रविवार, २९ मे, २०२२

मेथीची आमटी

श्रावण सोमवारी संध्याकाळी / तिन्ही सांजेवेळा भूक चालवणारा एकमेव जगावेगळा सुगंध अगदी अंगणापर्यंत पोचलेला असायचा तो म्हणजे मेथीच्या आमटीचा. अहाहा च. अजिबातच कधीच माझ्या विस्मृतीत जाणार नाही असा. तशी महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार दररोज घरी एक तर साधी आमटी होत असे किंवा साधं वरणचं असायचं बहुतांशी. आमटी वैविध्य प्रकारची होत असे पण त्यात चार दाणे मेथीचे किंवा मेथीची चिमूटभर पावडर घालण्यावर माझ्या आईचा जोर असायचाच. काढीत पण, कैरीच्या तक्कुत मेथी दाणे घालायचीच. पौष्टिक असतं म्हणून आणि त्या निमित्यानेच मेथी पोटात जाते सगळ्यांच्या नकळत.   पण श्रावण सोमवार जरा जास्त वेगळा भासायचा आम्हा सगळ्यांना. त्या दिवशी माझी मेजवानीच असायची कारणं भरपूर आहेत, एक म्हणजे पहाटे पहाटे च्या "बेल पुडी" ची आरोळी, मग श्री. महादेवाची पूजा, पांढरी फुलं, उपवासाचे पदार्थ आणि एकतर शाळेला सुट्टी किंवा अर्धा दिवस, अहाहा च. अजून काय हवं होतं आयुष्यात. संध्याकाळी भरपूर मेथ्या घालून केलेली आमटी आणि बाकीचा साधा स्वयंपाक असायचा, पण पोळी काय भात काय सगळ्यांसोबत खाण्याचा परमानंद देणारी असायची ती विशेष आमटी. अगदी साधी पण उत्कृष्टच. कदाचित दिवसभर माझ्यासारखीने जे यथेच्छ उपवासाचे पदार्थ रिचवलेले असायचे त्या करता किंवा जे पूर्ण उपवास करायचे त्यांच्या पोटाचा विचार करून हि केलेली असायची. ती साग्रसंगीत आमटी, भरपूर मेथ्या, घरचा गोडा मसाला, गूळ ई. युक्त आणि त्यात आईच्या हातची, तोडच नाही. जगाच्या पाठिवर कुठेही मिळणार नाहीच, अशक्यच. आईच्या नखांची सर नाही पण अत्यानंद देऊन गेली आज मी कित्येक वर्षांनी सहज रविवार म्हणून मनापासून केलेली मेथीची आमटी. माझी शाळा, ते बहरलेले दिवस, ते सगळे सोमवार, माझं घर, सगळयांची सैर घडली अचानक नकळत. कोण म्हणत मेथी कडू असते? तिच्या सारखा गोडवा कुठेच नाही मंडळी, हो पण माझ्या आईने करून दिली तशी ओळख झाली तर मगच तो गोडवा जास्त सुमधुर होणार ह्यात शंकाच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...