शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

चांगल्या हातचं

अगदी लहानपणी पासून एक वाक्य किंवा एक संकल्पना आईकडनं घरी ऐकली होती, ती म्हणजे उपवास असला आणि उपवासाचे पदार्थ करायचे असले कि चांगल्या हातचं मीठ, तिखट, जिरे वापरायचे, नेहेमीच्या पाळ्यातले नाही. आणि तो काळ किंवा माझा स्वभाव सरळ साधा. मी आपलं ऐकायचं काम करायची आणि मोठी झाले तसं ते मी पाळलं देखील. का असं करायचं? ते केल्याने काय होत? केलं नाही तर काय होत? ई. कधीच विचारलं नाही आणि आईने कधी सांगितलं पण नाही. बरं आमच्याच घरी नाही आजूबाजूला इतरत्र सर्वत्र तेच वातावरण, उपवास तपास आणि सगळं म्हणजे सगळं तेच. असो.

आज खूप वर्षांनी मी उपवासाचं पदार्थ करण्याकरिता स्वयंपाकघरात गेले आणि हा विचार सहज मनाला शिवून गेला. कारण सोप्प होत, कारण आज उपवासाचा पदार्थ सहज संध्याकाळी खायला करत होते मी, कोणाचाही उपवास नसतांना. त्यामुळे मी काही फार चांगले मीठ, तिखट घेण्याच्या भानगडीत नाही पडले. आज सकाळीच ताज सगळं पाळ्यात काढलं होत, त्यामुळे मी फक्त नजर फिरवली आणि काहीही त्यात मिक्स झालं नव्हतं म्हटलं मग चला वापरा. आणि भुका लागल्या होत्या त्यामुळे जरा घाईच होती मला. त्यामुळे भराभर करण्यासाठी केलं आणि उत्तम झालं चवीला.

त्यामुळे दोन गोष्टींचा उलगडा झाला, एक म्हणजे बाकी मसाल्याचा वास लागलेलं तिखट मीठ जर उपवासाच्या पदार्थात घातलं तर थोडीशी चव कदाचित बदलेल, कारण उपवासाचे जिन्नस तय्यार करतांना मसाले लागत नाहीतच. तो फरक स्पष्ट ठेवण्यासाठी काय ते हे अलिखित नियम. आणि दोन म्हणजे काही हॉटेल मध्ये तर मसाले मारलेले उपवासाचे जिन्नस मिळतात, भारतात काही भागात देखील असेच मसालेदार पण उपवासाचे जिन्नस घातलेले पदार्थ करण्याची पद्धत आहेच. आमच्या समोर एक कुटुंब राहायला आलं होत भाड्याने त्यांनी हे सांगितलं होत, किंबहुना एकदा असा मसाले दार उपवास पदार्थ चाखला पण होता. त्यामुळे माझे बाबा नेहेमी म्हणायचे "आपण करू ती फॅशन", तसेच "आपण करू त्याला उपवास म्हणायचा", कोण फक्त दूध घेईल, कोण फळं, कोण पाणी तर कोण बाकी खिचडी वगैरे. त्यामुळे सोय बघा, वेळेकडे लक्ष द्या, "दोन हस्तक एक मस्तक" वापरून नेहेमी नतमस्तक व्हा म्हणजे सगळं मिळवलं. उपवास आपल्या पोटाला आराम मिळावा, खाण्यात बदल व्हावा, ऋतुमानाप्रमाणे सगळं पोटात जाण्याकरता, कंदमूळ असलेला पदार्थ सेवन करता यावे म्हणून करावा. जरी त्याला अध्यात्माची जोड द्यायची झाली तरी सहज देता येईल कारण बदल म्हणून पोटभरीचा एकच पदार्थ सर्व कुटुंबासाठी होतो  आणि त्यामुळे देवाचं करायला वेळ मिळतो घरच्या आईला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...