शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

काळजीच्या पल्याड


सध्या मी घरची शेफ आहे. कारण माझी मदतनीस फारच मस्त आहे. अगदी वेगाने सगळं मला हवं ते, हवं तस्स मस्त चिरून देते, वाटण लागलं तर करून देते आणि इतर काही तय्यारी जशी लागेल तशी करते. त्यामुळे मग दोघींचं काम सोप्पं होतं. तिला हातभार लागतो, तिच्यावरच सगळं पडत नाही आणि मला पण मस्त मज्जा येते, एक वेगळे समाधान मिळते, दोघींच्या गप्पा पण होतात, अनेकदा हास्य विनोद पण होतात. तर अशी हि, मला सवय झालेली मदतनीस अचानक म्हणाली कि मला गावाला जायचे आहे, एक नाही दोन नाही तब्बल ११-१२ दिवस. माझ्या पायाखालची जमीन हादरलीच. मला एकटीला चार वेळेचा स्वयंपाक अशक्यच आहे. सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळचे खाणे आणि रात्रीचे जेवण पुन्हा, दोनदा चहा, उन्हाळा म्हणून शीतपेय, फळं ई. काही विचारू नका. तिची मदत मला फारच मोलाची आहे. त्यामुळे दोन्ही वेळेला मला जमतं सगळं करायला. हि सुट्टीवर जाणार म्हणजे खूप मोठा यक्ष प्रश्न होता मला. त्या मला काम त्याच दरम्यान, त्यामुळे बाहेर जाऊन काम करायचं आणि शिवाय घरचं, त्यात मुलीची परीक्षा. त्यामुळे ती एक माझी मोट्ठी सगळ्या बाबतीत धावून येणारी आहे. आता ते देखील शक्य नाही. खूप म्हणजे खूप दमले विचार करून. आणि मग सरते शेवटी एक दिवस हातात घ्यायचा ठरवला. रात्रीचे जेवण घरगुती बाहेरून आणायचे मी निश्चित केले. आणि सहज माझ्या कडे काम करणाऱ्या ताईला विचारले तू किती वाजता निघणार आहेस, कोणत्या दिवशी नक्की येणार आहेस? तर म्हणते कशी, नीट ऐका, "आम्ही फक्त दोन दिवसा करताच जाणार आहोत. आमच्या एका नातेवाईकांची सून बाळंत झाली, तिला मुलगी झाली, त्यामुळे सव्वा महिना तरी काहीच पूजा करता येणार नाही. पुढील महिन्यात बघू काय ठरतंय ते." मी नाचू, का गाऊ, का उड्या मारू, का ओरडू, का शतशः "त्याचे" धन्यवाद मानू हे समजलंच नाही मला काही क्षण. मला माझ्याच कानांवर विश्वास नाही बसला. म्हणजे माझी "त्याला" कित्ती पराकोटीची काळजी आहे बघा. त्याने मला अडचण होऊ नये म्हणून एका बाळाचा जन्म ठरवला, तो ह्याच कालावधीत झाला, आणि ह्या मंडळींनी ठरवलेला कार्यक्रम बारगळला किंवा पुढे ढकलला गेला. पुढील महिन्यात ती गेली तर मला चालणार आहे, कारण सासरे तेव्हा नसतील ज्यांना खूप साग्रसंगीत सगळं लागतं सतत आणि हे पण गावाला जाणार आहेत, त्यामुळे आम्ही दोघी मस्त मज्जा करू उलट. माझ्या सारख्या एका कुठल्यातरी कोपऱ्यात राहणाऱ्या छोट्या व्यक्तीचे तो जाणतो, मदतीचा हात देतो न विचारात ह्याला काय म्हणावे? बरं मी ऋषी मुनींसारखी त्याची आराधना पण नाही करत हो, फक्त जमेल तशी पूजा, ध्यान आणि दररोजचे नेमलेले कार्य, एवढेच. तरी देखील त्याची मदत मिळणं हे अप्रूपच आहे माझ्या साठी. असेच आशीर्वाद, अशीच कृपा आणि असेच लक्ष सदोदित राहू दे हि विनंती. मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्या कडे "त्याच्या" ह्या कृतीकरता शब्दच नाहीत. असा हा माझा पाठीराखा, दणकट सखा आणि काय म्हणू. प्रत्येक वेळी श्रद्धा अजून दृढ होते अश्या प्रसंगामुळे. कित्ती महिन्यांपासून कष्ट घेतलेत त्याने माझ्यासाठी, माझ्या सुखसोयीसाठी, माझ्यावर ताण येऊ नये ह्या साठी. म्हणजे तो देखील जाणतो माझ्या पायांची स्थिती. अजून काय हवं?  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...