मंगळवार, १४ मे, २०२४

इन साईड-आऊट

 माझी आणि वर्णिकांची नाळच जोडली होती आणि आहे म्हणून असेल कदाचित पण ती मला माझ्यापेक्षा जास्त ओळखते. अगदी इंग्लिश मधे म्हणतात ना "इन साईड-आऊट" अगदी तसेच. 


मला जेव्हा पासून घन पदार्थांची ओळख झाली, चव घेऊन खाता येऊ लागले तसे मला आठवते कि खाऊ येण्याचा मोठा ओघ होता आणि नेहेमी असायचा. आत्ता समजतंय कि मी इतकी मोठी खव्वयी कशी झाले ते आणि लहानपणी इतकी हत्ती कशी होते ते. 


अनेक पिढ्यांची परंपरा असलेले, एका फार नावाजलेल्या धार्मिक संस्थेत गुरुजी असणारे एक काका आमच्याकडे नियमित यायचे. त्याची अनेक करणे होती. एक म्हणजे देऊळ आणि आमचे घर ह्यातले अंतर कमी होते, आमच्या अंगणात असंख्य प्रकारची फुले येत होती ती पूजेला नेण्याकरता ई. प्रत्येक खेपेला ते आवर्जून माझ्यासाठी खास  जर्दाळू आणायचेच. का? माहित नाही. त्या सुकामेव्याचा स्वाद इतका जगावेगळा होता कि ज्याचं नाव ते. अगदी आशिर्वादात्मक, प्रेमाने भरपूर, अत्यानंदाने दिलेला, स्वादिष्ट आणि परिपूर्ण. आधी आई त्याचे तुकडे करून द्यायची, बदाम फोडून द्यायची, माझे दात मजबूत झाल्यावर मग मी ते सगळं हाती घेतलं.  त्या गुरुजींनी कधी एक किंवा दोन जर्दाळू दिले नाहीत मला, भरपूर द्यायचे, खूप दिवस मी ते फस्त करण्यात घालवत असे मग. तेव्हा पासून जे ह्या फळाची चटक लागली म्हणून सांगते ती आज तागायत टिकून आहे. 


मधे हैदराबादला काही दिवसांच्या वास्तव्यात समजले कि "खुबानी का मीठा" हा पदार्थ पण जर्दाळू पासून तय्यार करतात. तो देखील मला खूप म्हणजे खूपच भावाला.  हे काय कमी होते तर काल मला जगावेगळा अनुभव दिला माझ्या वार्णिकाने. कुठून शोधून काढलं माहित नाही, पण मला न सांगता, न विचारता एक भन्नाट गारेगार चा कप दिला कि हातात. चव घेऊन बघितली तर उडालेच. जर्दाळू आईसक्रीम होते ते. मी स्वप्नात देखील असं होईल असा विचार केला नव्हता. क्या बात है? एवढीशी नाही तर तिचं लक्ष बघा. आईला काय आवडतं ते बरोबर आलं कि आणलंच / खाऊ घातलंच मला आवर्जून. सहीच. तिच्या इतक्या सगळ्या व्यापात माझ्या आवडीचं ऑर्डर करून पुढ्यात मांडणं म्हणजे कमाल आहे. माझ्या साठी फार मोठी पर्वणी होती ती काल. काय मनापासून तय्यार केलंय ते गारेगार हो? माझ्या मते फक्त उत्कृष्ट फळांचा वापर केला आहे, कुठलीही जास्तीची गोडी त्यात घालण्याची गरज पडली नाही त्यामुळे आणि त्यात नॅचरल हा भाला मोठा ब्रँड, मग काय विचारता. तोड नाही च. ह्या गारेगार समोर बाकी सगळेच फिके. इतकी मज्जा आली म्हणून सांगते.  

जसे जर्दाळू हे फळ किंवा सुकामेवा असतो, त्याची चव, अवीट गोडी, एक नैसर्गिक अनुभव, त्याचा रंग, माउसरपणा, वैशिष्ट्यपूर्ण पणे स्थानापन्न असलेला पिटुकला चविष्ट बदाम, खूप वेळ रेंगाळणारी चव, बाह्यरूप अगदी सहज, मऊ, पण आतून कणखर / कडक तशी माझी वर्णिका. माझ्या लहानपणीपासून सुरु झालेला सिलसिला वर्णिकाच्या जाणतेपणापर्यंत टिकून आहे हे अप्रूपच आहे माझ्या दृष्टीने.  

जर्द हे पिवळ्याला सुशोभित करतं आणि पिवळा / पिवळ्याच्या विविध छटा हा मैत्रीचा खास रंग आहे. माझी आणि लेकीची एक वेगळीच खास मैत्री आहे. आळू म्हणजे गोल, कोन किंवा टोक नसलेला, ज्यामुळे तो कोणालाच बोचत नाही, टोचत नाहीच आणि त्या उपर सर्वांशी जुळवून घेतो, सर्वसामाविक, प्रसन्न, उत्साही, चैतनशील असे व्यक्तिमत्व असलेली ती. त्यामुळेच हे सगळे तिच्या हातून घडतंय, पिटुकलं आहे आकाराला, पण भन्नाट. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...