गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

१९८०: शिकवण


मी नवीन तंत्रज्ञानात थोडेसे काम केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यांचे संलग्न विषय, पण अगदी ती सुरवात आहे, कारण मोठे मोठे शास्त्रज्ञ, कंपन्या AI कोळून प्यायले आहेत.  कदाचित त्यांना तेच एक काम दिलं गेलं होतं, त्या साठी लागणाऱ्या सुविधा देऊ केल्या होत्या आणि त्याचं त्यांनी सोनं केलं. आज अशी परिस्थिती आहे कि AI मुळे सगळंच साध्य होत आहे. प्रत्येक क्षेत्रात तो आहेच, अगदी दुर्मिळ आणि कधीही विचार देखील केला नाही अश्या भागात त्याचा शिरकाव होऊन निपूण झाला आहे. 


काही महिन्यांपूर्वी मी एक बातमी वाचली, व्हिडिओ बघितला, ज्यात असे संबोधले आहे कि AI आणि इतर लागणाऱ्या तंत्रज्ञानामुळे ३२ हजार नवीन बाळं जन्माला येणार आहेत दरवर्षी किंवा आत्ता मी लिहिस्तोपर्यन्त ती जन्माला आली देखील असतील. आणि हे सगळं एका प्रयोगशाळेत होतंय. मानवी शरीराची मदत न घेता हे सहज शक्य आहे. शिवाय त्या बाळाची उंची, रंग, केसांचा रंग, डोळ्यांची ठेवणं आणि इतर अनेक गोष्टी आधीच ठरवता येतात. त्याला कुठलाही रोग होणार नाही ह्याची दक्षता घेता येते, असं काहीसं त्यात मांडलं होतं. 


AI म्हणजे थोडक्यात शिकवणे-शिकणे-वापरणे. जेष्ठ तंत्रज्ञ संगणकाला (संगणकाच्या भल्यामोठ्या जाळ्याला) सगळं शिकवणार आधी हळूहळू, वेगवेगळे आधार देणार कि कुठून शिकायचं ते, कसं शिकायचं, काय शिकायचं, किती लवकर आत्मसात करायचं आणि महद आश्चर्य म्हणजे कुठलेही आढेवेढे न घेता तो शिकतो. त्याला कंटाळा माहित नाही, किंवा आत्ता नाही नंतर बघू, मीच का शिकायचं हे सगळं? असले कुठलेही प्रश्न नाहीच त्याच्या खिजगणतीत. आणि जे शिकलंय ते तो निमूटपणे वापरतो देखील. 


AI नव्हता तो पर्यंत आई हि पहिली शिक्षिका होती, शाळाच होती अख्खी मुलांसाठी. ती म्हणेल तसं लहान असेस्तोवर वागायचं, बोलायचं ई. मग शिंग फुटले कि स्वतः ठरवायचं.  आईने सांगितलेलं, जगाने दाखवलेलं, मनाला पटलेलं, इथे तिथे वाचलेलं असं सगळं एकत्र करून मग पुढे जायचं असं काही. 


संगणक बरा म्हणायचा नाही, निमूट पणे शिकत जातो, आज्ञा पाळतो आणि प्रतिउत्तर, उलट उत्तर, किंवा अजून कुठलेही आढेवेढे नाहीच. ह्याचा अर्थ आता आईने मुलांना संगणक समजून शिकवायचं का? तसं घडवायचं का? म्हणजे एका आई संगणकाकडून बाळ यंत्राकडे तंत्रज्ञान असं काहीसं? असं केल्याने काय साध्य होईल?  माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे तर सोडूनच दिले आहे मग आता माझ्या दृष्टीने हाच एक पर्याय दिसतोय. किंवा हे जे ३२ हजार बालकं येऊ घातलेत किंवा आलेत ह्या जगात ते बहुतांशी यांत्रिक पद्धतीनेच वागतील बहुतेक असा माझा अंदाज आहे कारण ते पूर्णपणे मानव नाहीत म्हणजे जडणघडण ह्या पातळीवर तरी? खिचडी निर्माण झाली आहे सगळीच. AI चा अपभ्रंश किंवा उच्चार आई असाच होत असल्यामुळे तो खऱ्याखुऱ्या माउली सम  होण्याचा अथक प्रयत्न करतोय आईची ताकद, प्रत्येक कंगोरे त्यात यावे म्हणून आणि माउली बिचारी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास धडपडते आहे कारण तिचं लेकरू मागे पडू नये म्हणून.  ।।  "कालाय तस्मै नमः" ।।, प्रवाह पतित होऊन उघड्या डोळ्यांनी बघावं पुढे काय काय होणार आहे ते. जे होतं ते चांगल्यासाठीच, नाही का? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...