न्यू नॉर्मल डेज पासून तर प्रत्येक जण पारंपरिक, भारतीय, आंतरदेशीय आणि नवीन पदार्थ तय्यार करण्यात अगदी निपूण झाले आहेत. यू ट्यूब अगदी दुथडी भरून वाहतं आहे त्यामुळे. वयाची काळजी न करता, प्रत्येक भाषेत, काही पदार्थ समजावून सांगत सांगत, तर इतर जण फक्त सांगेतीक पार्श्वभूमीवर पदार्थ करून दाखवणे सुरु आहे. बहुतांशी सगळेच जणांची एक खासियत आहे. जेव्हा ते काय काय घालायचं ते सांगतात आणि जर घटक पदार्थांमधे आलं असलं तर "एक इंच तुकडा" हे जसं काही जगमान्य प्रमाण आहे. एक इंच आल्याचा तुकडा? प्रत्येक वेळी? का? कशासाठी? थोडसं आलं किसून थंडीत चहात, काढीत, उपम्यात आणि मूग डाळीचे डोसे केले तर थोडेसे, बास. डोक्यावरून पाणी गेलं तर काही मसालेदार वाटणामधे थोडीशी चव बरी लागते. पण उठसुठ "एक इंच तुकडा" है माझ्या दृष्टीने जरा अती होतंय. इतक्या आल्याची गरज नाहीच. आणि हो ते देखील चटणीच्या मिक्सर च्या भांड्यात वाटलेली चटणी आणि त्यात इतक्या प्रमाणात आलं हे शरीरातील उष्णता वाढण्याचं एक महत्वाचं कारण आहे. आतून प्रत्येकाने जरा थंड राहायचा प्रयत्न केला तर गरमी जाणवणार नाही. यू ट्यूब दाखवलं आहे म्हणून ते चांगलचं आहे हे कशावरून? तुम्ही बघा ना ती पदार्थ तय्यार करण्याची पद्धत आणि तुमच्या हिशोबाने मग तय्यार करा. तुम्ही कुठे राहता, तुम्हाला काय सोसत, तुमची तब्बेत किंवा प्रकृतीचा प्रकार काय आहे, आणि मग तोच तुम्हाला रुचेल असा, तुमचे व्हर्जन तय्यार होईल, जे त्रासदायक ठरणार नाही. स्वतः ओढवून घेऊ नका काहीच. तोच पदार्थ नाही, पण बाकी काय काय पोटात गेलंय त्या दिवशी, दिवसाची वेळ काय आहे, आपण व्यायाम किती करतो, कामाची आपल्या पद्धत काय आहे, जेवणाच्या वेळेची शिस्त पाळली जाते का? असं थोडक्यात लक्षात आणा आणि मग ग्रहण करा. करू नका असं नाही पण "अती तेथे माती" हे विसरू नका. निसर्गाला, गर्मीला, कामाला आणि इतर कोणालाच दोश देऊ नका. काय खावं, काय सेवन करावं हे जितकं जरुरीचं आहे तितकंच काय वर्ज करावं हे जास्त अत्यावश्यक आहे समजणं. "प्रिव्हेंशन इज बेटर द्यान क्युअर". बळी पडू नका, आहारी जाऊ नका, सोसेल तेच पोटात ढकला. "अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणं नोहे... ".
आणि सांगणारे फक्त त्या आल्यावर थांबत नाहीत हो, भरपूर गरम मसाला घालतात, चटपटीत पणा यावा म्हणून आमचूर नाही तर चाट मसाला मिसळवतात, शिवाय भरपूर तिखट ई. अरे काय चाललंय काय? एवढं तिखट आणि मसालेदार सतत खाऊन त्या पोटाचं, आतड्यांचं काय होणार, कित्ती कामाला लावावं फुकट पचनशक्ती / पचनसंस्था काम करते आहे म्हणून? बरं नाही ते.
आवडीनुसार, स्वादानुसार मीठ फक्त का घालायचं प्रत्येक पदार्थांमधे? प्रत्येक कृती बघा, एक तर सरते शेवटी मीठाची बारी येते आणि फक्त त्यालाच स्वादानुसार, आवडीनुसार ह्या उपाध्या दिल्या जातात. किंबहुना हे प्रत्येक घटकाला लागू आहेच. एक चेतावणी दिली पाहिजे किंवा तळटीप द्यायलाच हवी, कि ह्या कृतीत दाखवलेले प्रमाण हे करणाऱ्याच्या आवडीचे आहे. दर्शकांनी त्यांच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावं, किंवा तत्सम. हि अशी तळटीप नाही दाखवली तरी आपल्याला आपली प्रकृती माहिती आहे आणि आताशा सर्वच जण सुशिक्षित, शिक्षित, निष्णात, समंजस, जाणते आहेतच ना. मग?
तात्पर्य असं कि छोटासा तुकडा, किसून काही भाग, आलं पूर्णपणे नाही घातलं तरी, अर्धा इंच, फक्त साल असे फेरबदल करा आणि तो तुमचा पदार्थ म्हणून चाखा यथोचित, आनंद उपभोगा, त्रास होऊ देऊ नका. हॅप्पी कूकिंग.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा