बुधवार, १९ जून, २०२४

लग्नाचा बस्ता


मला माझ्या अमेरिकेने अंगावर अक्षरशः काटे आणणारे, चांगल्या अर्थाने, अनुभव दिले. ते इतके मोठे होते, ते इतके गोड होते, जगावेगळे होते, पहिल्यांदाच चाखले होते त्यामुळे त्या बद्दल काय आणि किती बोलू असं झालंय मला अक्षरश:. स्वप्नात देखील बघितलं नव्हतं मी असं काही माझ्या समोर उभं ठाकलं. माहितंच नाही, कल्पना पण नाही असे काहीसे झाले जेव्हा मी माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीसोबत एका दुकानात गेले. 


मला आज पर्यंत फक्त लग्नाचा बस्ता ठाऊक होता, ती संकल्पना म्हणजे फक्त माझ्या वेळची किंवा त्या आधीच्या पिढीची. मुलीची खरेदी म्हणजे लवाजमा नेणे, आधी तिचे महत्वाचे सगळे कपडे घेणे, तेथे काही वेळेला रुसवे फुगवे होत असतं, काही वेळा रंगांवरून, पैशावरून, पोत चांगले नाही म्हणून ई. कसे बसे मग एकदा किंवा अनेकदा जाऊन सगळे कपडे घेतले जायचे, बस्ता बांधला जायचा. मग तो पाच सवाष्णींना बोलावून व्यवस्थित रित्या उघडून दाखवला जायचा, देवा समोर ठेवला जायचा आणि मग तिच्या कपड्यांचे पुढील लागणारे अत्यावश्यक सोपस्कार होत असतं. 


माझ्या सगळ्या उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या मैत्रिणी मिळून ज्या दुकानात गेलो होतो ते बघून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. इतके कि एक तर मोठ्या आकारात उघडलेले तोंड बंद होत नव्हते आणि हात लावायची सुद्धा भीती वाटत होती. काहीही कारण नसतांना एक अनुभव म्हणून आम्ही सगळ्याजणी तेथे गेलो होतो.  स्वच्छ पेक्षा पुढे कुठला पांढऱ्या रंगाचा पर्याय असेल तर तश्या भन्नाट रंगात ते भले मोठे लग्नाचे गाऊन उत्कृष्ट पणे मांडून, रचून ठेवले होते. पांढरेच नाही  तर बाकी सगळे नाजूक, फुलांसारखे रंग देखील होते. त्या वरचे नक्षी काम, मोती, काच तत्सम वस्तू लावून केलेली सजावट वाखाणण्यासारखीच होती.  कितीही प्रयत्न केला तरी न विसरण्यासारखे दृश्य होते ते. आमच्या साठी किमती पण खास होत्या. अर्थात घ्याचंच नव्हतंच पण बघूनच अवाक व्हायला झालंच. 


मग हा असा अनुभव फक्त माझ्या पुरता मर्यादित का ठेऊ म्हणून मग मी भारतात परत आल्यावर आणि मुलं समजण्यासारखी झाल्यावर त्यांना TLC नावाच्या खास चॅनल वर प्रस्तुत केला. आई शपथ, त्यांना पण इतका तो प्रकार आवडला म्हणून सांगते. 


आज माझी मुलगी मला खास घेऊन बसली, म्हणते कशी, तुला आवडेल असं काही दाखवायचं आहे. चल बघू. "से येस टू द गाऊन" हा प्रोग्रॅम सुरु झाला आणि मी पुन्हा एकदा त्याच अमेरिकेच्या दुकानात चक्कर मारते आहे कि काय असं भासलं. होणाऱ्या नवरीला घेऊन आई, मैत्रिणी, बहिणी आणि इतर काही खास मंडळी येतात. मुलगी काही गाऊन घालून दाखवते आणि एका ला पसंती देते. इतके म्हणजे इतके सगळे खुश असतात, हसत खेळत सगळी प्रक्रिया पार पडते. क्या बात है, एक उत्कृष्ट अनुभव बस्ता बांधण्याचा.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...