सोमवार, १३ एप्रिल, २०२६

२४२५: प्रश्नांची सरबत्ती


मी गाडीतून उतरले आणि हॉटेल मध्ये शिरले तसा माझ्या चार डोळयांना मोठा खजिना दिसला. मग काय मी दंग. मराठी आणि इंग्रजी तले कित्तीतरी वर्तमानपत्र सजवून ठेवले होते, अगदी जणू काही माझ्याच साठी.  मग काय विचारात मी अगदी तुटून पडले त्यावर. घडी सुद्धा उघडली नव्हती त्या वर्तमानपत्रांची मला ती एक मोठी पर्वणी होती. त्या बातम्यांचा, सुगंधाचा अनुभव घेता घेता माझी नजर एका गोंडस पिल्लुकडे गेली. ती इतकी गोड होती कि ज्याचं नाव ते. कोणालाही वाटेल तिच्याशी दोस्ती करावी. असेल सिनियर केजी मधे वगैरे. व्यवस्थित प्रसंगाला साजेसे कपडे, आपापली खेळत, आईला त्रास न देता बसली होती. मग मला काही राहवलं गेलं नाही आणि मी तिला माझं नाव सांगितलं तर इतकी चमक तिच्या डोळ्यात, मोठं हसू गालांवर आणि मग जो सिलसिला सुरु झाला ते थेट कार्यक्रम संपेस्तोवर सुरूच राहिला.  "माझ्या टीचर चे नाव पण प्रीती आहे, माहिती आहे का?", मी म्हटलं अगं मी पण एक टीचर च आहे, ठाऊक आहे का? म्हणजे सगळ्या प्रीती टीचर असतात? तसं नाही, वेगवेगळी नावं असतात टीचर ची. वर्ग सांगून झाला, शाळेचे नाव सांगून झाले, मी कुठल्या शाळेत आहे हे विचारून झालं, अंगठ्या मला देऊन झाल्या, माझ्या हातात / बोटात घालण्याचा प्रयत्न झाला, आणि इतर अनेक प्रश्न विचारून झाले. 

मग मॅडम ना लागली भूक. आईने तय्यारी ठेवलीच होती. एक मस्त सॅन्डविच काढून आईने हातात दिले, तर तिने काय करावे, मला आणून दिले आणि आग्रह केला कि तू खा. मी नाही म्हटल्यावर प्रश्न विचारता विचारता मग ते संपवलं. आम्ही सगळे आत गेलो, बारश्याची जय्यत तय्यारी झाली होती. पाळणा सजवलेला होता, आजूबाजूला पण उत्कृष्ट सजावट होती, चौरंग होता, वरवंटा ठेवला होता, बर्फी होती, अटींची तय्यारी, रुखवत ई. झालं नवीन प्रश्न सुरु. वरवंटा का? त्याला सजवलं का आहे? तो आधी का ठेवायचा पाळण्यात? रुखवत म्हणजे काय? जेव्हा रुखवत नेऊन दाखवलं, सगळं समजावलं तर ह्याला रुखवत च का म्हणतात? मी जशी जशी एका एका प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न (अथक) करत होते तसे तसे नवनवीन पण योग्य प्रश्न उपस्थित केले जात होते, मस्त मराठीत संवाद साधला जात होता.  शेवटी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं त्या म्हणाल्या, प्रीती तुझ्या PhD चा कस लागतोय आणि काही त्याचा उपयोग नाही असं वाटतंय ना? इतकं बारीक निरीक्षण केलं तिने त्या रुखवतातल्या मांडलेल्या / तय्यार केलेल्या वस्तूंचं कि ज्याचं नाव ते आणि प्रत्येक निरीक्षणा सोबत ५-६ प्रश्न मला. खूप खूप कौतुक वाटलं तिचं, तिच्या आईचं. कुठंही आगाऊ प्रश्न तिला न पडले ना तिने विचारले. कसे काय इतकं प्रश्न सुचले तिला कोणास ठाऊक. मग मी रुखवताचे फोटो काढले आणि मोबाईल वापरून पाठवले मुलांना, तर हि मॅडम म्हणते कशी "असे फक्त फोटो काढून पाठवायचे नाही, ते पहिल्यांदा एडिट करायचे, मी सांगू का कसे करायचे ते". बाप रे. इतक्या लहान वयात हे सगळं. कमाल आहे. बाळ कधी येणार? मग काय काय करणार? असं सुरु असतांनाच म्हणते कशी आता पहा आत्याला मारणार सगळे. म्हटलं का? "अहो बारशाच्या दिवशी मारतात आत्याला, ती नाव ठेवते ना बाळाचं....." असं सगळं सुरु झालं. रुखवतात बाळकृष्ण, पाळणा, आणि सजावट केली होती. त्यावरून तर मी दमले पण तिचे प्रश्न काही थांबले नाहीत. 

इतका सुंदर दिवस जाईल माझा हे माझ्या ध्यानीमनी पण नव्हते. काय होती ती पिल्लू, कहरच (चांगल्या अर्थाने). अगदी नीट बसणं, बोलणं, शिस्त, खाणं, सांडलवंड अजिबात नाही, हट्ट नाही, रडणं नाही, जिद्द नाही.

बाळ येत नव्हता लवकर म्हणून मॅडम नी  मोबाईल आणला मला दाखवायला. यूट्यूब वर चित्रात रंग भरण्याचे व्हिडीओ होते, प्रत्येक रंगाचे नाव, तो का भरतात, ते फळ कुठलं आहे, पण कुठल्या रंगांचे असते, आणि इतर अनेक बारकावे तिने मला सांगितले. तिची तब्बेत, तिचा ऑरा, एकंदरीत उठबस वेगळीच होती. मी चौकशी नक्कीच करणार आहे पण माझ्या अंदाजानुसार बहुतांशी तिची आई नोकरी करत नसावी आणि प्रचंड उत्साहाने पिल्लुचं सगळं मनापासून करतं असावी हे स्पष्ट दिसतं होतंच. आमच्या दोघींचाच आवाज होता त्या छोट्याश्या हॉल मध्ये. सर्वांची जळवाजुळावं सुरु होती, आणि सर्वांचं लक्ष फक्त आमच्या दोघींकडे होतं, मस्त जमली होती जोडी आमची. खूप वेगळी होती ती. तिची उत्सुकता अशीच कायम टिकून राहो. तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळो, तिला उत्तरं देणारी माणसे मिळोत हि सदिच्छा. मला तील ती मोठी व्हायच्या आत पुन्हा अनेकदा भेटायची इच्छा आहे, बघू कसं जमतंय ते. एक पर्वणी ठरली तिची भेट म्हणजे. 

पुन्हा अशीच एखादी पिल्लू मला प्रश्न विचारायच्या आत माझी तय्यारी करते. कारण उत्तरं ठाऊक असतात पण साडेतीन च्या वयाला समजेल अशी मांडणं हे आव्हानात्मक आहे माझ्या साठी. आत्याच्या पाठीवर का थाप देतात सगळे? रुखवत का म्हणतात? वरवंटाचं का? पाळणा का? मला कधीच असा गृहपाठ आत्तापर्यंत कोणीच दिला नव्हता हो. देवा. खूप खूप मज्जा आली, आणि येते आहे. वाट बघा, लवकरच मी एक एक प्रश्नांची उत्तरे शोधते आणि इथे पाठवते तुम्हा सर्वांसाठी. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...