बुधवार, ३० मार्च, २०२२

थांब ना रे तू

आज पुन्हा एकदा हे बोल, आर्त स्वर कानावर पडले आणि माहित नाही काय झालं. असं का होतं? प्रत्येक दिवशी का? एखाद वेळी आठवण येणं साहजिक आहे, पण मला अजूनही सावरता का येत नाही आहे. त्या घटनेला देखील आज १३ वर्ष झाली, मी स्वतः अर्ध शतक गाठलं, आणि मला हे जगजाहीर सत्य माहित आहे कि आलेला प्रत्येक व्यक्ती एक दिवस दूर जाणार, मग का. हि अपराधी भावना आहे फक्त? का अजून काही? मला उत्तर नाही सापडत आहे. मला हे देखील माहित आहे कि आता वाईट वाटून, डोळ्यात पाणी आणून काय फायदा, जेव्हा वेळ होती तेव्हा का नाही काही सुचलं, का मी स्वतःला घर-ऑफिस ह्या मधेच गुरफटून घेतलं आणि बाकी दुर्लक्षिलं गेलं. माझ्या कडून काहीही करून घेता का गेलात इतक्या दूर कि त्या ठिकाणाचा थांग पत्ता ना तुमचा ठावठिकाणा. अपार कष्ट घेतले माझ्या साठी, अगदी लहानपणी पासून, दररोज, चुकता सातत्याने मोटिव्हेट केलं, पाठीवर थाप आणि तुमची सदोदित साथ दिलीत, सल्ले दिले, मी काहीतरी वाकडं-हेकडं बिनाचविच केलेलं सगळं कौतुकाने खाल्लं विना तक्रार, सहनशक्तीची तर कमालच होती तुमच्या, अपेक्षाविरहित राहणं शिकवलंत पण मी नाही शिकले, दुर्दैव माझं. माझ्या मनाची सल माझ्या सोबतच संपणार बहुतेक. का का गेलात इतक्या लवकर आणि अश्या ठिकाणी जेथून परतावा नाहीच. या ना एकदा, काही दिवसांसाठी, माझ्या साठी प्लीज, पट्टाकिनी, ह्या क्षणी, आत्ता. लहानपणी माझे सगळे "आत्ताच्या आत्ता पाहिजे ..." हट्ट पुरवले, मग हा पण पुरवा बाबा. चातकासारखी वाट बघते आहे.    

प्रियांका चोप्रा ह्यांच्या सुमधुर आवाजातलं, थेट हृदयाला भिडणार असं गीत व्हेंटिलेटर ह्या चित्रपटातलं, ऐका आवर्जून. 

https://www.youtube.com/watch?v=KIKWHobV3ZE

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...