सोमवार, ३ जून, २०२४

थापलाट


महाराष्ट्रियन घरी थालिपिठाची एक वेगळीच परंपरा आहे. ताजे ताजे तिखट असे थालिपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा, अहाहा च. काय विचारता? पर्वणीच आहे / असते ती. काही जण तूप घेतात तर काही दही, लोणचे. आवडीप्रमाणे. थालिपीठाची खास भाजणी असते, म्हणजे दोन्ही प्रकारची, उपवासाची वेगळी आणि कांदा, भाज्या वगैरे मिसळून करण्यासाठी खास अशी. हे झाले ठरवून / घाट घालून केलेले न्याहारीचे पदार्थ. किंवा मुलं घरी आली, भूक / काहीतरी दे  म्हटलं कि चट्टाकिनी थालिपीठ तय्यार, पौष्टिक आणि पोटभरीचे. माझी आई नेहेमी म्हणायची कि थालिपीठावर जी बोटे उमटतात थापतांना ती दिसायला तर खूपच उत्तम दिसतात, जशी कि एक वेगळ्या प्रकारची रांगोळी आणि तो आशीर्वाद असतो, मुलांनी पोटभर खावं, त्यांच्या वाढीला ते उपयोगी पडावं ह्या करता. 


काल मी लाल भोपळ्याचे पराठे करण्याची तय्यारी केली, पीठ मळले आणि कुकर लावायला थोडासा वेळ लागला. तो वर बघते तर काय घट्ट मळलेले पीठ थोडेसे सैलसर झाले होते. मला अजून वाढ करायची नव्हती पिठात त्यामुळे मग गोळा केलेला आधी थापल्यासारखा केला, तो एक गोल फुलक्याच्या आकाराचा  झाल्यावर मग हलक्या हाताने लाटून पराठा पूर्ण तय्यार केला. त्यामुळे दोन्हीचा आनंद घेता आला, थापण्याचा आणि लाटण्याचा सुद्धा. हे सगळं करायला थोडा वेळ गेला पण मळलेले तेवढेच पीठ वापरले गेले, भर घालायची जरुरत नाही पडली. 


दिवाळी संपल्यावर जर चकलीची भजनी शिल्लक राहिलीच तर आई त्याचे पण थालिपीठ करायची. किंवा कधी आमटी, भाजी उरली असल्यास, ते खपवण्याचं साधन म्हणजे हमखास थालिपीठ. आणि अश्या थालीपीठात मग कणिक, भाकरीचे पीठ, डाळीचे पीठ, भाजणी, तांदुळाची पिठी, काहीही ढकललं जायचं.  पण असे साग्रसंगीत केलेला पदार्थ फार म्हणजे फारच चविष्ट होत असे. 


ह्या अश्या सगळ्या अनुभुवनची मस्त उजळणी झाली काल. धन्यवाद त्या पीठाला. ते घट्ट च राहिलं असतं तर कदाचित मी पट्टापट लाटून, करून मोकळी झाले असते, थापून लाटण्याची किंवा थापलाट करण्याची वेळ आली नसती, काहीही आठवलं नसतं, जुन्या दिवसांचा फेरफटका मारता आला नसता आणि हा पंक्ती प्रपंच पण साधता आला नसता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...