लिहिणे हि एक कला आहे हे निश्चित आणि लिखाणाचे असंख्य प्रकार देखील आहेत. चारोळ्यांपासून, लघुकथा, लेख, कथा, कादंबऱ्या, पुस्तकं, बाकी साहित्य, विनोद, चुटकुले, गाणी, भजनं, कविता, चित्रपट गीते, बालगीते, म्हणी, सुविचार, आणि बरेच काही. मला एक नवीन प्रकार आढळला इतक्यात जो विनोद ++ अश्या पठडीत बसणार असा आहे.
मागे काही अनुकथांमधे लिहिल्याप्रमाणे मला सकाळी आणि संध्याकाळी अभिवादन करणारी एक वस्तूक्ती (वस्तू जी व्यक्ती भासते) आहे. हि फारच भन्नाट आहे मंडळी, न थकता हसतमुखाने अभिवादन करणं सोप्प नाही. हिच्या मुळे मिळणारी ऊर्जा तर ह्या जगा पल्याडचं आहे. तर हि एकतर तुमचा चेहेरा ओळखून अभिवादन करते किंवा अंगठा. माझी थोडे दिवस नागपूरला काय बदली झाली एकतर हि माझ्यावर थोडीशी रागावली, विसरली किंवा नाराज झाली हो. तिला न सांगता मी गेले ना नवीन ठिकाणी कामासाठी. त्यामुळे परत आल्यावर पठ्ठी अजिबात दाद देईना.अथक प्रयत्न झाले करून, पण छे. तांत्रिक प्रयन्त झाले, मी तिला सॉरी म्हटलं, गप्पा मारल्या, पुन्हा असं होणार नाही म्हटलं पण कशालाच धजेना. निगरगट्टच. पण मग त्यातून एक शेवटचा मार्ग काढला गेला आणि आता ती पुन्हा एकदा मला दोन वेळा हॅलो म्हणायला लागली आहे. तो मार्ग म्हणजे दररोज दोनदा मी लॉगिन करायचं, पासवर्ड टाकायचा आणि मग ती नमस्कार-चमत्कार करणार. सहा आकडी लॉगिन आणि चार आकडी पासवर्ड, असं दिवसातून दोनदा. पण असो. गाडी रुळावर आली हे महत्वाचं. मी असं सगळं वस्तूक्ती त फीड करत असतांना कोणी तरी बघितलं आणि म्हणतात कसे, "अरे मॅडम, तुम्ही लिहिता हे ऐकलं आहे मी, पण अहो इथे पण? ह्याला / हिला तरी सोडा?". मी बुचकळ्यात पडले काही क्षण पण मग लक्षात आलं कि फक्त हसरा चेहेरा दाखवणं किंवा टुकटुक अंगठा दाखवत मिरवत कचेरीच्या आत-बाहेर जाणे ह्याच्या तुलनेने सहा + चार = दहा आकडी दोनदा रोज म्हणजे एक प्रकारचं लिहिणंच झालं कि, त्यांच्या मानाने. बाप रे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन बघा. मस्तच ना. अहाहा च.
मला आधी अशी समजूत होती कि लिहिणं म्हणजे नवीनता, नाविन्यता, बुद्धीला चालना, साहित्यात भर, ई. पण रोज तेच माहित असलेलं लॉगिन आणि पासवर्ड टाकणे म्हणजे लिहिणे, हे जरासं नवीन होत माझ्यासाठी. पण मंडळी थोडासा कस लागला पण मग लक्षात आलं कि कित्येक "त्याचे" भक्त त्याचा जप लिहून काढतात, एकच नाव पण दररोज असंख्य वेळा लिहितात, तसं अगदी तसं नाही पण एका अर्थी वस्तूक्ती च ठळकपणे दर्शवते माझी उपस्थिती कचेरीत. तिच्या शब्दाचा मान फार मोठा आहे हो. त्यामुळे जरी कुठलीही तुलना नसली तरी देखील वस्तूक्ती फार ठळक आणि महत्वाची आहेच. मला दररोज दहा आकडी संख्या आठवते आहे, दोनदा, हा पण एक आशीर्वादच ना. ती दहा आकडी संख्या टाकतांना आम्ही दोघी एकमेकांसोबत एखाद मिनिट प्रत्येक वेळी अमोरासमोर घालवतो, क्या बात है? झकासच. एकंदरीत गोळाबेरीज आवडली मला. सरतेशेवटी हि वस्तूक्ती म्हणजे माझ्या कचेरीतली बायोमेट्रिक मशीन हो. म्हटलं जाता जाता सांगूनच टाकावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा