मी काल माझ्या एका खास, आवडीच्या आणि सूर जुळलेल्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. सर्व भेटीच्या आठवणी सामावून घेत परत निघाले. सातची वेळ साधारण त्यामुळे रस्त्यावर बऱ्याच गाड्या होत्या, माणसं होती, चाकरमानी पण असतील त्यात कदाचित. बरेच ठिकाणी थांबत थांबत / थबकत थबकत माझी टॅक्सी पुढे जात होती. त्यामुळे मावळता सूर्यामुळे आकाशात निर्माण झालेली जगावेगळी रंगबीरंगी नक्षी भन्नाट दिसली, भावली. भव्य रस्ते, मोठ्ठी दुकाने ई. बघतांना एक प्रकर्षाने जाणवले. एका रांगेत काही दुकाने होती त्यात कारागीर कपाटे तय्यार करत होती. काही तय्यार झालेली कपाटे रस्त्यावर, म्हणजे दुकानाच्या दृश्य भागी मांडून ठेवली होती. लक्ष वेधून घेतील असे काही माझ्या चार डोळ्यांना दिसले. मी आजतागायत फक्त भल्या मोठ्या आकाराची महागडी मार्बलची फरशी बघितली होती. पण हे म्हणजे माझ्यासाठी तरी वेगळं होतं. हुबेहूब त्याच मार्बल ची प्रतिकृती होती ती. तीच रचना, मूळ कल्पनेचा आराखडा जसाच्या तस्सा उतरवला होता, पण अर्थात सनमाइका डिज़ाइन स्वरूपात. जबरदस्तच. दिसायलाच इतकं वेगळं वाटलं कि ज्यांना खोलीची भव्यता दाखवायची आहे, किंवा फर्निचर चं वेगळेपण दाखवायचं नाही आहे, लपवायचं आहे अश्यांसाठी खास केलं होतं असं वाटलं. काही जण फरश्या पण भिंतींवर लावतात ना (तश्या वेगळ्या पण मिळतात) तसेच काहीसे भासले दुरून बघते वेळी पण ते प्रत्यक्षात मात्र कपाट होते. इतके हुबेहूब उभे करणे हि कमाल आहे आणि मी पहिल्यांदा हे बघितल्यामुळे मला वाटल्याशिवाय राहिलं नाहीच कि असं पण कपाट होऊ शकतं हे कसं काय कोणाच्या डोक्यात आलं असणारं?
माझ्या विद्यालय / महाविद्यालयाच्या दिवसात नागपुरात एक वेगळ्या धाटणीतली सोसायटी बांधली गेली होती आणि ती माझ्या बघण्यात पण आली, जंतरमंतर. जमीन आणि भिंत एकाच रंगसंगतीचे म्हणजे भुलभुलैय्या सारखं अनुभवता येईल त्या घरात. माझी लेक नेहेमीच म्हणते मला, काहीही झालं, कुठेही गेलीस तरी नागपूर कसं नजरेस पडतं तुझ्या, नेहेमीच, सदोदित?
एकंदरीत काल माझं बाहेर पडणं सार्थकी ठरलं. "इट वॉज वर्थ इट". पुन्हा एकदा लहान मुलं झाल्यासारखं वाटलं मला, माझ्या बाबांच्या गाडीतून चक्कर मारतांना जगावेगळा अनुभव मिळायचा अगदी तस्सा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा