माझ्या लहानपणी पासून जे काही कानावर पडलं ते मी आणि माझ्या सारख्या तमाम मध्यम वर्गीय मुलींनी ग्राह्य धरलं. अगदी कळत्या वयापासून मी आधी लिहिल्याप्रमाणे अगदी जो दिसेल तो, घरी, दारी, प्रत्येक ठिकाणी एकच री ओढली जायची, ती म्हणजे लग्नाची. सगळ्यांनी अगदी विडाच उचलला होता कि लग्न होऊन जाणारी मुलगी हि सर्व गुण संपन्न पाहिजे. स्वयंपाकात / पाककलेत, घर सांभाळण्यात, कलेत निपुण, आवराआवरी, आदर सत्कार, व्रत वैकले, सगळ्या चाली रीती, आणि शिवाय शिक्षणात सर्वोत्तम, म्हणजेच पुढे नोकरी साठी सजग आणि तय्यार. अगदी न कळत्या वयापासून जी टेप सुरु व्हायची ती अक्षता पडे पर्यंत. सगळीकडे एक वाक्यात आहे हे बघून ती त्यावरच विश्वास ठेवायची आणि मनापासून सगळ्या फ्रंट वर निपुण होण्याचा प्रयन्त करायची, आणि त्या वेळच्या सगळ्याच मुली त्यात यशस्वी झाल्या पण.
दोन गोष्टी शिकवायच्या राहिल्या पण त्या वेळच्या समाजाकडून ह्या मुलींना. त्या राहिलेल्या गोष्टी जर शिकवून टाकल्या असत्या तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं, सर्वत्र जास्त आनंद दिसला असता, पण काश ते राहून गेलं.
१. त्या वेळचा समाज, घरी दारी, सर्वत्र सगळे जण मुलींच्याच इतके मागे लागले, त्यांची सगळी शक्ती आणि वेळ त्यातच खल्लास झाला कि ते हे सपशेल विसरले कि मुलांना देखील शिकवावं लागतं. किंवा त्यांनी हे गृहीत धरलं कि मुलांना सगळं येतं, त्यांचा शिकवण्याची गरज नाही. ते घरचे मुख्य आहेत किंवा होणारे मुख्य आहेत त्यामुळे ते सगळं किंवा सगळ्यांना सामावूनच घेतील सर्वार्थाने आणि जिंकतील. कारण ती मुलं आहेत, जिंकलेली जन्मापासून, वंशाचा दिवा, कुलभूषण ई.
२. मुलींना एक गोष्ट ठासून सांगायची राहिली कि "तू सून म्हणून त्या घरी जाणार आहेस, मुलगी म्हणून नाही. ते तुझं घर नसणार आहे, हक्काचं नाही. तेथे कदाचित फक्त तुझ्या चुका दाखवल्या जातील, उणे दूणेच काढले जातील, ते फक्त सहन करणे ह्या शिवाय पर्याय नाही. सगळेच तुझ्याकडून खूप अपेक्षा करणार, सर्वांनाच खुश ठेवावे लागणार सतत" ई. ह्या पिढीच्या आधी हे सगळं कदाचित मुलींना अनुभवावं लागलं नाही, त्या जेव्हा सून म्हुणू आल्या तेव्हा, आई झाल्यावर त्यांना चांगलीच किंवा कुठलीही वेगळी वागणूक नाही मिळाली, घरच्या सारखे महत्व मिळाले म्हणून त्यांनी त्यांच्या मुलींना हे सगळं शिकवले नाहीच. कारण नव्हतेच शिकवण्याचे. पण आता तसे नाही, कात्रीत सापडलेली सँडविच पिढी हि, घरात दारात दोन्ही कडे कर्तृत्व सिद्ध कारायचे होते तिला. पण अर्थात कामाच्या जागी चुका शांतपणे समजावून घेऊन पुढ्यात मांडल्या, प्रोफेशनली, शिवाय पगार मिळाला, बढती मिळाली ई.
अजून एक म्हणजे आधीच्या पिढीने इतके मस्त उदाहरणं समोर मांडले आणि तेव्हाच्या काळानुरूप लग्नाला पर्याय नव्हताच, ठेवलाच नाही मोठ्यांनी. पण सॅन्डविच पिढीतल्या आईची स्थिती बघून माझ्या संपर्कातल्या कित्येक मुलांनी, मुलींनी लग्न करायचेच नाही हा ठाम निर्णय घेतला आहे. आणि चुकून केलेच तर पुढची पिढी जन्माला येणार नाही हे निश्चित कारण त्यांना असं भलतं जग दाखवायचं नाही म्हणे त्यांना.
म्हणजे बघा एका घरच्या सुनेला, आईला, बायकोला जसं वागवतांना बघितलं ते वेगळं होतं. काही सुंदर उदाहरणं आहेत, असतातच नेहेमी, चांगले उत्तम लोकं आणि कुटुंबीय असतात पण फार म्हणजे फारच दुर्मिळ, भिंग घेऊन शोधावे लागतील असे.
।। "कालाय तस्मै नमः" ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा