तुम्ही समुपदेशक म्हणून अनेकजणांसोबत काम करत असाल, सल्लागार असाल, वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असाल किंवा शिक्षक असाल, प्रत्येक ठिकाणी काम करण्यासाठी इच्छा, सदीच्छा, आशीर्वाद, गुरु, साधना आणि बैठक असणे महद अत्यावश्य्क आहे. त्या करता सातत्याने मेहेनत घ्यावी लागेल प्रत्येकाला. मग तुम्ही नवशिखे असाल, प्राविण्य प्राप्त केलेले असेल, खूप अनुभुवी असाल, कुठल्याही भूमिकेत किंवा स्थितीत असाल तरी देखील बैठकीला पर्याय नाही. मग बैठक म्हणजे नक्की काय? असंख्य लोकांनी, वरिष्ठ व्यक्तींनी, अनुभवी महानुभावांनी अनेकविध अश्या व्याख्या दिल्या आहेत, नमूद करून ठेवल्या आहेत, खूप ठिकाणी. पण माझ्या दृष्टीने शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थरावर स्थिर असणे म्हणजे बैठक. त्यासाठी एखादी गोष्ट आचरणात आणून चालणार नाही तर सांख्यिक रित्या, एकत्रित पणे त्यावर हळूहळू काम व्हायला हवे. मग त्यात नतमस्तक होणे आले, योग आणि प्राणायाम करणे, छंद जोपासणे, नियमित व्यायाम, बुद्धीला चालना, वाचन, मनन चिंतन, सात्विक भोजन, गुरूंचे आणि थोरामोठ्यांचे स्मरण, कर्तव्य दक्ष रहाणीमान असं सगळंच आलं. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. हळूहळू सुरवात केली कि सगळं साध्य होतंच, तिळमात्र शंका नाही. त्यामुळे जरी तुम्ही वाहनचालक असाल, खूप वर्षांचा अनुभव पाठिशी असला तरी दरवेळी कृतज्ञापूर्वक, मनातल्या मनात त्या वाहनाला, मशीनला नमन करून कामाला सुरवात करून बघा बदल कसा अनुभवता येतो ते. तुम्ही दुसऱ्याचं समुपदेशन करण्या आधी सर्व स्तरावर तय्यारी करा, तरच ऐकून घेणे, समजणे, उमजणे आणि यथोचित उपाय सांगणे तुमच्या मार्फत साध्य होऊ शकेल.
मी ह्या छोटेखानी लेखाची सुरवात केली त्याप्रमाणे जरी तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातली सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट पदवी असली तरी आशिर्वादाशिवाय पान हलणार नाहीच. त्या सुप्रीम पॉवरच्या समोर शरणागती पत्करणे अत्यावश्यक, जे घडून गेलंय ते उत्तम होतं आणि जे पुढे घडणार आहे ते देखील उत्तमच असणार आहे हा भरवसा अत्यंत प्रेरणादायक ठरतो. शिक्षण + आलेले अनुभव (स्वानुभव) + केलेले वाचन + निरीक्षण + गुरूंचे आशीर्वाद + स्वास्थ्य = तुमच्या हातून घडणारे काम. तुम्हीच जर अस्वस्थ असाल तर थोडीशी गडबड होऊ शकते. माणूसच आहे, शरीर आहे आणि भरकटणारे मन म्हटल्यावर थोडेसे इकडे तिकडे होणे साहजिक आहे, पण बैठक असली तर मात्र पुन्हा सन्मार्गावर येणे सहज शक्य आहे. करून बघा आणि जरी आपल्याला वाटत असले कि आपण दुसऱ्यांचे काम करतो आहोत, पण स्वतः किती वृद्धिगत होतो आहोत ह्या कडे प्रकर्षांने लक्ष असू द्या. बैठक आणखीन स्थिर, मजबूत होईल नक्कीच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा