गुरुवार, २७ जून, २०२४

चाखणे


माझ्या आई कडे घरी प्रत्येक केलेला पदार्थ हा पहिल्यांदा देवा समोर ठेवला जायचाच, काहीही झालं तरी. जसा पदार्थ तय्यार झाला कि आधी त्याच्या साठी काढून ठेवायचा, नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण खायला घ्यायचा. इतक्या वर्षाची जुनी सवय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष होती माझ्या साठी. किंबहुना तेव्हा मला एवढंच ठाऊक होतं कि हे असंच असतं सगळीकडे, कुठलाही बदल नाहीच, कारण तो आहे, महत्वाचा आहे. मग बदल असणं शक्यच नाही. ह्या अश्या पार्श्वभूमीमधून मी जेव्हा सासरी गेले तेव्हा अगदी म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट / पदार्थ होण्याआधीच तो असंख्य वेळा चाखून बघितला जायचा.  उदाहरणार्थ, काकडीची कोशिंबीर करण्याआधी काकडी तुरट किंवा वेगळ्या चवीची आहे का हे तपासलं जायचं. मग दह्याची बारी, मीठ घातल्या घातल्या, फोडणी टाकल्यावर आणि मग कूट घालून, कोथिंबीर पेरून सगळं झालं कि पुन्हा एकदा / दोनदा कमीतकमी. बाप रे, हे काय? इतकं नवल होतं माझ्यासाठी कि ज्याचं नाव ते. हे असं का करायचं हे पण आज पर्यंत समजलं नाहीच मला. भाजी, आमटी, चटणीची पण तीच गत. फक्त पोळी, भाकरी, भात चाखून बघितला नाही जायचा. असो. तेव्हा समजलं कि जैसा देश तैसा भेस. प्रत्येक १० मैलावर म्हणे संस्कृती बदलते तशी ह्यांच्या घरी सुद्धा अशी पद्धत होती, अगदी आदरपूर्वक मी हे सांगते आहे. वावगं नाही काहीच. 


पण आज प्रकर्षाने एक गमक उमगलं. मी आधी भाजी ची चव घेतली, मग आमटीची बारी होती खरी. पण नक्की चव समजण्याकरता मधेच मी कोशिंबीर चाखून पहिली. तेव्हा कुठे आमटी काय म्हणते आहे हे प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या. बघा म्हणजे घरच्या प्रत्येकाला पानात वाढण्या आधी ते चविष्ट आहे हि खात्री करण्यासाठी चाखून बघणं अत्यावश्यक आहे. "शबरीची बोरं" जशी. मस्त वाटलं मला. 


आणखीन एक. त्या काळी आधी पुरुष मंडळी तटावर बसायची आणि मग शेवटी घरच्या बायकांची बारी यायची. तो वर का पोट रिकामं ठेवायचं ना? म्हणून चवीच्या नावाने पहिल्या वाफेचे थोडेसे तोंडात टाकले तर काय बिघडलं? काहीच नाही. कच्ची काकडी सलाड म्हणून खाऊन टाकायची. म्हणजे जर ४ काकड्यांची कोशिंबीर करायची असल्यास ८ तुकडे कमीतकमी तोंडात जाऊ शकतात. मस्त आहे कि नाही हे सगळं. म्हणजे तब्बेत पण सांभाळली गेली सगळ्यांची, चविष्ट वाढलं पण गेलं आणि उशीर जर झालाच तर भूक लागून त्रास होणार नाहीच. पुरी किंवा काही गोड केलं तरी चाखून बघायला हरकत नाहीच. अगदी मनापासून आवडला मला हा अँगल. हुषार होत्या / आहेत मागील पिढीतील बायका. भन्नाटच. लगे रहो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...