माझ्या पिढीला सर्वत्र "सँडविच पिढी" असे संबोधले जाते, कारण आम्ही ना धड तिकडचे ना इकडचे, म्हणजे नाही जुन्या ना नव्या जमान्याचे पूर्णपणे. माझ्या आजी आणि आईच्या वेळी व्यवस्थित सीमा आखली होती, आई घर सांभाळणार पूर्णपणे आणि बाबा बाहेरचे सर्व. कोणीही कोणाच्या ना अध्यात ना मध्यात. अर्थात प्रत्येक वेळी, सर्वत्र आऊट लायर्स आढळतातच, अपवाद हो. त्यामुळे एक्का दुक्का लोक सारखे नाक खुपसणारे आढळतात पण बहुतांशी लोक सरळमार्गी, आपलं भलं आणि दुसऱ्याचही.
पण मग त्या सुप्रीम पॉवर ने ह्याच सगळ्या आजी आणि आई मंडळींना उपदेश दिला, प्रेरित केलं, प्रेरणा दिली आणि सांगितलं ठणकावून कि नवीन पिढीच्या मुलींना शिकू दे, जग बघू दे, स्वतंत्र होऊ दे, आर्थिक सुबत्ता महत्वाची आहे आणि असे अनेक पैलू उभे केले त्यांच्या समोर. हे करतांना "तो" सगळं काळजी पूर्वकच करत होता. "तो" आदर्श आणि जेष्ठ मुलींना दुखावत नव्हता, कुठलीही तुलना करत नव्हता, तुम्हाला काय मिळालं नाही असं काहीही सांगत नव्हता पण पुढील पिढीने काय करावं हे नाजूक पद्धतीने त्यांच्या देखत उभं करत होता, सातत्याने सर्वांना प्रेरित करत होता, एकाच वेळी. त्यामुळेच कदाचित ती क्रांती सर्वत्र घडली, दिसून आली, उदयास आली.
वैविध्य संत, महात्मे, ग्रंथ, आधुनिक संत ह्यांच्या सांगण्यानुसार "धन-अन्न-मन-तन" हा असा मार्ग आहे म्हणे, किंवा जोडला गेला आहे ह्या पद्धतीने. तंत्रज्ञानाच्या किंवा गणिताच्या भाषेत बोलायचं झालं, संदर्भ द्यायचे झाले तर "बेल-कर्व्ह" असतो, घंटीच्या आकाराचा असतो. मधला भाग मोठा आणि दोन्ही काढील बाजू / शेपूट लहान. मधला भाग मोठा असतो कारण त्यात बहुतांशी जनता सामावली असते, सगळे सर्व सामान्य लोक असतात जे सरळमार्गी चालत असतात. पण काही बोटांवर मोजण्या इतकी वेगळी पण असतात, आढळतात आजूबाजूला. इथे आपण सर्व सामान्यांबद्दल सुतवाच्य करणार आहोत.
तर "त्याने" अशी सदबुद्धी का दिली?
तर बहुतांशी पुरुष मंडळी सरळ मार्गाने पैसे कमावतात, जे त्यांच्या कुटुंबीयाला गरजेचे असतात, उपयोगी असतात. पण काही आहेत जे वाममार्ग अवलंबतात. किंवा ह्या कलियुगात म्हणे सरळमार्गी कमी होत चालले आहेत झपाट्याने. "धन-अन्न-मन-तन" हा क्रम जर आपण महत्वाचा मानला आणि महत्वाचा आहेच तर मग घरी येणार पैसा कसा येतोय हेच जास्त महत्वाचे ठरते, कारण जसा पैसा येणार त्यानेच अन्न विकत घेतले जाणार, सेवन केले जाणार संपूर्ण कुटुंबाकडून, तसेच मग विचार सुचणार आणि तशीच तब्बेत उभी राहणार किंवा टिकणार. जर घरची मुलगी, आई, आजी, काकू, मामी ई. शिकले, नोकरी करू लागले, पैसे कमावू लागले आपल्या कुटुंबासाठी तर त्यात आईची माया असणार. त्या माऊलीच्या डोक्यात सातत्याने तिचे घर, तिची लेकरे, स्वयंपाक आणि इतर महत्वाची कामे असणार त्यामुळे ती जाऊन पट्टाकिनी काम आटोपून परत येणार, बास. चोख काम करणे, ते देखील वायूच्या गतीने हे जास्त महत्वाचे तिच्या साठी. त्यामुळे अगदी कमी प्रमाण सोडले तर सगळ्या अश्याच असतात. संपूर्ण घराचे स्वास्थ्य, त्यामुळे गावाचे, शहराचे, देशाचे, आणि उत्कृष्ट पिढी घडवायची असल्यामुळे हे सगळं मांडव लागलं त्याला. महागाई, वाढत्या अपेक्षा, अंधानुकरण, आंतरराष्ट्रीय स्थर, तुलना, सारखी अवहेलना / अपमान ई. गोष्टींव्यतिरिक्त आज माझ्या मनात आलेला विचार देखील "त्याच्या" दृष्टीने अत्यंत महत्वाचा असेल, म्हणून हे सगळं घडलं, घडतंय. फक्त पुरुषांच्या हातून, किंवा त्यांच्या कष्टाने येणाऱ्या पैशात दंभ जास्त भरत चालला होता कदाचित, वरचढपणा पण मग आलाच सोबत. ह्या सगळ्यांवर मात करण्यासाठी सर्व मुलींना दिलेली सद्बुद्धी, वरदान आणि शक्ती होती आणि आहे हि, असं मला वाटतंय मनापासून.
एकंदरीत स्त्री वर्ग बाहेर पाडण्याचे महत्वाचे कारण आज ठळकपणे माझ्या समोर उभे ठाकले. ह्याचा अर्थ असा नाही कि हे संपूर्ण पुरुषवर्गाला लागू आहे, अजिबातच नाही. सर्वांचा सन्मान करतं, राखत हे फक्त माझे विचार येथे मांडले आहेत, कोणा बद्दल देखील माझ्या मनात किंतुपरंतु नाही बरं का मंडळी.
आज मी सिस्टर शिवानी ह्याचा एक कार्यक्रम बघत होते, ज्यात "धन-अन्न-मन-तन" हा क्रम सांगितला गेला त्याच वेळी हे विचार माझ्या मनात आले. तुम्हाला काय वाटतं ह्या संदर्भात हे मला ऐकायला निश्चित आवडेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा