शुक्रवार, ३१ मे, २०२४

आपल्या पायांवर उभे

 तसे मी घरीच गमाडी जम्मत म्हणून माझ्या पेक्षा लहान मुलांचा अभ्यास खूप आधीपासून घेत होते, तेव्हा मी देखील एक विद्यार्थिनी होते. माझं तंत्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी जेव्हापासून नोकरी करायला लागले शिक्षिका म्हणून तेव्हा पासून शिकवतांना बसून राहणं, किंवा बसून शिकवणं ठाऊकच नव्हतं अजिबात. किंबहुना कशावर बसायचं? आणि का? सगळं काही फळ्यावर लिहावं लागायचं किंवा नोट्स वर्गात कथन कराव्या लागायच्या. अगदीच कधीतरी ट्रान्स्परन्सी शीट्स तय्यार केल्याचं तर मग त्यावेळचा प्रोजेक्टर वापरायला मिळायचा. पण तरी देखील उभंच, सतत. खुर्ची नसायची वर्गात शिक्षकांसाठी आणि स्मार्ट बोर्ड किंवा आज सारखं तंत्रज्ञान विकसित न झाल्यामुळे आधीपासून PPT तय्यार करून पाठवणे वगैरे अशक्यच. रक्तात भिनलं होतं कि शिकवतांना उभे राहणे. 


माझ्या मते प्रोफेशनल दर्जाचे जे विविध क्षेत्र आहेत जसे स्वयंपाक, चित्रकला, गाणे, फॅक्टरीत काम ई. उभे राहूनच करावे लागते, पर्याय नाहीच. 


आताशा माझे पाय बंद पडल्यापासून मी उठत बसत शिकवते आहे ते पर्यायच नाही म्हणून आणि तंत्रज्ञानाची जोड आहे म्ह्णून. नाही तर उभं राहिल्याशिवाय मज्जा नाही, सर्वांचे हावभाव नजरेस पडत नाहीत आणि त्यांना शिकवलेलं समजलं कि नाही हे लक्षात येत नाही. त्यामुळे उभे राहणे हाच पर्याय किंवा ते आपसूकच होतं खरं.  


एका दिज्जग गाणाऱ्या कलाकाराची मुलाखत ऐकत होते. त्यांना गाण्यास सांगितले, किंबहुना चारच ओळी, मुलाखतीचा कार्यक्रम असल्यामुले पूर्ण गाणे नाही. एवढे जगमान्य व्यक्तिमत्व असून सुद्धा त्या ओळी उभ्याने गायल्या आणि गाणं झाल्यावर पट्टाकिनी वादकांना दाद दिली. क्या बात है? मस्तच. 


हिंडत फिरत शिकवणे, समजावून सांगणे, मधेच एखादा प्रश्न टाकणे आणि चाचपणे, त्यामुळे सर्व वर्ग लक्ष तर देतोच आणि एक नाते देखील निर्माण होते. 


मधे एक व्हिडीओ बघण्यात आला माझ्या, त्यात एक भला मोठा, नावाजलेला, लोकप्रिय असा शेफ होता / आहे. त्याचे काही कारणास्तव पाय कामातून गेले. तज्ज्ञांच्या मते ते ठीक होणं अशक्य होतं. त्याला उभे राहणे अर्थात कधीच जमणार नव्हतं. पण नोकरी करणं अत्यावश्यक. मग काही दिवस त्याने आराम केला आणि त्याच वेळी त्याच्या जिवलग मित्रांनी मस्त शक्कल लढवली. त्यांनी जेथे स्वयंपाक होत असे तिथले छत वेगळ्या धाटणीतले बसवले. एक खुर्ची आणली आणि दोरखंड. अर्थात तो साधारण दोरखंड नव्हता. तो पुली होता, जो आडवा, तिरका, आणि हव्या त्या दिशेला सरकू शकत होता. त्यामुळे काय साधले गेले तर   हा शेफ खुर्ची वर बसायचा. त्याला जो पदार्थ तय्यार करायचा आहे ऑर्डर प्रमाणे त्यासाठी लागणारे घटक पदार्थ ह्या त्या स्टेशन वर ठेवलेले असायचे. ते तो सहज स्वतः घेऊ शकेल, कोणावर अवलंबून राहणार नाही, स्वावलंबी होईल आधीसारखा म्हणून हि केलेली जय्यत तय्यारी. काय दिमाख लावला आहे ना?  भन्नाट च. असे असावते दोस्त. ह्या सगळ्या महेनतीमुळे त्या शेफची नोकरी टिकून राहिली, त्याला पैसे मिळत राहिले, शिवाय त्या खानावळीचा फायदा झाला, गिऱ्हाईक खुश आणि त्यामुळे त्याचे परत मिळालेले स्वावलंबन. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाहीच. 


न्यू नॉर्मल दिवसांमधे मी हे आवर्जून टिपले आहे कि ऑनलाईन शिकवायचं असलं तरी बरेच हाडाचे शिक्षक उभा राहूनच शिकवत होते, तसे कॅमेरे सेट करत होते.  त्या शिक्षकीपेशाचा अत्यादर म्हणून, किंवा सवय म्हणून किंवा सवय टिकून राहावी म्हणून, कारण हे दिवस जाणार हे ठाऊक होतं त्यांना. कदाचित बघणाऱ्या विद्यार्थ्याला शिकता यावं हे देखील म्हणून असेल. पण उभं राहण्याने जो खंबीरपणा येतो. वर्गात लक्ष राहतं आणि सर्वांपर्यंत पोचता येतं,हे शिकवतांना नेहेमीच खूप कामी येतंच. आपल्या पायांवर उभे आहोत दिमाखात ह्याचा सतत प्रत्यय येत राहतो. असेच अखंड उभे राहायचे आहे ह्याचं बळ मिळतं. 


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...