रविवार, २ जून, २०२४

ऍक्युप्रेशर

 असं ऐकिवात आहे कि तळहातावर म्हणे सगळे ऍक्युप्रेशर पॉईंट्स असतात. म्हणजे शारीरिक काहीही दुखणं असलं तरी तज्ज्ञ मंडळी फक्त हातातले काही ठिकाणी दाबून बरे करतात. आधीच्या काळी जेव्हा कुठलीही अत्याधुनिक साधने नव्हती तेव्हा पाट्यावर वाटणे, रवीने घुसळणे, पोळ्या लाटणे, खलबत्यात कुटणे अशी कामे घरीच केली जात. त्यामुळे नैसर्गिकरित्या सगळे पॉईंट्स अगदी नित्य नियमाने दाबले जायचे, जसे कि प्रतिबंधात्मक उपाय. अर्थात तेव्हा घरची लक्ष्मी घरच्या कामाकडे बघायची, प्रदूषण नव्हते, अंगणातले / शेतातले सगळे ताजे जिन्नस खायला मिळत होते त्यामुळे तब्बेती मस्त होत्या सर्वांच्या. पण स्वयंपाक घरात आपसूक होणारे ऍक्युप्रेशर खूपच महत्वाचे होते, सर्वांपेक्षा, माझ्यामते. ह्याचा आज मला अद्भुत प्रत्यय आला आणि अनोख्या पद्धतीने जाणवले, उमगले. 


माझी स्वयंपाकात मदत करणारी मदतनीस एक संपूर्ण आठवडा सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे सध्या स्वयंपाक घर माझ्या ताब्यात आहे, संपूर्ण. त्यामुळे सगळी अवजारं जेव्हा मी वापरायला सुरवात केली तेव्हा नव्याने त्याचा महत्वाचा वापर नजरेस पडला. उगाच नाही "तो" काम करणाऱ्या मावशींना सुट्टी घेण्याची सद्बुद्धी देतो, ते देखील काही ठराविक दिवसानंतर. काही ठिकाणी अगदी ऑफिस असल्यासारखे मावशी रविवारी सुट्टी घेतातच. त्यामुळे आठवड्यातून एकदा त्या घरच्या स्वयंपाक करणाऱ्याला ऍक्युप्रेशर मिळत असेल, आणि अर्थात नकळत त्याचा फायदा देखील. 


मला बाकीच्यांचं ठाऊक नाही पण मी जे बघितलं लहानपणीपासून ते असं होतं कि आई ताक घुसळून लोणी काढतांना किंवा लोण्याचे तूप काढवतांना "राधा कृष्ण गोपाळ कृष्ण" असे सात्यत्याने म्हणत असे. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जाई त्यामुळे. मला पण नकळत तशीच सवय लागली. रवी हातात घेतली कि मनात जप आपोआप सुरु होतोच. किंबहुना काहीही हलवतांना, दुधाच्या पदार्थांना हाताळतांना देखील सुरु होतो जप. सवयीचा परिणाम, अजून काय. शारीरिक,  थोडक्यात अध्यात्मिक आणि मानसिक स्वास्थ मस्त सांभाळले जाते त्यामुळे. म्हणजे बघा घरी स्वयंपाक करण्याचे फायदे, असंख्य असे. अर्थात सद्यपरिस्थित सर्वांना सहज जमणे आणि त्याचा लाभ घेणे अशक्य आहे. पण जमेल तेव्हा "चेंज ऑफ वर्क इज रेस्ट" असं म्हणून करून बघा, मस्त वाटेल, आनंद मिळेल, सर्वतोपरी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...