वैविध्य प्रकारच्या रांगोळ्या काढता येतात आणि आताशा तर तंत्रज्ञानामुळे जगभरातल्या किंवा भारतातल्या अनेक भागांमधून कश्या पद्धतीच्या रांगोळ्या काढल्या जातात हे घर बसल्या समजतं. म्हणतात ना प्रत्येक मैलावर संस्कृती बदलते, अगदी तसेच आहे रांगोळी बाबत देखील.
आताशा मी माझ्या खूप साऱ्या मैत्रिणीच्या हातावर दररोज न चुकता स्टार काढते, कधी आईस्क्रीम रेघोटल्या जाते तर कधी आणखीन काही. ह्या सगळ्या मैत्रिणी वय वर्ष १-२ च्या दरम्यान आहे. खूप म्हणजे खूपच खुश होतात त्या स्टार बघून. त्यांच्या हाताच्या पृष्ठभागावर मोठ्ठा स्टार काढणे म्हणजे आव्हानात्मकच आहे मला. पण मी ते खुबीने निभावतांना मला काही खास जाणवले. मग माझे माझ्या हाताकडे सहज लक्ष गेले आणि माझ्या आईचे हात आठवले. किंवा आईच्या पिढीच्या बऱ्याच लोकांचे हात डोळ्यासमोर उभे ठाकले. पिल्ल्यांच्या तळहातावर अगदी पुसटश्या रेषा असाव्यात. कोणीच त्या कडे बघत नाहीच, किंवा त्या कडे लक्ष जात नाही. तेव्हा फक्त बोबडे बोल, डुगूडुगू चालणे, प्रतिसाद देणे ह्यावर जास्त लक्ष केंद्रित असते. पण त्यांच्या पिटुकल्या तळहातावर रेषा असणारच. पृष्ठभागावर मात्र काहीही नसते, खूपच मऊ, मुलायम अशी गोंडस त्वचा. बास. एकदम क्रिस्टल क्लियर.
मध्यम वयातल्या लोकांच्या हातावर म्हणजे फक्त मनगटापर्यंत नीट निरखून बघितले तर मस्त ठिपके दिसतात, काही आकृत्या, आकार, नक्षीकाम, रचना नकीच दृष्टीस पडतात. बघा एकदा नीट. आणि छोटासा तो हाताचा पृष्ठभाग, पण, विविध आकाराच्या रचना आढळतात तेथे. त्यात कातडी देखील वेगळ्याच मऊ पद्धतीची आणि घट्ट पणे हाडांना न चिकटलेली, थोडीशी दूर आणि जास्त प्रमाणात आहे असं दर्शवणारी. त्यामुळे मग सगळ्याच नक्षीकामत भर पडते, थोडे अजून वेगळे भासते ते चित्र, नैसर्गिक रित्या तय्यार झालेले. छोट्या, मोठ्या, लांब, बारीक सारीक रेघा, शीरा आणि शिवाय ठिपके ह्या मुळे त्या रांगोळीला बघावेसे वाटते. आणि प्रत्येकाच्या हातावर एक वेगळीच तऱ्हा नक्कीच नजरेस पडेल ह्यात शंकाच नाही.
हि झाली साधी नैसर्गिक पद्धत. पण त्याला जर आधुनिकतेचा साज चढला तर मग काही वेगळं चित्र उभे ठाकेल डोळ्यासमोर. भरपूर आणि नियमित मालिश केलेले हात, सतत पाण्यात असलेले हात, कष्टकरी हात असे विविध प्रकार असणार.
आजीची हातावरची कातडी तर वेगळाच बहर आणते ह्या रांगोळी तत्सम कलाकृतीला. तिचा स्पर्श आणि परिणाम (३D) देखील अनोखा असतो.
तळहातावरच्या आणि पायावरची रांगोळी व्यक्तिमत्व कथित करते म्हणे. हे सांगणारा मात्र फार मोठा साधक असला पाहिजे. ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही ते. "त्याची" कृपा प्रसाद साध्य झालेला असा परिपूर्ण साधक, जो सहज असणे आणि सापडणे दुर्मिळच. त्यामुळे आपण फक्त पृष्ठभागावर मन, डोळे केंद्रित करू या, आणि त्याचा आनंद उपभोगूयात.
बघा म्हणजे गम्मत म्हणून माझ्या पिटुकल्या मैत्रिणीच्या हातावर विविध रंगांच्या पेनाने काढलेले स्टार मला काय काय देऊन गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा