बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

शेवटचा घास

जेवण आणि त्याच्या पौष्टिकते बद्दल खूप काही लिहिलं गेलं आहे आणि अर्थातच ऐकलं / आमलात पण आणलं आहे. त्यातली एक आख्यायिका अशी कि म्हणे फक्त एक घास जेवणाच्या शेवटी दररोज न चुकता गोड खावंच, पण फक्त एक घास, उदाहरणार्थ एक गुलाब जाम, एक चमचा हे किंवा ते गोड बास इतकंच, जास्त नाही, हा नियम.  असो.

नाण्याची दुसरी बाजू, माझी आई नेहेमी सांगायची कि जर एखाद दिवशी पानात गोड असेल तर जेवणाची सुरवात ते गोड खाऊन करावी.

मग सुरवात करावी का शेवट? एक घास, का जरा जास्त का मनसोक्त? असे अनेक प्रश्न आहेतच.

अजून एक पैलू असा आहे कि भारतात काय जगभरात साधारणतः दोन गटाची माणसं असतात, एक गोड खाणारी + आवडणारी आणि दुसरी तिखट भक्त.   माझी गिनती मी दुसऱ्या गटात करते अर्थातच.

तर मी ह्या सगळ्यातून एक सुवर्णमध्य माझा मी शोधून काढला असं म्हणणार नाही, पण मी तो आत्मसात केला आणि तो मला फारच भावाला देखील. आई म्हणजे माझे दैवत सगळ्याच बाबतीत. आणि त्यामुळे मी पानात गोड असलं तर त्यांनी सुरवात पण करते आणि ते संपवते पण ताबडतोब म्हणजे मला तिखट, आंबट, तुरट आणि बाकी चवी चाखता येतील पानात असलेल्या. पण हे करता करता मी अजून एक गोष्ट प्रकर्षाने करतेच. ती काय ते सांगते थांबा, आत्ताच अनुभवली, म्हटलं लिहावं.

आज मी डब्यात दोन भाज्या आणल्या होत्या, शिवाय रोज मला आमटी नुसती प्यायला आवडते त्यामुळे ती पण होतीच. माझ्या कडे दररोज / नेहेमीच बॅग मधे काही तरी कुडुम अक्का सटरफटर / शेव बिव असतेच. हे कुडुम अनेक कारणांसाठी ठेवते मी, एक म्हणजे सवय, दुसरं म्हणजे अत्यावश्यक म्हणून, एखादवेळा भूक लागू शकते, तिसरी म्हणजे थंड असतं डब्यातलं त्यामुळे अधे मधे खायला मज्जा येते, चौथं चव कमी जास्त झाली असेल तर भरून निघायला ई. आणि अशी अनेक कारणे आहेतच. त्यामुळे आज माझ्या कडे लगोरी खेळता येईल सहज एवढे डब्बे होते, दोन भाज्या, आमटी, पोळी, कुडुम. नेहेमीच होतात हो पण आज भाज्या काही जगावेगळ्याच झाल्या होत्या, अप्रतिम चव. त्यामुळे कुडुम विशेष उपयोगात आलं नाहीच. त्या दोन भाज्यातली पण एक भाजी म्हणजे माझा जीव कि प्राण, पोपटाची. अहाहा, मग काय विचारात, जेवण झाल्या झाल्या थोडीशी बडीशेप / सुपारी तोंडात टाकणारी मी आज आमटी आणि दुसरी भाजी आधी संपवली आणि शेवटचे दोन घास पोपटाच्या भाजीचे. जेवणा नंतर देखील कित्ती तरी वेळ ती उत्कृष्ट चव रेंगाळत होती जिभेवर. त्या अनुभवाचं वर्णन शब्दात मांडता येत नाहीच, अशक्यच. तिखटानेच माझ्या प्रत्येक जेवणाचा शेवट ठरलेला आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेषच जणू. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...