आत्ताची जी तरुण पिढी आहे त्या विषयी माझ्या सारख्या आधिच्या शतकात जन्मलेल्या, वाढलेल्या सर्वच व्यक्तींना असे वाटते कि ह्यांचं काही खरं नाहीच. बाकी सर्व मला बोलायचे नाही पण रात्री अपरात्री जागणे म्हणजे काय ना? आणि ते देखील सातत्याने? का? कशासाठी? शिस्त अशी राहिलेली नाहीच. गेम खेळत बसत असतील नाही तर वेळ वाया घालत, बाकी येतंय काय? "लवकर निजे, नवकर उठे त्यांना आरोग्य धन संपत्ती लाभे" हे लक्षात कसं येत नाही ह्या तरुण आणि सो कॉल्ड स्मार्ट पिढीला. सर्वत्रच असे दिसून येते. ह्या अश्या सततच्या कानावर पडणाऱ्या वाक्यांनी मला काही आठवलं.
एक आणि सर्वात माझ्यासाठी महत्वाचे म्हणजे: मी अगदी सुरवातीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात वावरते आहे, मग ते अगदी छोटेसे तंत्रनिकेतन असो, इंजिनीरिंग महाविद्यालय असो, अमेरिकेतील भली मोठी युनिव्हर्सिटी, आंतराष्ट्रीय विद्यापीठे, आंतरराष्ट्रीय कंपनी असो. माझे शिकवण्याचे काम पेहेलू पाडत / पडत अविरत सुरु आहेच त्याच्या कृपेने. अश्या क्षेत्रात राहायचे म्हणजे विद्यावाचस्पती हि पदवी अत्यंत महत्वाची कारण त्याने माणूस पुन्हा एकदा, नव्याने घडतो. पण नेमकं त्याच वेळी भारतीय आणि मध्यम वर्गीय मुलगी असल्यामुळे लग्न, कार्य, मुलं हे ओघाने आलंच. ते टाळता येणं जरा मुश्किल. मग असं असतांना, म्हणजे पूर्णवेळाची नोकरी, पूर्णवेळापेक्षा मोठी जुळ्यांची जबाबदारी, घर थोडेफार आणि त्यात PhD म्हणजे तारेवरची कसरत. पण त्याने मार्ग दाखवला. मी रात्री लवकर झोपून पहाटे एक ते दीड च्या सुमारास उठायचे आणि पाच वाजेपर्यंत काम करायचे. पाच ते सहा डबे, सहा ते पावणे सात मुलांच्या शाळेची तय्यारी, ई. हि अशी माझ्या PhD ची गाथा. त्या अवीट गोड वेळी मला मम्मा हे दे, ते दे, बाहेरचे आवाज, गोंधळ, दारावरची बेल, बायका आणि त्यांचा गगनाला भिडणारा आवाज हे सगळं टाळलं जायचं. त्यामुळे काही तास लागण्या ऐवजी मिनिटात अशी कामे व्हायची, डोकं चालायचं आणि मज्जा घेता यायची.
दुसरं म्हणजे: माझी लेक निरीक्षणाअंती मला सांगते कशी एक चित्रपट बघतांना कितीदा थांबवतेस ग? सलग पाहात जा ना? रात्री सगळे निजले कि मग शांतपणे न ब्रेक घेता उपभोग घ्यायचा मम्मा. हे मला इतकं पटतं ना, कि आजचंच घ्या ना, मला सकाळची कामे, व्यायाम आटपून एक चित्रपट बघायची इच्छा झाली, तीव्र म्हणायला हरकत नाही, जसा तो चित्रपट सुरु झाला तशी दारावर मावशी हजर आणि त्यांनी जी भांडी आदळायला सुरवात केली म्हणून सांगते कि माझी इच्छा दीड तास थांबून राहिली. ते होत नाही तर लेक उठली, मग तिचे चहा पाणी गप्पा, ते होत नाही तर गाडी पुसणारा आला देवा...
आत्ता समजलं, मी लेखिका वगैरे नाहीच, पण असं मनापासून वाटतं कि एक काही तरी माझ्या हातून जर लिहायचा योग आला आहेच तर ते एका बैठकीत पूर्ण व्हावं, म्हणजे मग ती लय सांभाळली जाते.
अगदी तसेच, जे आत्ताचे विद्यार्थी आहेत, अभ्यास करणारे, कोड करून बघणारे, कायद्याचा अभ्यास करणारे, संशोधन करून पेपर लिहिणारे ई. आणि अनेक असे, ज्यांना हे सगळं करते वेळी शांतता प्रिय असेल किंवा एका जागी बसून करण्याची इच्छा असेल तर मग उपरात्रीची वेळच योग्य, नाही का?
"चेंज ऑफ वर्क इज रेस्ट" ह्या वर विश्वास ठेवून अधे मधे एखादा गेम, अगदी काही मिनिटे फक्त खेळाला तर वेगळी ऊर्जा मिळत असावी कदाचित, अर्थात आहारी न जाता.
तिसरेआणि सगळ्यात महत्वाचे: माझ्या लहानपणी किंवा कमवण्याच्या आधी त्या काळच्या आई वडिलांची एक सवय होती कि मुलांना भरपूर कामं सांगायची. तो दृष्टीस पडला रे पडला कि बास, अर्थात त्यांच्या वयाला शोभतील अशी. तेव्हा असं वाटायचं कि कामे केल्याने शिकता येतं भरपूर. नाही म्हणता येत नव्हतं मुलांना तेव्हा त्यामुळे सकाळी लवकर उठायचा शिस्ता आणि त्यानंतर ओळीने काम. काही जण आपल्याच मुलाला तुला हे जमत नाही, ते करता येत नाही, तो बघ, तिच्या कडून शिक .... अशी सरबत्ती देखील लावत असतं. हे सगळं उगाचच का ऐकायचं हा आताच्या मुलांचा पवित्रा. म्हणूनही सकाळी आई वडील, किंवा वडील असे पर्यंत डोक्यावर पांघरुणच. मला आवडली हि पद्धत. आवडली म्हटल्या पेक्षा भावली.
आधी मला असं वाटायचं कि शरीराला एक लवकर उठायची, वेळेची, खायची शिस्त पाहिजे. मग ह्या मुलांना नाही आहे का शिस्त? तर आहे ना. त्यांचे शरीर आणि सर्व यंत्रणा त्यांच्या वेळेनुसार चालते, व्यवस्थित. त्यांना भूक लागते, पचते, अजून काय हवे?
आधी व्यायाम हा रिकाम्या पोटी करावा असा बडगा असायचा. आता रात्री सुद्धा जिम दुथडी भरून वाहात असतात.
बदल हाच स्थिर असतो, हे अगदी खरं आहे.
चला तर मग नवी पहाट अनुभवूयात, किंवा कोणाची लुडबुड नको असेल तर वर सांगितल्याप्रमाणे तरी वागा नाही तर बेल बंद करा, बाईंना सुट्टी द्या आणि शांततेत चित्रपट बघा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा