घोट घोट, थोडे थोडे म्हणजे एका अर्थी सिप. आणि गुंतवणुकीच्या बाबतीत बोलायचे झाले तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला थोडीशी पिटुकली रक्कम गुंतवायची, सातत्य टिकवून ठेवायचं, शांततेने त्या कडे बघायचं आणि काही वर्षात मस्त मोठी रक्कम नक्की जमा होते. माझा एक शाळेचा मित्र आहे आणि त्याच्या कडे धनाढ्य संपदा आहे गुंतवणुकीच्या ज्ञानाची, विविध प्रकारांची, देश आणि विदेशी स्तरावर उत्कृष्ट गुंतवणूक करण्याची, खुप सुंदर सतत माहिती देत असतो तो आणि परवाच त्याने सांगितले ह्या SIP चे महत्व अजून एकदा, अगदी शास्त्रोक्त.
माझ्या मते हि SIP म्हणजे भिशी, महिन्याला जमवणे काय तर ठरलेली रक्कम. अर्थात भिशी त्या रकमेवर इंटरेस्ट देत नाही. पण वेगळी गम्मत आणते, सगळे जमतात, एक थिम ठरवतात, मस्त झक्कास डिश करतात, गप्पा मारतात, आताशा अनेक फोटो काढतात आणि पांगतात पुढील महिन्यात कोणाकडे जमायचे हे ठरवून. भिशी अनेक प्रकारची असते, फक्त पैशांची नाही. झाडं लावण्याची, पत्ते खेळण्याची, घरचा बगीचा सजवायची ई. असे ऐकले आहे.
भिशीचा ढोबळ मानाने अर्थ हा कि सुसंगत, एक सारखे विचार करणारे एकत्र येणार प्रत्येक महिन्यात ठरलेल्या दिवशी आणि आवडती गोष्ट करणार ज्यामुळे त्याचा फायदा होणार, अनेक पद्धतीने.
आमची पण एक भिशी आहे. दर महिन्याला जमतो एकत्र. माझ्या मते २०१९ च्या दरम्यान ती सुरु झाली आहे. न्यू नॉर्मल डेज होते तेव्हा देखील सुरु राहिली हे भिशी अगदी हिरीरीने ऑनलाईन पद्धतीने. आणि खूप मस्त प्रतिसाद आहे ह्या उपक्रमाला. आधी सुरवातीला अनेक जण आले, काही मधे आले-गेले आणि आता एक शिस्तबद्ध पद्धतीने सोशल मीडियाचा वापर होतो, एक संघ तय्यार झाला आहे आणि सर्वांना त्यावर माहिती पोचवली जाते प्रत्येक कार्यक्रमाची. आमच्या ह्या उपक्रमाचा लाभ म्हणणाऱ्यांना, यजमानांना आणि इतर आजूबाजूच्या खूप जणांना होतो, तो जाणवतो आणि कासवाच्या गतीने का होईना फरक जाणवू लागतोच, माना अथवा न माना. ह्या उपक्रमाला भिशी असे नाव देणे खरं तर योग्य नाही, कारण हि फक्त भिशी नाहीच. हा एक धार्मिक उपक्रम आहे जो प्रत्येक महिन्याला होतोच होतो, "तो" घडवून आणतोच. आमच्या ह्या उपक्रमाचे अगदी SIP अक्का सिप सारखे आहे, हळूहळू सुरवात होते, दर महिन्याला कंपाऊंडिंग होते, चक्रवाढ व्याजाप्रमाणे आणि ती गुंतवणूक वाढतच जाते एक्सपोनेन्शिअल (exponential) पद्धतीने, कोणीही त्याला अडवूच शकत नाही. ह्या वाढीत आहे सुधारलेले उच्चार, पाठ झालेल्या ओव्या / काही स्तोत्र किंवा संपूर्ण स्तोत्र, मंत्रउच्चाराची गोडी / आवड, नकळत मिळणारी आणि टिकणारी ऊर्जा, मानसिक स्वास्थ्य आणि स्थैर्य, बदलेला चांगला दृष्टिकोन, वृद्धिंगत झालेली एकाग्रता, समाधान आणि सत्संग. हि यादी खरं खूप मोठी आहे आणि वाढतच राहणार आहे.
आमच्या ह्या उपक्रमाचा दिवस देखील "त्यानेच" सुचविलेला आहे, जो कि महिन्यातली शुद्ध एकादशी. ह्या उपक्रमात सर्वप्रथम प्रत्येक महिनातल्या
एकादशीचे अनन्यसाधारण महत्व आहे, कथा आहे आणि त्याचे कथन केले जाते, समजावून सांगितले जाते, त्यानंतर रामनामाचा एक माळ जप, श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, श्री. गीतेचा बारावा अध्याय पठण आणि मग त्याचे गीताई मार्फत केलेले निरूपण, काही उत्कृष्ट गायकांची भजने, प्रसाद, गप्पा आणि पुढील महिन्यातील पठाणाची रूपरेषा ई. तर असा हा आमचा श्री. विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा उपक्रम.
काही संशोधकांनी नमूद करून ठेवलंय कि एक व्यक्ती जर ठराविक दिवस नामस्मरण करेल, पठण करेल, ध्यान करेल तर त्याचा लाभ कमीत कमी बत्तीसहजार लोकांना होतो. डायरेक्टली किंवा अवचित, पण होतोच, ती कंपने (vibrations) पोचतातच निश्चितपणे सर्वांपर्यंत, सर्व सजीव आणि निर्जीवांपर्यंत. काय ताकद आहे बघा पठणात? नामात? त्यामुळे ह्या पुढे एक शिस्तबद्ध पद्धतीने, किंवा जसे जमेल तसे, जमेल तेवढे नामस्मरण कराच. ।। जय श्रीराम ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा