हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. दोन्ही वैविध्य पद्धतीने तय्यार केले जातात, किंवा चाखले जातात. जसे कि पातळ पिठले (वरून पीठ लावून केलेले किंवा कालवून), घट्ट पिठले, पातीचे पिठले, आणि बरेच असे. गोड कढी, पांढरी कढी, भाज्या घालून केलेली कढी, किंवा कढी गोळे, ह्या काही कढी करण्याच्या पद्धती किंवा रचना. "नागपूर तेथे सगळंच भरपूर" ह्या पद्धतीने तिथला एक खास पदार्थ आहे तो म्हणजे "भातावरचं पिठलं". जसा गोळा भात करते वेळी भात शिजत आला कि गोळे पेरतात आणि वाफवतात, अगदी तसेच, भात शिजत आला कि पिठल्याचं कालवलेलं पीठ वर पेरायचा आणि झाकून ठेवायचं, वरून फोडणी देऊन यथेच्छ ताव मारायचा.
ताकातलं पिठलं हा पण एक फार आवडीचा पदार्थ आहे. अगदी म्हणजे अगदी झट कि पट होणारा. ते पिठलं पण घट्ट / पातळ ह्या दोन्ही प्रकारे करता येतं. पातळ ताकातलं पिठलं हे बऱ्याच अंशी कढी तत्समच लागतं मला. खूप अंतर वाटत नाही. कारण ताकातलं पिठलं हे अगदी साध्या पद्धतीने केलं असतं, फक्त फोडणी देऊन, बाकी कांदा, लसूण, टोमॅटो ई. घटक न घालता केलेलं. "ते" पिठलं आणि "ती" कढी हा फरक आहेच जो मान्य करावा लागेलच. आणि त्यामुळे "त्याला" जरा जास्त पीठ लागतं घट्टपणा यायला आणि "हि" थोडक्यात खुश असते नेहेमीप्रमाणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा