मनमोकळा संवाद आणि हलका फुलका हसण्याचा आवाज दारावरची पाटी वाचतांनाच आला. दार उघडले तर काय? आल्हाददायक गारेगार वातावरण. निश्चितच ते वातानुकुलीत यंत्राने उगाचच थंड करायची म्हणून हवा गार केली नव्हती हे निश्चित समजले. मी पहिल्यांदा हजेरी लावली होती त्यामुळे मी पूर्णपणे अनभिन्य होते. आवाजावरून लक्षात आले कि हा कूलर आहे, चार डोळ्यांनी बघितल्यावर माझे नागपूर उभे ठाकले असे दृश्य दिसले. तो डेसर्ट कूलर होता, खोली बाहेर मांडलेला, स्थानापन्न झालेला असा, क्या बात है? अपार्टमेंट मधे हे मी कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच अनुभवलं प्रत्यक्ष, अगदी तिथल्या मंडळींसारखे, वेगळे, उत्कृष्ट आणि भन्नाट. ती माझ्या माहेरचीच / माहेरच्या गावचीच मंडळी होती, "नो वंडर" त्यामुळेच अशी सुरवात झाली आमच्या भेटीची, जी खूप महिन्यांनी होत होती. ठरतंच नव्हतं काही कारणांमुळे. आणि मग काय विचारता, त्या गप्पा अघळ पघळ अश्या, ते सुबक सुंदर घर, दिलखुलास माणसे, चविष्ट नाश्ता आणि अनेक विषयांची देवाण घेवाण त्या तासात झालेली. असं फक्त आमच्या नागपूरकरांचंच होऊ शकतं हे निश्चित. कुठलेही टोकाचे विषय नाहीत, कोणा एका बद्दल पाल्हाळ लावले नाही, उणे-दुणे तर नाहीच नाही, अनेकविध विषयांवर मस्त चर्चा झाली. नवीन मंडळींची थोडक्यात ओळख झाली. पट्टाकिनी बरी झालेली, अगदी पहिल्यासारखी फ्रेश, उत्साहपूर्व / उल्हासित मैत्रीण बघून, बोलून, तिच्या सोबत वेळ घालवून एक वेगळी पर्वणी लाभली /गाठली असं वाटलं.
"चेरी ऑन केक" म्हणजे वातावरण मस्त होतं, गर्मी विशेष नव्हती, दोन्ही वेळा उत्कृष्ट गाड्या आणि वाहनचालक मिळाले. माझ्या घरापासून साधारण अर्धा तास लागला जायला आणि यायला. त्या बघत माझं फारसं काय नाहीच जाणं होत. त्यामुळे मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं, माहेरी जातांना कसा उत्साह असतो तसं झालं. जातांना एका बाजूचे नवनवीन दुकानं, गगनचुंबी इमारती, सजलेले / नटलेले रस्ते, वेगळं दृश्य बघत बघत, अत्यानंद घेत मी पोचले, मस्त हवेशीर आणि मोकळ्या जागी वसलेल्या सोसायटीत. आणि येतांना रस्त्याची दुसरी तितक्याच ताकदीची दुसरी बाजू होतीच. मोठ्ठी चक्कर अनुभवता आली. काय ती भव्य दिव्य फर्निचर ची दुकाने, ओळीने, दुतर्फा, अबब च. भले मोठे रस्ते काय, उड्डाणपुलं काय, बागबगीचे काय, अहाहा च.
एकंदरीतच अनुभवलेला नागपुरी बाणा (मधुर रसाळ नेहेमीच) वाखाणण्यासारखाच होता. माझ्या माहेरच्या गावचं पाणीच वेगळं आहे, त्यामुळे अशीच मंडळी असणार, खुलल्या स्वभावाची, अनोळखी व्यक्तीला पण आपलंस करून घेणारी अशी, पुन्हा पुन्हा भेटावसं वाटणारी अशी. क्या बात है? सहीच.
"अश्या भेटी होती आणिक स्मृती ठेवुनी / देऊनी जाती".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा