शनिवार, २९ जानेवारी, २०२२

प्रमाण / भाग / हिस्सा

कृतूमानाप्रमाणे च खाणं माहित होत मला अगदी समजायला लागल्या पासूनच, कारण तेव्हा तेच शक्य होत आणि पाळलं जायचं मनापासून सर्वत्र. गम्मत म्हणजे त्या त्या गोष्टी फक्त काही दिवसांकरताच उपलब्ध राहत असल्यामुळे खूप मज्जा करत आणि जरा जास्त प्रमाणातच खाल्ल्या जात, उत्साहानी. उदाहरणार्थ हिरव्या मटार चा सिझन असला कि मटार भात, कचोरी, आमटी,  पोह्यात आणि बाकी जमेल त्याच्यात मनसोक्त मटार घातले जात ई. आणि त्यात जर मी स्वयंपाक घरात प्रवेश केलाच चुकून काही पदार्थ करायला तर मग काय विचारू नका, कधी कधी जरा जास्त प्रेम उतू जायी आणि माझे बाबा विचारात असतं कि "तू आज कोबीत मटार घातला आहेस कि मटार मधे कोबी"?

परवा जरा पेढे बिढे घ्यावे ह्या विचाराने शिरले दुकानात आणि घ्यायला गेले होते एक वस्तू, उचलल्या अनेक. त्यात सरते शेवटी मला ज्वारी लाह्या नजरेस पडल्या आणि मी त्या घेतल्या देखील. चविष्ट च लागत आहेत त्या परतवलेल्या लाह्या पण मी जरा त्याची किंमत बघून अवाक झाले. खातांना ध्यानात आलं कि तो खरं तर ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा होता. मी काय नेहेमीप्रमाणे घाईत आणि उत्साहात ज्वारी लाह्या हे पाकिटावर वाचलं, पारदर्शक पॅकिंग असल्यामुळे दिसलं आणि मी घेतलं. बास. पण तो निघाला ज्वारी लाह्या चिवडा. अहो पण साधारणतः नेहेमीच एक चिवडा म्हणजे प्रमाण असतं प्रत्येक घटक टाकण्याचं. पण ह्यात मज्जाच होती, लाह्यात शेंगदाणे होते कि शेंगदाण्यात लाह्या हे अजिबात लक्षात येत नव्हतं. उगाच नाही त्याची किंमत इतकी जास्त होती. सर्वसाधारण पणे कुठल्याही लाह्यांची किंमत अगदी नगण्य असते, पण हा जगावेगळा महाग. तो करणारा शेंगदाण्याचा भक्त होता वाटत. मला अगदी पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय, मी एक एक लाह्या उचलून खाते आहे सध्या आणि ते वाटिभरापेक्षा जास्त साठलेले शेंगदाणे मला ह्याच्या-त्याच्यात वापरून टाकावे लागतील लवकरच. अर्थात भाजलेल्या पण मऊ लाह्या, तिखट मीठ मसाला लावलेल्या ह्यांना मज्जा म्हणून अधेमधे दाणे तोंडात येणं वेगळं आणि फक्तच असंख्य दाणे हो, देवा.

"अती तेथे माती" हि म्हण नेहेमी लक्षात ठेवा. सातत्याने समतोल सांभाळा प्रत्येक बाबतीत, फक्त खाण्याच्या नाही हो. क्रतू असो किंवा आवड "थोडक्यात गोडी" आणि प्रमाणात असावं सगळंच, "अजीर्ण होऊ देऊ नयेच", मग ते आपल्या वागण्या बोलण्याचं असेल, किंवा संबंधाच / नात्याचं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...