मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

आमूलाग्र बदल

"Paradigm Shift akka प्याराडिम शिफ्ट" ह्या छोट्याश्या विषयाला आज एका विशिष्ट्य कोनाने हात घालायचा विचार आहे माझा. कुठलीही तुलना न करता हे बदल मी येथे दर्शवणार आहे. हे बदल कदाचित गरजेचे होते, आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकून राहण्यासाठी, व्यावसायिकांची गरज म्हणून, बदलेल्या अपेक्षा आणि परिस्थिती म्हणून किंवा अजून काही.

मी जेव्हा तांत्रिक शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होते तेव्हा आम्हाला वार्षिक पद्धत होती, म्हणजे संपूर्ण वर्ष महाविद्यालयात जायचं, शिकायचं, अभ्यास करायचा, भरपूर मस्ती करायची आणि सरते शेवटी / वर्षाच्या शेवटी भरपूर अभ्यास करून परीक्षा द्यायची, इतकंच, बास. एकदा परीक्षा झाली कि मग मस्त सुट्ट्या, लांबलचक, दुसरे सत्र सुरु व्हायच्या आधी.

मग मी जेव्हा शिक्षिका म्हणून तांत्रिकी महाविद्यालयात काम करायला सुरवात केली काही वर्षांनी तेव्हा अर्धवर्ष ची सुरवात झाली. एक सत्र सहा महिने चालायचं, वर्षातून दोन परीक्षा आणि दोन सुट्ट्या देखील. ते आज तागायत सुरु आहेच बऱ्याच ठिकाणी.

मग माझं अमेरिकेत जाणं झालं आणि तेथे मला तिमाही अनुभवयाला मिळाली. पण मला अमेरिकेत प्रवेश मिळाला, उत्कृष्ट अध्यापकांकडून शिकायची सुवर्ण संधी मिळाली हे बघितल्यावर तिमाही हा नवीन प्रकार फारच उत्साहाने अंगी बाणवला मी, नकळत, सहज. अर्थात तेथील वातावरणच इतकं भव्यदिव्य होत, वेगळं होत, उत्साही होत, आणि नवीन होत कि सगळं सहज पार पडलं.

आता आली माझ्या लेकीच्या प्रवेशाची वेळ. बरेचसे महाविद्यालय आहेत पण सरतेशेवटी जे आम्ही ठरवलं त्यात तिमाही हि पद्धत होती. त्या महाविद्यालयात माझ्या ओळखीचे अनेक प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांचं हेच म्हणणं पडलं कि तिमाही हि पद्धत अवघड जाते, सतत प्रत्येक ३-४ महिन्यांनी परीक्षा येते, सुट्ट्या मिळत नाही पोटभर ई. पण केवळ बरेच अभियांत्रिकी विद्यार्थी स्नातकोत्तर शिक्षणासाठी बाहेरील देशात जाऊ इच्छितात म्हणून हा बदल घडवून आणला आहे.

मग मी माझ्या मुलीशी संवाद साधला तर म्हणते कशी, "मम्मा तू वार्षिक पद्धतीने शिकलीस, अर्धवर्ष पद्धतीत शिकवते आहेस, थोडा काळ तिमाही अनुभवलंस म्हणून तुला तुलना करता येते आहे. बरोबर? माझ्या साठी हे सगळंच नवीन आहे, मग वार्षिक काय, द्विवार्षिक काय आणि तिमाही काय? मी काहीच अनुभवलं नाही तर मग मला कुठेच अडचण येणार नाही कारण डोक्यात कुठलेही आधीचे तुलनात्मक मुद्दे / अनुभव / विचार / शंका ई. नाहीतच ना? तिमाही तर तिमाही, सगळे विद्यार्थी जसं करणार तसेच मी पण आणि पहिल्यांदाच. आणि कुठे लिहिलं आहे कि ह्या पद्धतीत अभ्यास कमी असतो / जास्त असतो, सुट्ट्या नाही तर नाही, शनिवार रविवार आहेच, शिवाय प्रवेश अभ्यास करण्यासाठी काही घडवून दाखवण्यासाठी घेत आहोत, सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी नाही ना?'. मला हा स्पष्टव्यक्तेपणा भावाला आणि हि पिढी कित्ती वेगळी आणि विचार करणारी आहे हे प्रकर्षाने जाणवलं. हो, फक्त माझी लेकचं नाही तिचे बहुतांशी सगळेच मित्र मैत्रिणी अश्याच आढळल्या मला आणि हायसं वाटलं, अभिमान वाटला.

आहे ते, आहे तस्स स्विकारा, सहज, नेहेमी आणि त्या कडे संधी म्हणून बघा, कुठलेही क्षेत्र, कुठलाही प्रकार सोप्पा नाहीच, आव्हानात्मक आहेच, पुढे चला, संपूर्ण ऊर्जा त्यातनं साजिरं गोजीरं काहीतरी भन्नाट करण्यासाठी खर्च करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...