शनिवार, २७ जानेवारी, २०२४

निर्माल्य


आपल्या भारतात आणि मी जगले त्या महाराष्ट्र राज्यात संपूर्ण वर्षभर वैविध्य सण साजरे होतात, घर घरात पूजा केल्या जायच्या आणि एक धार्मिक वातावरण सर्वत्र सारखं असायचं. त्या वेळी ते सहज शक्य होतं कारण बंगले होते, दारात पूजेला लागणारी फुलं-पानं होती, आई हे सर्व करण्याकरता घरी असायची बहुतांशी, ई. पूजेनंतर निर्माण होणारं निर्माल्य घरीच, अंगणात, झाडांना वगैरे घालून जिरवलं जायचं. आणि अर्थात सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळी देवाला वाहण्याच्या फुलांना सुगंध होता, ते नैसर्गिक स्वरूपात वावरत होते. आताचे संपूर्ण दृश्य अगदीच वेगळे आहे. माझ्या पिढी पासूनच सगळ्याच घराबाहेर पडल्या. प्रत्येक सणाला सुट्टी अशक्य. त्यामुळे एकतर थोडक्यात पूजा किंवा नो पूजा अशी परिस्थिती. पुढील पिढीला काही दर्शवू शकलो नाही. इच्छा नव्हती अशातला भाग नाही पण घडू शकले नाहीच. शिवाय सर्वत्र एकसारखे वातावरण. प्रत्येक घरची मुलगी घराबाहेर कामाला. नवऱ्याला, सासरकडच्यांना, मुलांना एक खास विषय "आई काय करते, कुठल्या हुद्द्यावर काम करते". सँडविच पिढी असल्यामुळे कामाला वाघ, ती ओढ पराकोटीची. त्यामुळे पूजा ह्या गुरुजींनी करायच्या, आई कमावतीच हवी आणि पाश्चात्य माहितीची भरमाड ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे सध्याच्या पिढीला मानसपूजेला, ऍक्टिव्ह मेडिटेशन ला जास्त प्राधान्य, फारच प्रॅक्टिकल अप्रोच. आणि मी तो मानते, त्यांच्या विचारांचा सन्मान करते. 


अशी मी, किंवा माझ्या पिढीतल्या मुली आणि आपण सर्वांनी एक फारच महत्वपूर्ण बाब लक्षात ठेवली पाहिजे आणि करायचं तर संपूर्ण व्यवस्थित, अर्धवट नाही. सध्याच्या घाई गडबडीचा काळात पूजा तर करायच्या आणि निर्माल्य रस्त्यावर, कचऱ्यात किंवा नदीत / कुठल्यातरी पाण्यात फेकायचं, हे मूलतः चुकीचे आहे, अपमानास्पद आहे माझ्या दृष्टीने. एक तर पूजा करा आणि व्यवस्थित निर्माल्य जिरवा, वेळ काढून त्याचा सदुपयोग करा, नाहीतर पुजेचा घोळ नकोच. प्रदूषण, अपघात आणि अपमान टाळा. घरच्या सर्वांनी एक सुसंस्कृत नागरिक म्हणून पर्यावरणाची जबाबदारी घ्या. घरी पूजा व्हावी असं वाटत असेल तर त्याला पूर्णत्व द्या.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...