बुधवार, ५ जून, २०२४

रिकामटेकडी


हा शब्द जरा जास्तच वापरात आहे माझ्या सध्या, कारण खरंच मी रिकामटेकडी आहे, कामचं नाहीत. स्वेच्छा निवृत्ती पत्करल्यामुळे तर अधिकच रिकामी आहे. काल अपरात्री मला अचानक एक विचार मनात आला कि हा शब्द कसा घडला असेल. कारण माझ्या मराठीच्या शिक्षिकेने तर शब्दाचे मूळ कधीच कथन केले नाही, मी देखील ते कधीच विचारले नाही आणि फक्त ते वाक्यात उपयोग करत गेले, आज पर्यंत. नद्या आहेत, सागर आहे, समुद्र आहे, झाडं आहेत आणि असे बरेच जण आहेत, मग रिकामा व्यक्ती शी टेकडी हा शब्द प्रयोग का करावासा वाटला असेल कोणाला? मला जे समजलं, उमजलं ते मी आता इथे देत आहे. रिकामा आणि टेकडी मिळून तय्यार झालेला शब्द. टेकडी म्हणजे डोंगरासारखे आणि अर्थात स्त्रीलिंगी शब्द. कारण डोंगर हा "तो" आणि "ती" टेकडी. "दुरून डोंगर साजरे" आणि इतर म्हणी तय्यार झाल्या आहेत ह्या भल्या मोठ्या आकाराच्या नैसर्गिक रित्या तय्यार झालेल्या ठिकाणाला किंवा जागेला धरून किंवा संबोधून, सगळ्याच भाषांमधे. उंचच उंच, खडकाळ, रुक्ष, कोरडे आणि सातत्याने उभे, हेच काय ते टेकडीचे महत्व. अर्थात जंगली वनस्पती किंवा हिरवळ उगवते त्यावर पावसाळ्यात, पण त्या शिवाय काहीच नाही.  डोळ्यांना सुंदर दिसतात ते डोंगर, किंवा त्या टेकड्या, काही उत्साही त्यावर चढून जातात, व्यायाम करण्यासाठी जातात, उंच भाग म्हणजे स्वच्छ हवा, ह्या करता जातात, कारण त्याला "उंच हवेचे ठिकाण" असेच संबोधले जाते. माझ्या मते गावाला, शहराला जर टेकड्यांनी वेढले असेल तर शुद्ध आणि गार हवा वाहते.  असे काहीसे उपयोग आहेत त्या टेकडीचे. पण सर्वानुमते एक स्थिर वास्तव्य, ह्या पल्याड काहीच नाही. थोडक्यात काही जण निरुपयोगी असे पण म्हणतील. कारण नदी सातत्याने वाहते, तिच्या तळाशी जलजीव वस्ती असते, वनस्पती असतात, तसेच समुद्राचे, मागे पुढे, ने आण सुरूच, मीठ तय्यार करण्याची प्रक्रिया सातत्याने आणि जीवसृष्टी असते ते वेगळंच, खूप कुटुंब पोसतो तो समुद्र. झाडे हालतात, ऑक्सिजन, कार्बोन डाय ऑक्साईड वैगरेंना मदत करतात. थोडक्यात काय, खास असं काहीच टेकडी करत नाही, बाकीच्यांसारखं, हा दोन पायांच्या बुद्धिवान लोकांचा पवित्रा. 


आधीच्या काळी स्त्रिया उत्तम घर चालवायच्या, प्रत्येकाच्या प्रकृतीची त्यामुळे काळजी घेतली जायची. सातत्याने घर एके घर आणि स्वयंपाकघर हे काय ते त्यांचे स्थान, काम आणि ओळख होती. खूप कमी स्त्रिया कामावर जायच्या. सध्या सगळ्याच बहुतेक बाहेर पडल्या आहेत आणि स्वतःची ओढाताण करून घेत आहेत. कारण सासरच्यांना सून कमावणारी हवी आणि घरचं सगळं करणारी देखील. ती बाहेर पडून अर्थाअर्थी स्वयंसिद्धा झाली कारण मागील पिढीपासून तिला ऐकावं लागलं कि तू काय रिकामी, घरी काय काम असतं? कमवायची अक्कल नाही? बाहेर जाऊन काम करणं म्हणजे काय ठाऊक आहे का? ई. आणि अनेक असे वाक्य. अहो पण २०२४ मधे कमावून आणणाऱ्या स्त्रीला सुद्धा हे ऐकावं लागतं म्हणजे आश्चर्यच आहे, नाही का? ह्या सगळ्या पार्श्वभूमी वरून  मला असं वाटतंय कि रिकामी ती जशी टेकडी म्हणून हा जोडशब्द तय्यार झाला असावा. कार्यक्षम काय तो "तो", डोंगर पण तो, मग ह्या दोघांचा मिळून का नाही शब्द  तय्यार झाला? हे मला ठाऊक नाही.  कधी कधी रिकामटेकडा असा शब्द कानावर पडतो, पण जास्त करून तिच्या बद्दल जास्त बोललं जातं. जगातल्या सर्व टेकड्यांना आता अशी विनंती आहे कि तुम्ही जे काही कार्य करता, तुमचा हा निसर्ग, माणसे, सृष्टी ई. चालवण्यात जो वाटा आहे त्याबद्दल बोलत्या व्हा. म्हणजे कदाचित तुमच्या पायथ्याशी, किंवा तुमच्या पायाची जिला सर आहे तिला देखील कदाचित मान मिळेल, मिळवावा लागणार नाही, व्यर्थ ऐकून घ्यावं लागणार नाही.  बघा काय करता येतंय ते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...