सुद्धा चालण्याची उपाधी दिली गेली आहे. अर्थात ज्याची त्याची मालमत्ता ज्याने त्याने हवी तशी सांभाळावी. त्या डोक्यावरच्या अनोख्या सुरेख घरट्याने मला चार शब्द मांडण्याची संधी दिली आणि मला उत्साहवर्धक झाल्याची जाणीव झाली. धन्यवाद.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...