सर्वश्रुत असलेलं आणि फारच आवडीचं असं योगासन म्हणजे सर्वांगासन. उगाच नाही त्याला सर्वांगासन म्हणत. कुठल्या तरी ऋषी मुनींनी, योग्याने ते विचारपूर्वक नाव ठेवलं असणार. त्या आसनाने सर्वांगाला संपूर्ण व्यायाम होत असणार, लाभदायी ठरत असणार म्हणूनच. हि झाली जमेची एक बाजू. माझ्या मते योग मध्ये व्यायाम करणाऱ्याला देखील ते सर्वांगासन होतंय हे जाणवलं पाहिजे सहज आणि नेहेमीच. हा प्रत्यय जो देतो ते खरं सर्वांगासन, अर्थात फक्त माझ्या दृष्टिकोनातून. म्हणजे मी जो काही छोटा सा योग करण्याचा दररोज प्रयत्न करते त्यातून अनुभवलेलं.
मी नागपूरला असतांना माझ्या एका काकूंचे योगाचे घरासमोर वर्ग होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी योगशी तेथे ओळख झाली. मग अजून तीन जणींनी मला योगा शिकवला. आमच्या कचेरीत मी योग चॅम्पियन झाले एक वर्षी. मग ऑनलाईन पण काही वर्ग अटेंड केले, प्रत्येक वेळी काही ना काही नव्याने शिकता आले, अनुभवता आले, आत्मसात करता आले. त्यात एका कुठल्यातरी वेळी एका आसनाची गाठ भेट झाली. त्यावेळी फक्त शारीरिक पद्धतीने ते केले. त्या नंतर अनेक वेळा, अनेक वर्ष त्याचा अनुभव घेतला. पण इतक्यातच ते आसन करते वेळी आणि झाल्यावर प्रत्येक खेपेला परमानंद अनुभवालाच. तो इतक्या उच्च कोटींचा होता कि शब्दात मांडणे अतिशय अवघड. प्रत्येक आसनाचा अर्थ, ते केल्याने मिळणारे फायदे, त्याची करण्याची पद्धत इतकं सगळं बऱ्याच वर्षांपासून अभ्यासात आहे माझ्या. आणि आताशा मी न चुकता हे आसन सरते शेवटी करते, त्यानंतर कित्ती तरी वेळ मी त्या वेगळ्याच विश्वात मी रमते. अत्यंत सोप्पं पण रामबाण इलाज जसे माझ्यासाठी. सुखासनात बसायचं, दोन्ही हात श्वास घेऊन वर न्यायचे, उश्वास सोडत मग हात पुढे आणि जमिनीवर डोकं टेकवण्याचा प्रयत्न करायचा पृष्ठभाग वर न करता / हालू न देता. त्यानंतर त्या हातांना चालवत डावी आणि उजवी कडे न्यायचे आणि पुन्हा डोके जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. काही वेळा सर्व केला कि सहज जमतं. हे सगळं करतांना नेहेमीसारखा संथ गतीने श्वास सुरु ठेवायचा. मधे, उजवी आणि डावी बाजू असे चार - सहा फेरे मात्र आवश्यक आहेत. ह्या आसनात असतांना पोटाकडे, मांड्यांकडे आणि पाठीला बसणार ताण अनुभवायचा. जेव्हा आपण वर येतो आसनाचे फेरे संपल्यावर, हात खाली घेतो तेव्हा डोळे उघडताच नाहीत. संपूर्ण शरीराला सुख लाभले आहे, सुंदर पद्धतीने ताण अनुभवता आला आहे आणि जणू सर्वांगासन झाले आहे ह्याची प्रचिती येतेच. करो तो जानो.
हे आसन मूळच्या सर्वांग आसनासारखे अत्यंत कठीण नाही. अगदी योगाची सुरवात असेल तरी देखील करता येण्यासारखे. ह्या शिवाय चयापचय क्रिया सांभाळण्यास मदत करणारे, लवचिकता सांभाळणारे आणि वृधींगत करणारे असे. मला पहिल्यांदाच हे आसन आवडण्याचे एका महत्वाचे कारण म्हणजे योगा शिक्षकाने शिकवतांना आम्हाला सांगितले होते कि श्वासोश्वास सुरु ठेवून, वाक कायम ठेऊन हाताने उजव्या आणि डाव्या बाजूला चालावे. अहाहा च. हाताने चालावे, क्या बात है. मज्जा आली ऐकूनच आणि मग करून. माझ्या साठी तर हे आसन म्हणजे सर्वांगासनाच्या पुढले असे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा