अगदी काही दिवसांची होती ती, दुपट्यात गुंडाळलेली, भन्नाट गोरी पिल्लू. तेव्हा जर कधी गरज पडली तर मी असायचे, कधी खेळवायला, कधी खाऊ घालायला, कधी आईचं / घरचं साफ सफाईचं काम होईस्तोपर्यंत वगैरे. नंतर मग हा क्लास कुठे लावायचा, हे कुठे मस्त मिळतं अशी छोटीमोठी बातचीत होतं असे तिच्या सोबत किंवा बहुतांशी तिच्या आई बरोबर.
आज तब्बल १६ वर्षांनी तिलाच मी साडी नेसवली कारण आज तिचा दहावीचा निरोप समारंभ आहे शाळेत. गेले कित्येक दिवस तिच्या आईची लगबग सुरु होती, आमच्या गप्पा देखील होतं होत्या. साडी कुठून घ्यायची, मेकअप - केस कुठून कसे कधी करायचे ई. मग एकदाची साडी तय्यार झाली, आणि नेसली पण गेली. क्या बात है? इतकी गोंडस दिसत होती म्हणून सांगते ती, अनेकदा दृष्ट काढली तरी कमीच आहे. तीच जी माझ्या हातात मावत होती, कडेवर बसत होती, मी सांगितलेल्या गोष्टी ऐकत होती,मी दाखवलेले पक्षी आनंदाने बघत होती, ती आज साडीत, ह्याची देही ह्याची डोळा, खूप भाग्यवान समजते मी स्वतःला. शेजारी इतके मनापासून जवळ असतील हे जाणवलं. मी मोठी झाले आहे हे जाणवलं नाही, असं वाटलं ती तर काल पिल्लू होती, आणि आज बघा एक व्यक्तिमत्व घडतंय तिच्या रूपात. एक नावीन्याने-भरपूर पुण्याची राणी, झाशीची नाही हो. काय काय बोलू आणि काय नाही असं झालयं मला आज. अगदीच आमने सामने घरं, त्यात दोन्ही घरात जुळी त्यामुळे एक वेगळंच नातं, ते स्नेहबंध जुळले गेलेत. खूपच पिटुकली बाब आहे पण मला भावली खूप मनापासून. म्हणून हा पंक्ती प्रपंच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा