कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची महत्वाची जबाबदारी म्हणजे दृष्टीपथात असलेलं / नसलेलं काम अचूक व्यक्ती शोधून त्याला सुपूर्त करणे. अर्थात योग्य व्यक्ती त्या कामासाठीच आहे ह्याची खातरजमा करून त्याला / तिला नेमणे. अनेक वर्षांच्या मेहेनतीतून, अनुभवाच्या शिदोरी मुळे हे वरिष्ठांना सहज जमतं. त्यात अजून एक गोम आहे मात्र. ज्याला नेमणार आहे त्याला / तिला किती काम द्यायचं हे देखील ठरवता आलं पाहिजे. ती व्यक्ती किती जुनी कर्मचारी आहे, अनुभव किती आहे, स्वभाव कसा आहे, आधीचं काम कसं पार पाडलंय ई. अनेक गोष्टींवर ते अवलंबून असतं. आता जे नोकरी करणारा वर्ग आहे आणि तो जर माझं हे लिहिलेलं वाक्य वाचत असेल तर म्हणेल कि काम पडलं अंगावर कि निभावता आलंच पाहिजे, नाहीतर सोडा नोकरी किंवा करू नका ई. हो पण तरी देखील मला असं वाटतं कि सर्वतोपरी विचार करून काम सोपवलं जातं. अगदी जसं घरी दररोज कुकर लावणे हो. जेव्हा पासून माझ्या आयुष्यात कुकर नावाचा प्रकार आला आहे तेव्हा पासून मी हेच बघत आले आहे कि कुकरची ठराविक भांडी असतात, एक खाली स्टॅन्ड असतो, ती भांडी एकावर एक लगोरी सारखी व्यवस्थित बसतात आणि त्या प्रत्येक भांड्यात जे शिजायला लावलंय ते ते वेगळं छान शिजून निघत, शिट्या झाल्या कि. अगदीच एखाद्या दिवशी कुकरचं डोकं खराब झालाच तर एकत्र होतं पण फार क्वचित. त्यात देखील कुकर लावणाऱ्याचीच घाई किंवा चूक असू शकते बऱ्याचदा हो. असो.
पण मी ३१ एक वर्षांपूर्वी एका लग्नासाठी दिल्ली ला गेले आणि मला नव्याने समजलं कुकर कसा लावायचा ते. त्यांच्याकडे ४-५ छोटेछोटे कुकर दिसले मला, सांस्कृतिक धक्का होता तो मला. ५ कुकर एका घरी आणि चालू स्थितीत, काय हे? मग समजलं कि डब्बे न वापरता डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी देऊन आमटी, उसळ ई. टाकली जायची. अहो काही वर्षांनी कळत - नकळत माझ्या घरी पण हि परंपरा कधी सुरु झाली हे समजलंच नाही, छे छे, मी ५ कुकर विकत घेतले नाहीत पण थेट फोडणी आणि शिट्या हे अमलात आलं.
पण अहो असं जर प्रत्येक वेळी झालं / केलं तर गडबड होते ना, तो कुकर विचित्र रंगाचा व्हायला लागतो हळू हळू, कारण भारतीय फोडण्या म्हणजे रंग, हळदीचा, तिखटाचा ई. तेल त्यात पुरेश्या प्रमाणात. कुकर बरबटतोच नाही म्हटलं तरी, तसं त्याला पाहायची अजिबात सवय नाही ना मला म्हणून अजून विचित्र वाटत खरं. एकावर एक भांड्यांची लगोरी सुटसुटीत, दिसायला, शिजायला, सांभाळायला उत्तम. प्रवाह पतित होणं देखील आवश्यक आहेच म्हणावं. पण इतकं पण नक्को कि तो कुकर अगदी थोड्याच दिवसांचा पाहुणा ठरेल, नाही का?
वरिष्ठांनी देखील आधी कर्मचाऱ्याला थोडं काम द्यावं, मग लागोरीसारखे एक एक मजले चढवावे, ते मजले नीट चढण्यासाठी खाली स्टॅन्ड = भक्कम आधार देखील द्यावा म्हणजे कुकर सारखेच काम स्वच्छ होते, टिकते आणि नीट होते देखील. एकदम काम टाकलं अंगावर कि पसारा वाढतो आणि ते दृश्य विलोभनीय ठरत नाही मग. काम नेमणे हि कलाच नाही का, कस लागतो अगदी.
एक कुकर आणि त्याचा बदललेला वापर ह्या वरुन मला वरिष्ठ आणि त्यांनी सुपूर्त केलेलं काम ह्या बद्दल समानता सहज दृष्टीपथात पडली.
मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२
काम नेमणे एक कला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा