माननीय सुधीर फडकेंनी गायलेले हे भक्ती गीत आहे, अनेक वर्षांपूर्वी सादर केलेलं. ह्या भक्तिगीताचा एक अजून अर्थ मला आज उमगला म्हणून हा पंक्ती प्रपंच. हे लिहितांना मी फक्त मध्यम वर्गीय लोकांबद्दल बोलते आहे ज्यांची संख्या फार मोठी आहे. काही ठिकाणं, घरं, सोसायटी सोडल्या तर बहुतांशी सर्वत्रच एक वस्तुस्थिती आढळते ती अशी कि "देवालय = देवाची खोली" वेगळी अशी कुठेही दिसत नाही. अर्थात जागा नसते, बजेट मधे बसणारी, विकली जातील अशी घरे बांधण्याकडे कल आहे आणि तो घेण्याकडे देखील. मग फर्निचर करतांना देव्हारा कुठेतरी भिंतीवर किंवा स्वयंपाकघराच्या कोनाड्यात तय्यार केला जातो. ज्याने हे घर दिलं, घर बांधण्याकरता जे कष्ट लागतात ते बहाल केले, बुद्धी दिली, शक्ती आणि युक्ती प्रदान केली, ई. साठी जागाच नाही. आधी मला हे खूप खटकत होतं पण आता नाही. आता खरं कारण समजलं ते असं कि गेले तीन दशकं घरची स्त्री बाहेर पडली आहे अर्थार्जनासाठी. मग व्यवस्थित देव, धर्म, व्रत, वैकल्ले, उपवास, पूजा, अर्चा ई. कोण करणार. मग फक्त असण्यापुरते देवांचे फोटो ठेवण्या ऐवजी नकोच ते. आधीच्या काळी होती तशी अंगणात बाग नाही, घरची फुले नाहीत, सकाळ-संध्याकाळ, सणावारी पूजा करायला शांतपणे अजिबात शक्य नाही मग त्या ऐवजी हातातले काम यथाशक्ती, मनोभावे करा, जमेल तेवढी गरजूंना मदत करा, सत्कर्म करा, गरजेला धावून जा, कोणाला दुखावू नका, कोणाचे नुकसान करू नका, कोणालाच अडवू नका, सन्मार्गाने पुढे जा नेहेमीच, विचार आणि आचार सर्वोत्तम ठेवा, नतमस्तक व्हा, तुम्हाला जे जे मिळाले आहे त्या बद्दल धन्यवाद द्या त्या देवाला किंवा सृष्टीला किंवा त्या एका सर्वोत्तम ताकदीला, बास पोचेल "त्याला" सर्वकाही. दोन हस्तक आणि एक मस्तक पुरेसे आहे. आरत्या, स्तोत्र पठण, मंत्रोच्चार ई. सर्वांचे वेगळेच महत्व आहे पण ते जर काही कारणांनी घडत नसेल दररोज तर अर्धवट करण्यापेक्षा न केलेले बरे. कदाचित म्हणूनच ह्या भक्तिगीतांचा अर्थ समजून त्या पद्धतीने वागणे जास्त महत्वाचे आहे सध्या मध्यम वर्गीयांसाठी.
मी एवढ्यातच एक नवीन नोकरी बद्दल ऐकले आहे ती म्हणजे एका सोसायटीत म्हणे एक मावशी दररोज येतात, अनेक घरांमधे जातात आणि दररोजची देवांची पूजा करतात. हि त्यांची नोकरी आहे. ठरलेल्या ठिकाणी जायचे, व्यवस्थित देवांची पूजा करायची, देवघर साफ करायचे, फुलं - पानं वाहायची आणि पुढल्या घरी जायचं. हा एक पर्याय आहे असं दिसतंय.
मी आताच एक वाक्य वाचलं, कि तुम्ही जितक्या जास्त लोकांचे, ठिकाणांचे, संपर्कात आलेल्यांचे आणि इतर सर्वांचे आभार मानला तितक्या जास्त कृतज्ञता व्यक्त करण्यासारख्या गोष्टी तुम्ही आकर्षित कराल. "the more you are thankful, the more you attract things to be thankful for". आणि हे सगळं आधी शांतपणे, स्वतःसाठी, बोलबाला न करता, मनातल्या मनात करत राहा, जेव्हा जमेल तेव्हा, त्याला काही काळ वेळ नाही. आधुनिक गुरु देखील म्हणतातच ना, प्रत्येक श्वासाचे आनंदाने स्वागत करा, आभार माना, अगदी तसेच आहे. मानसपूजा म्हणजे तरी वेगळं काय ना? बास मग करत राहाच.
https://www.aathavanitli-gani.com/Song/Dev_Devharyat_Nahi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा