माझ्या आधीच्या विभाग-प्रमुख हा शब्द नेहेमी वापरायच्या, त्या बद्दल ह्या आधी एका अनुकथेत लिहिलं आहे मी. जेव्हा त्या विभाग-प्रमुख होत्या तेव्हा स्नातकोत्तर विद्यार्थी प्रवेश घेत, शिकत, प्रोजेक्ट वर काम करून एक डाक्युमेंट ज्यात प्रोजेक्ट बद्दल जुजबी माहिती आहे असं देऊन निघून जात. मग आम्ही सगळ्या गाईड्स घेऊन बसत असू ते डाक्युमेंट. अक्का पेपर, जर्नल ला पाठवणे, दिग्गज सांगतील ते बदल करणे, पुन्हा जर्नल ला पाठवणे ई. = बाळंतपण त्या पेपर चे. बहुतांशी त्याच बाळंतपण पूर्ण करतंच असू आम्ही सगळ्या आणि अत्यंत आनंदाने हो.
आज पुन्हा एकदा ह्या शब्दाची आठवण झाली. कारण पण तस्सेच आहे. गेल्या ४-५ महिन्यांपासून मी नागपूरला होते नवीन इंजिनीरिंग कॉलेज स्थापन करण्यासाठी. मी तो वर फक्तच तय्यार आणि चालू इंजिनीरिंग कॉलेज मधेच काम केलं होत, त्यामुळे नवीन कॉलेज स्थापनेचा अनुभव नव्हता. अर्थात काय काय असू शकतं कॉलेज स्थापन करायला ह्याची थोडक्यात माहिती होती आणि हे पक्के माहित होते कि मला भरभक्कम साथ द्यायला सगळीच फलटण तय्यार आहेच. त्यामुळे टाकलं पाऊल / मारली उडी. एक एक नवनवीन पदर / कंगोरे उलगडत / उघडत गेले जसे जसे दिवस सरत गेले तसे. आणि सरते शेवटी उभं ठाकलंच एक नवीन बाळ = नवीन इंजिनीरिंग कॉलेज. अर्थात भली मोठी इमारत आधीच तय्यार होती, तेथील बाकीच्या कॉलेज च्या संपूर्ण लोकांचा पाठिंबा, सहवास आणि मदत तर होतीच. पण एक लक्षात आलं, कधीच कोणीच, उगाचच अनावश्यक माहिती दिली नाही, घाबरवलं तर नाहीच. त्याच वेळी आणि आता देखील मला माझ्या प्रत्यक्ष बाळंतपणाची आठवण झाली. माझी आई, सासूबाई, आणि बाकीच्या अनेक अनुभवी स्त्रिया माझ्या आजूबाजूला होत्याच पण कोणी म्हणजे कोणीच उगाच अनावश्यक माहिती दिली नाही.
अर्थात ह्या वर नमूद केलेल्या दोन्ही उदाहरणात मी स्वतःच स्वतःहून गेले, प्रत्येक नवीन दिवस नवीन / भिन्न / कधी भलतं/ तर काही वेगळंच पण उत्कृष्ट असं काही देऊन गेलं. आणि आता मला बऱ्यापैकी कल्पना आली आहे दोन्ही बाळंतपण म्हणजे काय ते.
अर्थात आताशा गूगल बाबा कडे सगळंच जरी उपलब्ध असलं तरी
१. ज्याला त्यालाच ज्याचं त्याच अनुभवावं लागत आणि जावं लागतं त्या सगळ्या फेझेस मधून, त्याला काही तरणोपाय नाहीच आणि
२. गूगल बाबावर तरी माणसं च लिहिणार ना त्यांचे त्यांचे आलेले अनुभव, आपण तसेच अनुभवू ह्याची काय खात्री बरं ? त्यामुळे संपूर्णपणे एकतर अगदी हवी तशी माहिती तंतोतंत तर गूगल काय कुठलाच बाबा देऊ शकत नाही आणि सरते शेवटी बाळंतपणाच्या त्या काही महिन्यात, त्या वेळी जगावेगळा अनुभव येतोच.
त्यामुळे जास्त "ह्याला विचार त्याला विचार" करण्यापेक्षा उडी मारायची ठरवली ना कि मग पोहुनच निघायचं, ठरवा आणि नेहेमी विजेते व्हा, दर वेळी, मग कुठलेही बाळंतपण का असेना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा