मोबाईल हा एक नवीन प्रकार जेव्हा पासून उदयास आला आहे तेव्हा पासून जणू हा एक मानवी आणि जीवापेक्षा महत्वाचा अवयव झाला आहे. "जेथे जातो तेथे तो माझा सांगाती", जेव्हा पाहावं तेव्हा आणि ज्याला पाहावं तेव्हा फक्त मोबाईल हातात, सोबत आणि ध्यान लागल्याची परम अवस्था. काय बोलायचे हे समजतंच नाही मला. अगदी वाहता रस्ता म्हणू नका, दुकानं, गाडी चालवतांना (दोन्ही दोन आणि चार चाकी), उठता बसता... दमले मी बघूनच. मी तर असे दिग्गज बघितले आहेत कि जे उच्च विद्याविभूषित आहेत, अनेक दशकांचा अनुभव गाठीशी आहे, तरी देखील मोबाईल आणि सोशल मिडिया वर आलेला प्रत्येक संदेश, मग तो ऑडिओ असो, विडिओ असो, लिंक असो नाहीतर टेक्स्ट, वाचलाच पाहिजे, उघडलाच पाहिजे. कित्ती धोकादायक आहे ते, कसं समजत नाही ह्या मंडळींना? आणि का उघडायचा? दुसरे काही महत्वाचे करण्यासारखे नाही का? बरं पाठवणारा आहे हो भले हि ओळखीचा पण त्याचे मूळ? कोणाला ठाऊक? मग का?
वय, वर्ग, शैक्षणिक पात्रता, ठिकाण, कामाचा अनुभव, कामाचे स्वरूप काहीही म्हणजे काहीही फरक नाहीच. कोणालाही इतकं जवळ कधीच कोणीच बाळगले नसेल इतका त्याचा ध्यास आणि सहवास. कंटाळा येत नाही का? डोळे, मान, कान ई. दुखत नाहीत?
आताशा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात वावरत असला तुम्हाला मिटिंग ला हजर राहणं आलंच, म्हणजे बोलणं आणि समजावून सांगणं देखील आलं, त्यामुळे मुका सुद्धा बोलायला लागला आहे आजकाल. मुका म्हणजे अगदीच शब्दार्थी घेऊ नका. अबोल म्हटलं तरी चालले. प्रेसेंट केलं नाही, काम कसं आणि किती वेळेत केलं हे समजावून सांगितले नाही तर गाडी पुढे जाणारच नाही. हा एक भाग झाला. दुसरा महत्वाचा म्हणजे ह्या मोबाईल मुळे आणि अर्थातच तंत्रज्ञानामुळे सगळे सतत बोलतांना आढळतात, काय आणि कुणाशी इतके बोलतात कुणास ठाऊक. आणि मी असे संशोधन पत्रिकेत ऐकले आहे कि बोलका माणूस मोकळा असतो. त्याच्यात काहीही साठून राहात नाही. त्यामुळे तो आतून शांत असतो. तिसरे म्हणजे व्यक्त झालीत सगळीच माणसं आताशा, ह्या ना त्या पद्धतीने. काही जण बोलण्याला प्राधान्य देतात, काही रील्स करतात, काही जण लिहून मोकळे होण्याचा अनुभव घेतात, आपआपली मते मांडतात, आणि आवर्जून करतातच.
मग एक फार मोठा प्रश्न उद्भवतो माझ्या देखत तो असा कि मग ह्याच सगळ्या मोकळ्या माणसांना मानसिक आजाराची लक्षणे का दिसत आहेत आणि ती देखील खूप मोठ्या प्रमाणात आणि सर्वत्र पसरलेल्या अवस्थेत? सगळा समाज पोखरून निघतो कि काय हि भिती आता निर्माण झाली आहे. दिसायला उत्तम, वागण्या बोलण्याला व्यवस्थित, कामं मार्गी लावणारा तरी देखील मानसिक रित्या खोकला का? काय त्रासदायक आहे असं? सर्वांचे स्वभाव असे का होत चालले आहेत? हा एक गहन आणि गंभीर प्रश्न आहे, सर्वच वयोगटासाठी आणि जगभरात निर्माण झालेला. काहीही होऊ नये म्हणून तर सगळे जणं स्वतःला गुंतवून ठेवत आहेत ना त्या मोबाईल नामक निर्जीव वास्तूसोबत, व्यक्त पण होत आहेत, आता पुढे काय करायचं हा देखील प्रश्न नाहीच कारण खूप काही मोबाईल ने दिले आहे करायला. बरं आधी सारखं नाही, आता भिशी आहे, सहली सजह काढल्या जातात, हवी तेवढी खाण्याची ठिकाणे आहेत, ओला आणि उबेर आहेत, नको तेवढ्या, जुन्या पान्या मित्र मैत्रिणीचा गोतावळा आहे, मग काय उणं आहे? समाधानी वृत्ती का नाही मग? अजून काय हवंय? हे सगळं नव्हतं तेव्हा माणसं शांत निद्रेचा अत्यानंद घेत होती, अचानक दत्त म्हणून घरी येत होती आणि जेवूनच जात होती, कमाई थोडी होती, कुठलेही सहज उपलब्ध तंत्रज्ञान नव्हते खेळण्यासारखे वापरायला.
डोळे उघडा, नीट बघा, आजार टपकण्याची वाट बघू नका, सर्व काही प्रमाणात वापरा, सर्वकष स्वरूपाचा विचार आणि आचार ठेवा, मोबाईल आपल्यासाठी आहे हे विसरू नका, घरची कामे करा, व्यायाम करा, जेवतांना जेवा फक्त, माणसाने माणसाशी माणसासम वागून तर बघा, सातत्याने स्क्रीन टाळा मंडळी, कृपया. खूप उत्कृष्ट गोष्टी आहेत, कामे आहेत, संध्या आहेत, जरा मान वळवून तर बघा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा