मी एक संगणक तंत्रज्ञ असल्यामुळे २००० ह्या वर्षाचे महत्व मला माहिती आहे आणि त्या वेळी डिसेंबर महिन्यात जे काही घडलं होतं ते मी ह्याची देही ह्याची डोळा बघितले पण होते अनुभवले होते.
हे वर्ष माझ्या साठी अजून एका दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे कारण माझे दोनाचे चार ह्याच वर्षी झाले होते, एक वेगळी कलाटणी मिळाली आणि खूप वेगळं विश्व उभं ठाकलं माझ्यासमोर.
हा आकडा मग मी पुन्हा एकदा प्रचंड महत्वाच्या दुर्ष्टीने बघितला, किंवा माझ्या समोर तो उभा ठाकला. मी एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षिका म्हणून नोकरी करत होते. त्या नोकरीचा भाग म्हणून आम्हाला संशोधन पण करायचे होते. संशोधन करणे म्हणजे जमल्यास मोठ्या प्रमाणात समाजाला मदत करणे, त्यांच्या अडचणींना जर काही तांत्रिक उपाय असेल तो सुचवणे, अनेक प्रयोग करून बघणे, त्याची नोंद ठेवणे, त्याबद्दल लिहिणे, प्रयोग सुरूच ठेवणे, त्यांच्यात तुलना करणे आणि ते पुन्हा समाजासमोर मांडणे, किंवा जे त्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्या समोर, संक्षिप्त स्वरूपात तुमचे काम, बाकिच्यांनी ह्याच विषयात केलेलं काम असे सगळे पेपर च्या स्वरूपात मांडणे आणि असे बरेच काही. जेव्हा तुम्ही पेपर लिहिता, तो तज्ज्ञांकडे पाठवता, जर्नल मध्ये तो प्रसिद्ध होतो तेव्हा बाकीचे लोक तो वाचायला, रेफर करायला सुरवात करतात. रेफर करणे म्हणजे वाचून सोडून देणे नव्हे तर त्याबद्दल तुमच्या पेपर मध्ये लिहिणे. त्याला सायटेशन असे संबोधले जाते. तर २००० सायटेशन मिळणे एका पेपर ला हि खूप मोठी उडी आहे, शाबासकी आहे, प्राप्ती आहे आणि सगळे बोलणे थांबतेच इतके मोठे सायटेशन मिळाले हे बघितले कि. अर्थात २००० हि फक्त सुरवात असते, पण माझी २००० ह्या आकड्याची पुनः ओळख अशी झाली होती.
अर्थात ह्या जगात इतके दिग्गज लोकं आहेत ज्यांचे सायटेशन कदाचित आकाशाला भिडले असतील, पण २००० हा देखील खूप मोठा आकडा आहे.
माझा मुलगा लहान होता. शाळेत जात होता. त्याच्या वार्षिक स्नेह संमेलनात एकदा म्हणतो कसा "मम्मा मला स्टेज वर जाऊन सर्टिफिकेट मिळवायचं आहे पण ते अभ्यासात काही मिळणार नाही हे मला माहिती आहे, कारण मी इतका हुशार नाही. पण मला तरी देखील १००% अट्टेण्डन्स / वर्षभर उपस्थिती ह्याचं सर्टिफिकेट हवंच आहे पुढल्या वर्षी". म्हणजे बघा तो फक्त वयाने लहान होता, दिसायला लहान होता, पण डोक्याने? मला तर खूप भरून आलं त्या वेळी. मी त्याला समजावलं आणि असं म्हणायचं नाही असं सांगितलं. मिळेल तुला पण एखाद्या विषयात प्राविण्य. नाराज व्हायचं नाही, तुलना करायची नाही, जोमाने अभ्यास करायचा असं काहीस मी त्याला समजावलं आणि प्रॉमिस केलं कि त्याला मी पुढल्या वर्षी १००% उपस्थितीचं सर्टिफिकेट नक्की मिळवून देणार, प्रयत्न करू आपण दोघे. असा आमच्यातला संवाद इतक्या वर्षांनी आठवायचं कारण म्हणजे माझ्या एका पेपर ला २००० सायटेशन मिळणे हे फक्त स्वप्नवत होत, आहे आणि राहील माझ्या साठी. किंबहुना आता स्वेच्छा निवृत्तीनंतर तर ते अशक्य आहे, किंवा गरजेचे नाही आहे. पण तेथे नाही तर दुसरीकडे २००० टप्पा माझ्या हातून गाठला गेला हे महत्वाचे. आणि ह्याचं श्रेय पूर्णपणे ज्याची लेखणी आणि ज्याचे शब्द त्याला सर्वप्रथम जातें, तदनंतर आमच्या ह्यांना ज्यांनी मला खूप मोकळीक दिली काय हवं ते करण्याची, कुठल्याही प्रकारची अडवणूक केली नाहीच कधीच. मी कधीच काहीच खूप सर्वांनी वाचावं ह्या उद्देशाने लिहीत नव्हतेच, कारण लिखाण आत्यंतिक महत्वाचे होते माझ्यासाठी, लाईक्स किंवा फॉरवर्ड नाही. त्यामुळे त्याने सांगितले, माझे हात चालले आणि आज २००० वर पोचले. वाचकांना धन्यवाद, संगणकाला तर कोटी प्रणाम, त्याची साथ नसती तर कसे सगळे झाले असते हो. आणि सगळ्या विषयांना मनःपूर्वक आभार माझ्या समोर फक्त उभे ठाकले नाहीत तर जो वर मी लिहीत नाही तो वर डोळ्यासमोरून सरले नाहीत. अहाहा च.
२००० आकडा गाठणे माझ्या साठी चमत्काराशिवाय कमी नाहीच. कारण माझी ख्याती होती, मी खूप बोलणे ऐकून घेतले आहेत माझ्या लिखाणाबद्दल खूप आधी कि हिचं काही खरं नाही, हिला साधं लिहिता येत नाही, काय होणार? ई. आणि ते सगळं ऐकून मी त्यांच्या वर भरोसा ठेवला, माझ्यावर नाही आणि लिहिणं पूर्णपणे सोडलं. पण फेसबुक आलं, ते मला भावलं, माझ्या समोर असं काही उभं रहातं गेलं कि मी लिहिते झाले हळू हळू. आधी काही ओळी, मग पेपर्स कारण त्याला पर्यायच नव्हता, मग थेसिस, खूप सारे ग्रांट अप्लिकेशन्स, रिपोर्ट्स आणि अनेक पद्धतीचे लेखन होत गेले. एकीकडे तांत्रिक लिखाण तर दुसरीकडे प्रकर्षाने मराठी ब्लॉग सुरवात झाली. एका मुळे दुसऱ्याचा फायदा झाला आणि मज्जा येत गेली, गती आली, सुचतं गेलं, शब्द पेरले गेले आणि त्याची गोष्ट झाली. कधी कशी केव्हा कोणी केली काहीही ठाऊक नाही. कधीही कशाच्याही मागे लागले नाही कारण तशी सद्बुद्धीच झाली नाही, तेवढा वेळ दिला गेला नाही.
ह्या मागे "त्याचा" काय उद्देष आणि उदिष्ट आहे हे ठाऊक नाही, जोवर आज्ञा मिळते आहे तो वर लिहीत राहणार. ह्या सगळ्या प्रवासासाठी शतशः धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा