गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

परिपक्वता / प्रगल्भता

माझ्या समवयस्क तरुण मैत्रिणीसोबत गप्पांचा फड रंगला होता आणि अर्थातच अनेक विषयातला एक विषय जास्त चर्चिला गेला. बहुतांशी सगळ्याच जणी स्थिरस्थावर झाल्या आहेत. मुलं लहान राहिली नाहीत, त्यांची मार्गक्रमणा सुरु झाली आहे,छोटेखानी घर, गाडी, (कदाचित) पुरेशी  साठवलेली गंगाजळी आहे, अर्थातच थोड्याफार प्रमाणात आवश्यकतेनुसार दागदागिने, कपडा लत्ता आहे. ह्या पुढे आनंदी राहणं, ठणठणीत तब्येत सांभाळणं, पोटभर हसणं आणि रोजचे घरचे व्यवहार तेवढे सुरळीत सुरु ठेवण्याचा प्रयन्त इतकंच आहे. वयासोबत येणारी प्रगल्भता पण आली आहे. मोठं होणं म्हणजे कदाचित हळू हळू निरपेक्ष होणंच नाही का? आणि हि निरपेक्षता स्वतःला च कामी येते, आजूबाजूला आणि सर्वत्रच जग फार अप्रतिम, सुंदर आणि सुखावह भासायला लागतंच. मग अश्या वेळी, किंबहुना अश्या योग्य वेळी जर निवृत्तीचा मार्ग अवलंबला तर? हो दर महिन्याला येणारा पगार नक्की थांबेल, पण आवडीचं काही तरी करण्याची संधी मिळेल, नवनवीन मार्ग दृष्टीपथात येतील आणि नव्या दिशेने मार्गक्रमणा करता येईल. नवरा, घरचे किंवा अजून कोणीही ह्यांच्या समोर हात पसरवायची वेळ येणार नाहीच, कारणं अनेक आहेत

१. स्वतः पुरतं लागेल एवढं निश्चित जमा असेल किंवा गुंतवणुकीतून उभं करता येईल कदाचित
२. घरखर्च घरच्या कुटुंबप्रमुखाने उचलावा हि माफक अपेक्षा
३. मुलांच्या शिक्षणाची सोय उच्च मध्यमवर्गीय करून ठेवतात बहुतांशी
४. दागदागिने, कपडे ई. चा वर्षानुवर्षांचा साठा च पुरेसा ठरू शकतो, त्यामुळे नवीन घेण्यासाठी पदर / हात पसरावा लागणार नाहीच, आणि वाटलंच तर योग्यच आहे ना, चुकीचं काहीच नाही
५. हळू हळू खाण्यापिण्याची पण इतकी वैविध्यता अनुभवली असते कि एक तृप्तता निश्चितच येते किंबहुना यायला हवी

आज पर्यंत असंख्य टप्पे गाठले, अशक्य अवघड होते बहुतांशी सगळेच, पण जमलं / जमवलं. मग हा नवीन टप्पा पण पार करू हि अपेक्षा आहे. थोडासा फरक नक्कीच आहे

१. हा टप्पा स्वतःसाठी गाठायचा आहे, किंबहुना घाई नाही
२. वयानुसार आलेली शांतता येईल कामात
३. अनेक वर्षांच्या अनुभवांची शिदोरी आहेच ना पाठीशी
४. आकर्षक डौलदार पद्धतीने स्विकारणं जमेल हार मानवी लागली तरी

चला तर पन्नाशीतल्या सगळ्या कळ्यांनो, "दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे". शांतपणे सारासार विचार करून निर्णय घ्या आणि तो जगा, सहज. थोडीशी अध्यात्मिक / वैचारिक बैठक असली कि पुरे, छान जोड मिळते. अर्थात काहीच अगदी सहज सोप्प नसतंच आयुष्यात, नाही का? त्यामुळे ह्या  निर्णयाची नाव देखील पार होईल ह्यात शंकाच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...