आज श्रावणातला पहिला शुक्रवार, जिवतीची पुजा, पुरणाचे दिवे करून, घरच्या लहानग्यांना ओवाळून / औक्षवण करून साजरा करण्याचा दिवस, नतमस्तक होण्याचा दिवस. त्या नुसार मी पण पुरण केले, पुजा केली, आणि आधीपासून तय्यारी केली होती एक दाक्षिणात्य पदार्थ करण्याची. मला भारी तो आवडतो त्यामुळे मग करायचाच अशी गाठ बांधली, केला देखील. तो पदार्थ म्हणजे अनोखा आणि साधा आहे. आत पुरण आणि बाहेरून आवरण मेदूवड्यांचं किंवा इडलीच्या पिठाचं, दोन्ही पद्धतीने करतात असं ऐकलं आहे मी. हा एक साधा पारंपरिक पदार्थ आहे, टिकतो म्हणे बरेच दिवस आणि लागतो मस्त. थोडासा तेलकट होतो, पण एखाद दिवशी चालतं.
पुरण अगदी मोजून मापून केलं होतं. सगळे वडे केले, माझ्या पिल्लू साठी पुरणाच्या पोळ्या केल्या, कटाची आमटी केली आणि मग त्या उरलेल्या इडलीच्या पिठाचे आप्पे केले. काही तरी वेगळं म्हणून. आणि ठरवलं कि आप्पे झाले कि ते मस्त त्या कटाच्या चविष्ट आमटी सोबत फस्त करायचे. आणि अहो काय उत्तम म्हणजे सर्वोत्तम लागला तो पदार्थ म्हणून सांगते. मला तर उडीद रस्सम वडा ह्या पदार्थाची आठवण आली, पण हा त्यापेक्षा भन्नाट लागला हो. क्या बात है? गरमा गरम आप्पे आणि चविष्ट कटाची आमटी, दोन्ही पौष्टिक त्यामुळे बिनधास्त आणि जरा जास्तच खाल्ले गेले. म्हणजे आज मी एका नवीन पदार्थाची सुरवात केली. तुम्ही पण करून आणि खाऊन बघाच, अर्थात मला सोबतीला बोलवायचं विसरू नका हो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा