शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

गोल गोल फिरणारी खुर्ची

माझ्या लहानपणीची कथाच वेगळी होती, सर्वसाधारणपणे आजूबाजूला सर्वत्र एक सारखं वातावरण होत. सगळ्यांकडे बहुतांशी सारखंच असायचं, थोड्याफार फरकाने तेच. मग त्या लोखंडाच्या घडी करून ठेवता येतील अश्या खुर्च्या असो नाहीतर लाकडी स्टूल. ते स्टूल माझ्या मते अनेक वर्ष / पिढ्या चालत असलेले. अर्थात त्या काळी जे आहे त्यात आनंद मानणें, त्याच वस्तू नेहेमीकरता वापरणे आनंदाने ई. होतच. सदासर्वदा नवीन गोष्टी घेण्याची ऐपत तर नव्हतीच पण गरज पडायची नाही ते देखील होत, टिकावू वस्तू तय्यार होत असतं आणि टिकतही असतं, किंवा सातत्याने फॅशन बदलत नव्हती आणि लोक बदललेल्या फॅशन ला बळी पण पडायचे नाहीत. स्थिरता होती त्यावेळी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असो. तर आम्ही लहानाचे मोठे झालो त्या स्टूल वर आणि खुर्च्यांवर बसून च. टीव्ही वर, किंवा एखाद्या कचेरीत गोल गोल फिरणारी खुर्ची दिसली कि फार अप्रूप वाटायचं. असं मनात यायचं कि ह्या माणसाने काही तरी भलं मोठं काम केलं असणार त्यामुळे ह्याला अशी भन्नाट खुर्ची लाभली. डोळे भरून बघायचो त्या कडे एकटक. त्यावेळी अश्या खुर्च्या सर्वत्र उपलब्ध देखील नव्हत्या दुकानात, मॉल तर अस्तित्वातच नव्हते, त्यामुळे मला बसायला मिळणं अशक्यच. बाबांच्या ऑफिस मध्ये, माझ्या विद्यापीठात किंवा इतर ठिकाणी लाकडी हाताच्या खुर्च्या. त्यामुळे विषयच संपला. त्यानंतर जेव्हा जेव्हा, जिथे कुठे मला अश्या चाकाच्या खुर्चीवर बसायला मिळाले तेव्हा तेव्हा मी अगदी लहान मुलासारखा त्याचा आनंद उपभोगला. पर्वणी होती ना मला अश्या खुर्चीवर बसायला मिळणे म्हणजे. मग काय अमेरिका वारी, आंतरराष्ट्रीय विद्यापीठात नोकरी आणि बदलते दिवस ह्यामुळे आता चाकाचीच खुर्ची इतस्ततः सर्वत्र नजरेस पडते, मी पण रोज घरी दारी वापरते, पण आज देखील अधे मधे त्यावर गोल गोल फिरतेच, ते सगळे जुने दिवस आणि तो जुना प्रवास आठवून, अजूनही अगदी लहान मुलासारखे अत्यानंद होतो तो शब्दात मांडण्यासारखा नाहीच.

मला एक एक्स्पर्ट ने एकदा विचारलं / थोडसं भोसकलंच, आणि म्हणतो कसा फार बदल करावे लागतील हो, तुमचं लिंक्ड-इन वर प्रोफाइल काही जबरदस्त नाहीच. त्यावर मी स्मितहास्य करून त्यांना उत्तर दिल, कि मी एका छोट्याश्या मराठी माध्यमाच्या शाळेतून आले आहे, माझं   लिंक्ड-इन वर प्रोफाइल आहे कारण शिक्षण आणि अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यामुळे. लिंक्ड-इन वर प्रोफाइल आहे, मी माझ्या मुलीशी आणि शेकडो लोकांशी जोडलेले आहे हेच माझ्यासाठी खूप आहे, आणि त्यात भरपूर समाधान आहे.

तसेच लोखंडी खुर्ची, स्टूल ते स्वतःची चाकाची कमवलेली खुर्ची हा प्रवास सुख देऊन जाणारा आहे. चाकाची खुर्ची नसती तरी देखील काही अडलं नसतंच, पण आहे ह्याचा अभिमान आहे आणि सध्या त्याचेच दिवस देखील आहेत.

तर आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद उपभोगा, समाधान माना, नसेल तर अडू देऊ नका आणि तुमचा छोटासा प्रवास आठवा,  स्वाभिमानाने कमावलेल्या वस्तू अमोल आहेत हे लक्षात असू द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...