आमच्या सोसायटीची शान औरच आहे. वैविध्य रंगांनी नटलेली, सजलेली अशी. त्यात एक खास लहानपणीची आठवण करून देणारे घंटीच्या फुलाचे झाड पण आहे, म्हणजे पिवळ्या आणि केशरी रंगांची, दोन्ही. काल मी संध्याकाळी खाली जाऊन पाय मोकळे करत असतेवेळी माझ्या देखत आणि फक्त माझ्या साठी एक ताजतवानं फुल माझ्या पुढ्यात अवतरलं. अहाहा. मग काय विचारता? तो न्यारा सुगंध घेऊन मी वेगळ्याच विश्वात पोचले. कित्ती म्हणजे कित्ती वेळ तो सुगंध देत राहिला मला. इतका उत्साहवर्धक आणि स्फूर्तिदायक असा अनुभव होता ना तो, कि ज्याचं नाव ते.
उन्हाळ्यातला तो मोगऱ्याचा मंदधुंद सुवास अगदी बहुतांशी प्रत्येक फ्लॅट मधून येणारा कारण सगळ्यांच्याच बाल्कनीत मोगरा स्थानापन्न झालेला आहेच. सकाळची सुरवात काय मोहक होते म्हणून सांगू? हे काय कमी होतं, त्या नंतर एकावर एक घरं असल्यामुळे गवतीचहा घालून उकळी आली कि असं वाटतं कि जे शब्दात मांडणे अश्यक्यच. माझ्यासारखी गवतीचहा वेडी सर्व ऋतूत तो वापरते, पावसाळ्यात आल्याला खास, विशेष प्राधान्य दिले जाते, आणि त्याचा घमघमाट तर वर्णन करण्या पल्याडचं. हेच आलं त्याच हिवाळ्यात "जिंजर कुकी" ह्या नावाने तय्यार केलं जातं तेव्हा ओव्हन ने पसरवलेला सुवास भूक चाळवून जातोच. हेचं आलं कढीची शान वाढवतं तेव्हाचा घमघमाट भूक वाढवून जातो. प्रत्येक वेळी ऊर्जेचे स्तोत वेगळे, घटक पदार्थ वेगवेगळे असतात तरी सुवास छाप सोडतोच. स्वयंपाक घरात तय्यार होणाऱ्या गोड, तिखट, आंबट प्रत्येक पदार्थाची अवीट गोडी पोचतेच घरी आणि दारी सुद्धा. प्रत्येक मसाल्याचा सुगंध वेगळा आणि तो जेव्हा एखाद्या पदार्थाची शान वाढवतो तेव्हा तेव्हा प्रकर्षाने जाणवणारा घमघमाट पसरवतोच. शेकणे, शिजवणे, भाजणे, तळणे, बेक करणे, अगदी प्रत्येक वेळचा अनुभव निराळा.
तर अशी हि आमची सोसायटी, सुगंधी. सातत्याने माणसांच्या स्वभावाचा, सहवासाचा, पदार्थांचा, फुलांचा, मातीचा, पॉलिशचा, रंगरंगोटीचा, पेट्रोलचा, आणि असे अनेक विविधत्वाने नटलेली. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण, या आणि स्वतः अनुभवा आमच्या सोसायटीचा अनोखा गंध.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा