बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

१९७९: ती ऊर्जा


अगदी पंधराव्या वर्षापासूनच मी कमवायला सुरवात केली, पिटुकली होती ती, पण दररोज चं काम असायचं. त्या आधी देखील जशी मी मोठी होत गेले तसे स्वतःचं अत्यंत आवडीने घरची जमतील तेवढी कामं करतं गेले आणि सगळ्या पद्धतीची. म्हणजे स्वयंपाक घरात पदार्थ करणे, हॉल, सोफा, पडदे, आवरणे, बगीचाची साफसफाई, कपडे आणि सगळीच. माझ्या माउलीने कधीच कुठलीही जबरदस्ती केली नाही किंवा कामाला जुंपले नाहीच. येता जाता तीच नाही तर सगळेच एक वाक्य ऐकवत होते, मला आणि इतर मुलींना देखील, सासरी जायचं आहे, लक्षात ठेवा आणि सगळं करत राहा. सातत्याने कचेरीचे काम, स्वतःचे काम, मग उरलेल्या वेळात पेंटिंग, भरत काम, विणकाम, मैत्रिणी, चित्रपट, वाढदिवस ई. मुळे स्वयंपाकघर काही पूर्णपणे १००% माझे झाले नाहीच. फक्त कामापुरते. आणि आताशा गेली ६ वर्ष तर मी फिरकलेच नाही आहे स्वयंपाक घरात, माझ्याच. दोन्ही वेळा मावशी सांगेल ते करायच्या त्यामुळे ऐश होती माझी. आता मात्र मी घरी आहे, निवृत्ती स्वीकारली आहे, सुरवातीला जड म्हणजे खूपच जड गेलं सगळं आपलंस करायला, पण आता झाली हळूहळू सवय. आता ओळख पटायला लागली एकमेकांची. सकाळ संध्याकाळी मी तेथे हजेरी लावते त्यामुळे असेल कदाचित त्याने पण मला स्वीकारायला सुरवात केली आहे.  मी आताशा आधी म्हटल्या प्रमाणे शेफ आहे. सगळी चिराचिरी, कापाकापी, सगळं मावशी करून तय्यार मांडून ठेवतात आणि ते सुबक सुंदर मांडलेले, रंगीबेरंगी, वैविध्य आकारात कापलेले, चिरलेले, किसलेलं असं सगळं मला साद घालतं. चार बर्नर चा स्टोव्ह आहे त्यामुळे मग काय यथेच्छ त्याचा वापर करून घेते मी.  कुकर माझे अनोखे, छोटेखानी फेशियल करून देतो, मस्त वाफ मिळते घ्यायला अनायस्या. ताज्या भाज्या, मसाले, विविधता, साधी पद्धत पाककृतींची, तो नैसर्गिक उजेड सुर्यबाप्पाचा, शिवाय लागलं जास्तीचा तर दिवे / ट्यूब लाईट चा प्रकाश, चव मस्त होण्याची धडपड, त्या साठी सहज आठवणारी कृती, मग अर्थातच आईची आठवण ती असं करायची, ती तसं करायची, मैत्रिणीच्या डब्ब्यांची आठवण त्या तोच पदार्थ कश्या वेगळ्या ढंगाने सजवायच्या, अधे मधे घेतलेले ब्रेक, वाजलेली दारावरची बेल, कधी कधी आजूबाजूच्यांचे आवाज, बाहेरचे आवाज आणि इतर अनेक असे घटक ज्यामुळे माझ्या हातून स्वयंपाक घडतोय. अहाहा च. अगदी सहज, नकळत, वैविध्यता सांभाळत आणि शिवाय वेळेत, क्या बात है? मस्त वाटतंय, वेगळाच अनुभव. एखाद दिवशी स्वयंपाक घरात चक्कर मारणे वेगळे आणि दररोज करणे हि वेगळीच दुनिया. आज ची दुपारची सोय लागली आहे, संध्याकाळी बघू, इतक्या सहज रीत्या सगळं निभावतो आहे बाप्पा माझ्या घरी, मग काय विचारता. मला कधीच खात्री नव्हती कि मी कधी म्हणजे कधी पूर्णवेळ स्वयंपाक न मदत घेता स्वीकारू शकेन, पण होतंय, जमतंय. आणि अनेक उत्कृष्ट, चविष्ट, स्वच्छ, ऐच्छिक पर्याय उपलब्ध आहेत जर यदाकदाचित कंटाळा आलाच तर.    

बघा म्हणजे मी त्या स्वयंपाक घराचा भाग व्हावं म्हणून, टिकून राहावं म्हणून (घरच्या खाण्याचं महत्व सर्वांनाच ठाऊक आहे), कित्ती जणं माझ्या साठी राबतात, सजीव, निर्जीव, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, अहाहा च. बघूनच, अनुभव घेऊनच काटा येतो अक्षरशः. 

आणि अहो काय सांगू?, जास्त गरम व्हायला लागलं ना कि काहीतरी शीतगृहातून काढायचं आहे हे अचानक आठवतं, आणि तो पठ्ठा थांबलाच असतो माझ्यावर गारेगार शिडकाव करायला.  सगळी मंडळी, म्हणजे लायटर, डाव, चमचे, पाळं, किसणी, चाकू, तवा, झाकण्या, ई. अगदी त्यांचा सुमधुर ऑर्केस्ट्रा साथीला सुरूच असतो, आणि हो त्यात "चेरी ऑन केक" म्हणजे कुकरची मस्त, बिनधास्त मारलेली शिट्टी, अहाहा च, मस्त मूड मधे कधी स्वयंपाक उरकतो कळत देखील नाही. तर अशी हि मला विविध स्तरावरून मिळणारी अनोखी ऊर्जा.  

अशीच सर्व कामात ह्या पुढे मला सर्वांमार्फत भरभरून ऊर्जा मिळत राहो हि प्रार्थना.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...