आपल्या देशात अनेक प्रथा आहेत ज्या जुन्या पिढीतले लोक, किंबहुना ज्यांना आपण सर्वश्रेष्ठ, जेष्ठ नागरीक म्हणतो ते प्रकर्षाने पळतांना दिसतात. ह्या शिवाय नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे असेल किंवा नवीन गोष्टी शिकण्याची आवड, "जमाने के साथ चलो..." अश्या प्रमाणे भरपूर नवीन पद्धती, चालीरीती, गोष्टी, पेहेराव, खानपान, भेट वस्तू, देवाण घेवाण, अपारंपरिक किंवा आधुनिक सणवार आताशा साजरे होतांना दिसतात. "न्यू नॉर्मल डेज" मधे तर लग्न सोहोळे देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने साजरे झाले. त्यामुळे खूप बदल दिसतोय. खूप प्रमाणात आजी आजोबा सोशल मिडिया वापरत आहेत, म्हणजे त्यांना बदल मान्य आहे. सातत्याने स्वयंपाक घरात वावरणारी सून ह्या पेक्षा दर महिन्याला कमावून आणणारी, एक खास हुद्दा असलेली, नाव कमावलेली / कमवत असलेली अशीच सून सर्वानांच हवी आहे.
एक खास परंपरा होती आधी कि मुलीच्या सासरी पाणी देखील प्यायचे नाही. आणि प्यायला लागलेच तर, किंवा राहायला लागले तर भरपूर प्रमाणात भरपाई करायची, त्याचे पैसे ठेऊन यायचे किंवा द्यायचे ह्या ना त्या स्वरूपात. माझ्या वडिलांनी पण पाळली होती हि परंपरा जेव्हा ते माझ्या सासरी एक रात्र / दिवस राहिले होते तेव्हा. मग मला हा ज्वलंत प्रश्न आहे कि बऱ्याचदा आपण हे वाचतो, ऐकतो कि TCS सारख्या मोठ्या कंपन्या सुद्धा बाळंतपणाचा अवधी सुट्टी म्हणून घेतला असेल एखाद्या मुलीने तर तिला परत संधी देतात, शिकवतात आणि आत्मसात करतात. ती तुमच्या वंशाच्या दिव्याला जन्म देणार असते / दिला असतो म्हणून जर बिनपगारी सुट्टी घेते तर तिला सासरची मंडळी, सासू सासरे पगार देतात? मुलाचे आई-वडिल जेव्हा मुला-सुनेच्या-नातवंडांच्या घरी राहायला येतात तेव्हा पैसे देतात? जर सुनेने काही अपरिहार्य कारणांमुळे नोकरी सोडली तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून श्रीमंत सासरे मदत करतात, तिचे मनोबल वाढवतात? ह्या सगळ्यांचे उत्तर फार मोठे नाही असेच आहे. मग ह्या सर्वश्रेष्ठ-जेष्ठ नागरिकांनी काय बदल केला स्वतःत? मग त्यांच्या वयाचा, अधिकाराचा, अनुभवाचा, जग कणभर जास्त बघितल्याचा काय फायदा? कुटुंबाचा करता श्रेष्ठ फक्त नावापुरताच? किंवा काहीच जणांना पोसणारा असा असतो का? अर्थात ह्याला अपवाद आहेत, पण अगदी बोटांवर मोजण्या इतके. नवीन तंत्रज्ञान आलं, जग अगदी जवळ आलं, खूप देश पाहून झाले, IPL पण पचवलं टेस्ट मॅच सोबत, धोती च्या ऐवजी जीन्स / ट्रॅक पॅन्ट मिरवली, देव-देव करत द्राक्षासव पचवलं / उपभोगलं, मग फक्त सुनेने काय बिघडवलं आहे? काही कुटुंबात बदल नजरेस पडतोय पण तो सर्वदूर पसरला पाहिजे लवकर. असा दुटप्पी पणा सोडून देता आला पाहिजेच. इथे फक्त पैशाची गोष्ट नाही आहे, एकंदरीत स्वभाव दर्शन आणि सततचा गोंधळ / कन्फ्युजन नजरेस पडतंय, जे घातक सिद्ध होतंय त्या माऊलीला आणि पुढील पिढीला देखील. हे थांबलं पाहिजे ताबडतोब.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा