बुधवार, १३ जुलै, २०२२

सुगीचे दिवस

मी शाळेत असे पर्यंत काहीही म्हणा पण कडक शिस्त घरी आणि शाळेत, अडनेड वय, जगाच्या थोडसं मागेच ई. त्यामुळे सरळ साधी राहणी माहिती होती. अर्थात आत्तासुद्धा तशीच आहे पण महाविद्यालयात गेल्यावर रंगबिरंगी कपडे, फॅशन, तुलना, थोडीशी / किंचितशी आलेली प्रगल्भता ई. मुळे बदल सहज झाले. मग डिग्री कॉलेज आणि त्यानंतर नोकरी ह्या चढत्या क्रमाने फॅशन मधे देखील तसेच चढते बदल झाले, थोडीशी रंगरंगोटी सामील झाली, म्हणजे मॅचिंग, मोठ्या आकाराच्या - प्रकारच्या टिकल्या स्थानापन्न झाल्या कपाळावर, नख पॉलिश पण उत्साहाने लावलं गेलं थोड्या प्रमाणात पण प्रत्येक ड्रेस ला शोभेल असं, मर्यादेत राहून. काही वर्षांनी आडनाव बदललं, दोन नवीन पाहुणे देखील आले आणि मग काय माझी मी संपूर्णपणे हरवले,कुठेतरी विलीन झाले असंच वाटलं मला. आत्ता तब्बल २२-२३ वर्षांनी जाग आली आहे मला आणि "पुनःश्य हरीओम" अशी फेज आली आहे आणि ती मी मनःपूर्वक मस्त एम्जॉय करते आहे. पुन्हा एकदा रंगरंगोटी सुरु झाली आहे जी कधी होईल असं स्वप्नात देखील वाटलंच नव्हतं मला. एक प्रकराची स्थिरता आली होती, नैराश्य मुळीच नाही, पण विस्मृतीत गेल्या होत्या त्या सर्व गोष्टी. आता त्यावेळी होती अगदी तशीच शांतात, उत्साह पुन्हा अनुभवत आहे मी. मलाच मी गवसले, असं म्हणायला अजिबात हरकत नाही. कदाचित मधल्या वेळात माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता मी झोकून दिले आणि आता पुन्हा गाडी रुळावर यायचा प्रयत्न करत होती तिला मी हातभार लावला. महद आश्चर्य म्हणजे वेळ काढला कि मिळतो हे देखील नव्याने समजलं मला. अजून एक फारच भन्नाट आश्चर्य म्हणजे मी अगदी प्रत्येकासारखं दोन्ही हातांच्या बोटांची नखं एकाच वेळी कापते, गेली अनेक वर्ष. पण ह्या वेळी मी फक्त माझ्या उजव्या बोटांची नखं कापली, डाव्याची नाही कारण:

१) ती एक तर वाढलीच नाहीत, किंवा हळुवार पणे वाढत आहेत

२) त्यावर मी अप्रतिम रंग चढवले आहेत

माझी नखं पण मला नकळत साथ देत आहेत, आत्ता, ह्या स्टेज ला, शब्द न उच्चारता देखील म्हणतात कसे "हो पुढे आणि कर फुल्टू एन्जॉय हे देखील दिवस". त्या नखांना माझ्या मनातलं कसं काय उमगलं कोणास ठाऊक? नखं पण अशी अफलातून साथ देतात हे मी पहिल्यांदाच अनुभवते आहे. कित्ती पिटुकली पण वाखाणण्यासारखी गोष्ट आहे ना? 

अश्याच आपल्यासोबत घडत असलेल्या चिमुकल्या गोष्टी टिपा आणि प्रत्येक क्षणाचं जमेल तेवढं सोनं कराच.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...