गुरुवार, २० जून, २०२४

एक छोटीशी बचत


रात्रीचे जेवण वाढण्याचा कार्यक्रम सुरु होता माझ्या घरी. ताट, वाटी, पेला, चमचा ई. घेता घेता भाकरी करण्याकरता पाणी कोमट करायला घेतले आणि बाकी जिन्नस गरम करायला ठेवले.  लेकीची खास फर्माइश होती आज भरपूर भाज्या घालून वेगळा भात आणि कोशिंबीर. त्या भाताची कढई गरम करायला ठेवतांना का कुणास ठाऊक त्यावरचं झाकण मी काढून ठेवलं बाजूला. अर्थात मला डावाने / भात वाढीने ते एकदा सारखं करायचं तर होतंच आणि शिवाय फायनल चाखून पण बघायचं होतं वाढण्या आधी.  पण जसे मी ते झाकण उचलले तस्से माझ्या गालावर खुद्कन हसू उमटले. मला खूप मस्त वाटलं आणि एका नवीन गोष्टीचा जणू शोधच लागला. झाकण ठेऊन पण गरम केले जाऊ शकत होते, म्हणजे वाफेवर खरं तर छान एकसारखा तो गरम झाला असता, कदाचित मऊ पण झाला असता वगैरे.  पण झाकण उघडावे असे मला ह्या साठी वाटले कि उगाच गॅस का वाया घालवायचा ते झाकण देखील गरम करायला? काहीच उपयोग नाही ना. कढई गरम होतेच, डाव त्यात ठेवला तर तो देखील ऊर्जा ओढून घेतो किंचितशी आणि शिवाय त्यातला जिन्नस गरम करायला लागते ती इंधन वेगळेच.  "थेंबे थेंबे तळे साचे", हि जर म्हण माहिती आहे, ह्या म्हणीचं महत्व देखील ठाऊक आहे तर मग अश्याच पद्धतीने एक तर इंधनाची बचत होणार किंवा मग अगदी जेवायच्या वेळीच पदार्थ करा आणि थेट पानात वाढा. असं केल्याने स्वाद वृद्धिंगत होईल कारण पहिल्या वाफेचे चाखायला मिळेल, अतिशय पौष्टिक असे, आणि पुन्हा गरम करत बसायची गरज नाहीच. 


गरम करावे लागलेच तर फक्त पदार्थ गरम होऊ द्या, बाकी नको. मला ठाऊक आहे कि असं केल्याने काय मोठं पारितोषिक मिळणार आहे, किंवा काय अशी बचत होणार आहे? पण किंचित विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. आपल्या भारतात जवळपास सर्व मध्यम वर्गीयांच्या घरी ३-४ वेळा खायला पदार्थ तय्यार होतातच. इतक्या स्वयंपाकघरात कणाकणाने असे प्रयोग केलेत तर मज्जा येईल नक्कीच. करून बघायला काय हरकत आहे? ताबडतोब नाही, पण कधी तरी निश्चित फरक जाणवेलच. रोज करा असे म्हणत नाही, कधी तरी आणि हो झाकण, डाव, वाढायचा चमचा ई. तापलेले असते, त्यामुळे छोटासा चटका पण लागू शकतो. सगळेच पदार्थ शिजतांना झाकण ठेवूनच शिवायचे असे थोडेच आहे, विविध प्रकारे होतो स्वयंपाक. चला तर मग, मोबाईल नावाचा अवयव बाजूला ठेवून स्वयंपाक घराचा आनंद उपभोगुयात, सर्वांसोबत गप्पा मारत जेवू या, आणि गॅसची बचत देखील करून बघू या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...