एक भली मोठी कंपनी आहे. त्या कंपनीच्या वरिष्ठांना ने आण करण्यास कंपनीच्याच गाड्या आणि ड्राईव्हर आहेत. अनेकदा अनुभव घेतल्यावर असं ध्यानात आलं कि दिवसभर काम केल्यावर परततांना गाडी मधली वातानुकूलित यंत्रणा चालू केली कि ड्राईव्हरच्या ड्रेसचा घामाचा वास प्रकर्षाने जाणवतो. मग त्यावर ताबडतोब उपाय निघाला आणि ड्राईव्हर साठी खास AC खोलीची व्यवस्था करण्यात आली.
काही प्रजातींच्या कुत्रांसाठी देखील AC फारच महत्वाचा असतो म्हणे. कदाचित बाकी पाळिव प्राणी, पक्षी ह्यांना पण लागत असेल आणि मालक ते देत असतील.
माझा सध्याचा ड्राईव्हर जो आहे त्याला अस्वस्थ व्हायला होतं, इतक्यांदा तो सतत घाम पुसतो कि एक हात आणि रुमाल चालूच. त्यामुळे भीती वाटते. AC लावला कि मग अस्वस्थपणा ताबडतोब कमी होतो.
एका घरकाम करणाऱ्या मावशींनी सांगितलेला किस्सा. त्या म्हणाल्या कि माझे एकंदरीत ८ कामं होती, त्यापैकी ७ कामाचे पैसे मिळायचे. आठवं काम मी फुकट करत होते कारण मला काम करता-करता संपूर्ण वेळ टीव्ही बघायला मिळावा म्हणून.
राजेशाही संपून एक काळ झाला, पण तरी देखील जुने राजे आणि त्यांची राजेशाही पद्धत अजूनही काही राजघराण्यात दिसते. असेच एकदा एका राजाच्या घरच्या अंगणात, राजवाड्याजवळ एक देऊळ होते, त्याच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो. आणि त्या देवळाशेजारी राजाचा हत्ती होता, हत्तीचं घर होत / शेड बांधली होती. त्यात उन्हाळ्यात पाण्याचे फवारे मारण्याची सोय होती आणि खास त्या हत्तीच्या मनोरंजना करता टीव्ही देखील होता.
ह्या सगळ्यांबद्दल ऐकल्यावर मला एक यक्ष प्रश्न पडला आहे तो असा कि मग स्वतःच्या गाडीतला AC आणि घरचा टीव्ही नक्की कोणासाठी आहे, असतो, असला पाहिजे?
टीव्ही बघत जर जगावेगळा चविष्ट स्वयंपाक किंवा घरकाम होत असेल तर हरकत नाही. AC लावल्यावर व्यवस्थित, शिस्तीत गाडी चालवली तर हरकत नाही. नाहीतर अवघडच आहे.
असो, फक्त मालकच नाही तर सगळेच मिळून ह्या सोईंसुविधांचा लाभ घेऊयात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा