शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

सगळ्यात ताज

एक आटपाट नगर आहे त्यात एक चौकोनी पण मोठं कुटुंब, तीन पिढ्या गुण्यागोविंदाने नांदतात एकत्र. त्यात काका काकू, त्यांची दोन मुलं, एक सुनबाई आणि आज्जेसासू देखील. त्यातल्या काकांनी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन, अगदी उच्च पदापर्यंत पोचेस्तोवर नोकरी केली, मानाने. अतिशय वेगळ्या पद्धतीचं, समाजपयोगी काम सातत्याने केलं, राबले आणि आव्हान पेलत संचालक पदावरून निवृत्ती घेतली. काल तो सेवानिवृत्ती चा कार्यक्रम होता, मोठ्या प्रमाणावर उभारला होता, कारण त्यांचं व्यक्तिमत्व, पद, प्रचंड केलेले काम आणि ओळखी ई. ह्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात त्यांच्या विषयी चार शब्द बोलण्याची सुवर्णसंधी फक्त एका व्यक्तीला लाभली. ती व्यक्ती कोण हा मंडळी विचार करून ठेवा हो.

काकांना सगळ्यात जास्त जर कोणी ओळखत असेल तर ती त्यांची आई, नाही का? मग क्रमाने बोलायचं झालं तर अर्धांगिनी, मुलं आणि सरते शेवटी अगदी नुकती घरात प्रवेश केलेली सून. सुनेला खरं तर काहीच काळ झालेला आहे कारण ती नवखी आहे त्या घरात, आणि शिवाय फक्त ऐकिव माहिती त्यांच्या कार्याची, किंवा संभाषणातून मिळालेली तेवढीच. आणि जरी आपण सध्या २०२२ मधे असलो तरी देखील उच्च मध्यम वर्गीय कुटुंबात सून आणि सासऱ्यांच्या थोडा कमीच संपर्क येतो, फक्त कामापुरता. आणि बघा अश्या सुनेला मनोगत व्यक्त करायला सांगणं, देणं, आणि ते आव्हान यशश्वी रित्या पेलणं, निभावणं म्हणजे शब्दात मांडण्या पलिकडलेच आणि अप्रत्यक्ष तिच्या सर्वगुणसंपन्न होण्याची पावतीच, नाही का. अशी पावती मिळणं म्हणजे अहो भाग्यच, माझ्या दृष्टीने. ते मनोगत ऐकणाऱ्यांना पण कुतूहल नक्कीच वाटलं असेल ह्यात शंका नाहीच. आणि हो हे लिहितांना सहज ध्यानात आलं, त्या काकांच्या प्रत्यक्ष कुटुंबातील इतर सदस्य नाही तरी काकांचे भाऊ, बहिणी, आणि इतर मंडळी पण मोठ्या प्रमाणात असतीलच ना?. तरीही सुनेला हा मान मिळावा हा सर्व स्त्रीवर्गाचा सन्मान आहे आणि तो ह्या कुटुंबाने दिला. अहाहा. सोन्याहून पिवळे.

ह्या प्रसंगाबद्दल मी इतकं भरभरून लिहिते आहे कारण हि काकांची सून म्हणजे माझी एक संशोधन करणारी विद्यार्थिनी आणि सखी देखील. आमचं सहज ह्या बद्दल बोलणं झालं कारण दोन दिवस ती सुट्टी टाकणार होती. आणि हो त्या वरून मला माझा एक छोटासा प्रसंग आठवला, मला पण अचानक एक दिवस, एका क्षणी माझ्या सासऱ्यांच्या ७० / ७५ व्या वाढदिवसादिवशी बोलायला सांगितलं होतं. तय्यारी न करता बोलणं, सासऱ्यांसारख्या कुटुंब प्रमुखाबद्दल बोलणं, सुनेने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे किती कंगोरे टिपलेत ह्याची परीक्षाच जणू, अवघडच असतं, हे तेव्हा समजलं मला.

एकंदरीतच प्रत्येक मुलीला एक निरीक्षण करण्याची, चांगल्या गोष्टी व्यक्तिमत्वातल्या टिपून ठेवण्याची, न सांगता समजण्याची, गोड आणि शिस्तीत बोलण्याची, मोठ्यांशी अदबीने वागण्याची कला असतेच. त्याचमुळे ह्या सुनेची निवड झाली ह्याची खात्री आहे मला, मी ओळखते ना तिला गेली २ वर्ष.

काकांना त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल माझ्याकडून शुभेच्छा, आणि सेवा निवृत्तीपर्यंत इतकी वर्ष सातत्याने ऊर्जेच्या महत्वपूर्ण क्षेत्रात योगदान दिल्यामुळे अभिनंदन. ज्या कुटुंबात सुनेला इतका मानसन्मान मिळतो अश्या सर्वांना मला नक्कीच भेटायला आवडेल लवकरच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...