मंगळवार, २८ मे, २०२४

नागपूरकरांचे नवखे दर्शन


माझ्या संत्रा नगरीचा मला अभिमान होता, आहे आणि सदोदित राहील. पूर्वीचे नागपूरकर कसे होते हे जगमान्य होतं आणि ठाऊक होतं. तिथल्या पाण्याचा रंग अनोखाच आणि ढंग देखील. तिथल्या हवेत आणि पाण्यात जी काय जादू आहे, ती अनोखीच, पट्टाकिनी लक्षात येतेच. "कालाय तस्मै नमः", म्हणतात ते काही वावगं नाहीच. काळ आपला महिमा दाखवतोच. त्याची जादू निराळी आहेच. आणि "बदल हाच तर स्थिर आहे" ना सगळ्यात. जुने आणि असली नागपूरकर पांगलेत इकडे तिकडे, नोकरी निमित्य किंवा इतर कारणांनी. त्यामुळे माझ्या लाडक्या संत्रा नगरीत एक पोकळी निर्माण झाली आहे आणि ती दृश्य आहे. जे नागपूरकर पांगले आहेत ते नागपुरी हवाहवासा बाणा इतरत्र पसरवत आहेत. म्हणजे उत्तमोत्तम गूण बाकिच्यांना पोचत आहेत त्या अनोख्या मातीचे. आत्तापर्यंत तरी बघितलं, ऐकलं, सानिद्यात आलं कि कळत होतं कि हि व्यक्ती नक्कीच नागपूरची आहे. पण एवढ्यात मला एक नवीन नवखा अनुभव आला आणि थोडासा हादरा बसला. मुळचे एक नागपूरकर कुटुंबीय सध्या दुसऱ्या ठिकाणी स्थायिक आहेत. माझी त्यांची अनेक वर्षांची ओळख. जेव्हा यथोचित ठरलं भेटायचं तेव्हा का कुणास ठाऊक मनात पाल चुकचुकलीच पण तरी देखील म्हटलं नाही असं होणं शक्य नाही. पहिला धक्का बसला जेव्हा उण्ग्यासारखा पत्ता पाठविला. पोचले तर घर कुठे सापडतंय. आपलं घर खोपच्यात आहे म्हटल्यावर जरा आजूबाजूची माहिती, किंवा खूण द्यावी का नाही? म्हटलं असो. मग पोचले घरी, एका खुर्चीचं ऑफिस आहे तेथे बसलो, मोघम बोललो. आधीच काय काम आहे ते कळवलं होतं, मला वाटलं ते तयारीने बसतील, उत्तरे तय्यार ठेवतील मस्त भन्नाट काही तरी ऐकायला मिळेल, पण छे. मग कसा तरी पाण्याचा पेला आला समोर. आणि हो विसरलेच. काही किलोमीटर प्रवास झाल्यावर मला अचानक फोन आला कि "आमच्याकडेच आज नाश्ता करायचा हं". मी सांगितलं कि मी इथपर्यंत पोचले आहे आणि घरूनच व्यवस्थित खाऊन निघाले आहे.  मनात म्हटलं हि काय वेळ आहे आमंत्रण द्यायची. कित्ती दिवस आधीच ठरलं होतं तेव्हा नागपुरी आग्रह गेला कुठे? असो. कसं तरी बोलणं झालं, मग लहान मुलांना वाढतो तेवढे आजाऱ्याचे पोहे आले पुढ्यात, आणि त्या सोबत फूस झालेली राजगिरा वडिचा तुकडा. आजाऱ्यासाठी खास तय्यार केलेले, अगदी काहीही न बघितलेले असे पोहे, म्हणजे अगदी हळद, मीठ, तिखट सुद्धा विसरलेले. असो. रसविरहित जे काही बोलणे सुरु होते ते एकतर्फी होते, मध्ये फक्त काही हुंकार किंवा छोटीशी वाक्ये येत होती, पोहे खाता खाता. त्यांनी अक्षरशः डोळे मिटण्याच्या आत ते पोहे फस्त पण केले. आणि मग दोघे आपआपले फोन बघायला लागले, चाळवाचाळव करायला लागले. ती देहबोली हे स्पष्ट दर्शवत, खुणावत होती मला कि कधी निघताय? माझं नशीब बलवत्तर त्यामुळे मला पट्टाकिनी उबेर मिळाली. गेट पर्यंत सोडायला आले तेव्हा मी म्हटलं कि या आता माझ्या घरी, भेटू आणि भेटत राहिलं पाहिजे. घरी या, कारण माझ्या आजूबाजूला आपल्या दोघांच्या ओळखीचे अनेक जण राहतात. मी सर्वानांच बोलावून घेते. पण "तू पुन्हा ये निवांत, सावकाश, जेवून गेली असतीस तर बरं वाटलं असतं, किंवा काय हे धावपळीत येणं, पुढल्यावेळी जरा वेळ काढून ये..... ह्या पैकी काही म्हणजे काही च कानावर पडले नाही. टॅक्सी वाळल्यावर मी हात काढून टाटा करणार तर बघते काय गेटपाशी कोणीच नाही हो. घरात सुद्धा शिरले नाही मी, घर दाखवतो ना आपण फिरवून, ते नाही. चार घरं सोडून अजून एक दोघांच्या ओळखीचे राहतात. आधी आमचं एक दोनदा बोलणं झालं होतं फोन वर तेव्हा मी इच्छा व्यक्त केली होती कि अनायासे मी इतक्या दूर येते आहे तर एकाच ठिकाणी दोघांना भेटू. त्याची पण काहीही व्यवस्था केली नाही, सुतवाच्य पण नाही हो. मला वाटलं कि मला सरप्राईझ देतील दोन्ही कुटुंब, पण अगदीच नाही.  कमाल कमाल आहे.  इतके कोरडे नागपूरकर हे अस्वस्थ करणारं आहे मला. कसं शक्य आहे हे? मी स्वप्न तर नाही ना बघितलं? वाईट स्वप्न? पण नाही, टॅक्सी ला नोटा दिल्या मी दोन्ही वेळा, कारण भरपूर भाडं झालं, अंतर लांब असल्यामुळे. असो. 


माझे बाबा म्हणतात तसे, प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. प्रत्येक म्हणजे फक्त माणूसच नाही, प्रसंग देखील. शिकण्यासारखं म्हणजे प्रत्येक वेळी काय करायचं, किंवा काय घ्यायचं असंच नाही तर काय करायचं नाही हे पण प्रकर्षाने शिकण्यासारखे आहे. हा प्रसंग मला नागपूरकर असे वागूच शकत नाही, किंवा कोणीही घरी बोलावून असे वर्तन करू नये हे शिकवून गेलं नक्को. मस्त धडा मिळाला. खूप समाधान मिळालं कारण नकळत मला अगदी आदल्या दिवशी झालेली अजून एका नागपूर च्या कुटुंबाकडून आवभगत आठवली आणि इतर अनेक अत्योत्तम असे प्रसंग आठवले, आणि खूप जणांशी मनःपूर्वक जोडले गेले, जास्त प्रकर्षाने. माझी नवीन भागात मस्त मोठ्ठी लांब चक्कर झाली. खूप नवनवीन रस्त्यांवरून भटकंती करून आले, मनसोक्त, कुठलीही घाई नाही, घड्याळाच्या काट्यांवर पळायचे नाही, शोरूम मधून नुकत्याच, अगदी माझ्यासाठी बाहेर पडल्या होत्या कि काय अश्या कोऱ्या करकरीत गाड्या दोन्ही वेळा लाभल्या. अजून काय हवंय मला. आणि हो, माझ्या हातून होणारे पोहे कित्ती म्हणजे कित्ती चविष्ट, अप्रतिम, भन्नाट आणि सर्वगुणसंपन्न असतात हे नव्याने कळले, शिक्कामोर्तब झाला. अहाहा च. 


पुण्याच्या पाण्याचा असर होता, कि घरी काही गडबड होती, केमिकल लोचा झाला होता का? माहित नाही. पण जे काही असेल ते सगळ्यातून निघून पुन्हा एकदा संत्रा नगरी सारखे सर्वांशी वागोत हि सदिच्छा.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...