रविवार, १६ जून, २०२४

करुणालय


कालच्या वृत्तपत्रात एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांचा लेख आहे. त्यात त्यांनी अनामिक अश्या घटना नमूद केल्या आहेत. त्यात थोडक्यात सांगायचे झाले तर मानसोपचार करण्याची खास शैली त्यात दिली आहे. आधीच तो रुग्ण असतो, ते देखील अदृश्य स्वरूपाचा आजार असलेला. त्यामुळे त्याला आधी उपचार सुरु झाल्यावर बोलतं करायचं आणि त्याच्या बद्दल चार शब्द चांगले बोलायचे, त्याने काय छान साध्य केलं आहे हे प्रकर्षाने आधी सांगायचं आणि मग बदल सुचवायचा त्याला किंवा त्याच्या कडून विविध गोष्टी करून घेणाऱ्याला. त्याची प्रगती ऐकली कि मनाला उभारी येते आणि तो अधिक परिश्रम घेऊन आजारातून बरा होण्याचा सचोटीने प्रयत्न करतो, आणखी जोमाने. मला हि पद्धत फार भावली. 


मला एक सांगा जो कोणी मनोरुग्ण होतो तो काही एका रात्रीत होत नसावा. त्या मागे काही ओळीने झालेल्या घटना कारणीभूत असाव्यात. माझ्या मते, जरी माझा ह्या विषयात खोल, सखोल अभ्यास नसला तरी ओळीने घटना घडण्यासाठी फक्त जवळचेच जबाबदार असणार खात्रीने. 


तसं पहिला गेलं तर "पहिली शाळा म्हणजे घर आणि पहिली शिक्षिका म्हणजे आई किंवा आई-वडिल" अशी एक म्हण आहे, आणि ते खरं देखील आहे. प्रत्येक घरच्या व्यक्तीने समोरच्याचे उणे-दुणे सातत्याने काढत राहण्यापेक्षा आधी बऱ्याच वेळी पाठीवर थाप द्यावी, गोड बोलावं किंवा टोचून तरी बोलू नये, सतत नाक खुपसू नये.  तुम्ही एखाद्याबद्दल अनेक वेळा जर व्यवस्थित बोललात, त्याला मानसिक आधार दिलात, पुढे जाण्यास प्रवृत्त केलेत तर कुठे तुम्हाला अधिकार मिळतो रागवायला, नाहीतर नाहीच. तसं करूच नये. तुम्हाला काय माहिती "अंदर कि बात". प्रत्येकासोबत काय घडतंय हे जाणून घेण्या आधीच जर तुम्ही अविचारी वागलात, सरबत्ती सुरु केलीत तर प्रत्येकाला ते निभवायला किंवा इग्नोर करायला जमत नाही, तेवढी ताकत किंवा शक्ती उरलेली नसते त्यांच्यात आणि मग अशी हि मानसिक आजाराची ठिणगी पडते. एका मराठी सिरीयल मधे दाखवलं आहे कि आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्र बसायचं एक हातात कागद घेऊन. त्या कागदावर एका किंवा अनेक कुटुंबियांचे चांगले गूण नमूद केलेले असणार आहेत. ते मोठ्याने वाचून दाखवायचे. साध्या सोप्प्या शब्दांचा वापर करायचा. मागचं काहीही ध्यानात न ठेवता.


त्या नंतर एक आधुनिक संत आहेत. त्यांनी सांगितलेली पिटुकली क्लुप्ती बघा. एक कागद आणि पेन उशा खाली ठेवायचे. त्यात आपल्या मुलांच्या चांगल्या गोष्टी, सवयी, त्यांचे तुम्हाला आवडलेले गुणधर्म ह्या सगळ्यांची यादी करायची. एकदा नाही तर भर घालत राहायची त्यात, सातत्याने, किंवा जेव्हा नवीन गूण दिसेल किंवा आठवेल तेव्हा. म्हणजे त्याचा प्रचंड उपयोग होतो आणि टिकतो. त्याने आपल्याच मुलांना दहा हत्तीचं बळ येतं, ऊर्जा मिळते, मिळत राहते. कित्ती सोप्प आहे आणि हे करायला, नाही का? मग उचला पेन आणि कागद आणि सुरु व्हा आत्ताच. 

एखादी सासू, बॉस, किंवा अजून कोणी तुम्हाला रागावलं तर ते आत धुमसत ठेऊ नका, त्याचा राग तुमच्या पेक्षा वयाने, मानाने आणि शक्तीने लहान असण्यांवर काढू नका कारण ते योग्य नाहीच. तुम्ही स्वतः शांत होण्याचं बघा. एक तर ज्यांनी तुम्हाला डिवचलं त्यांना बघून घ्या, किंवा स्मित हास्य करून तो विषय सोडून द्या, ध्यान करा, खिडकी बाहेर बघा, निसर्गाची स्तुती करा, निसर्गात रमा, चहा प्यायला जा, पाय मोकळे करा, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधे लिहा आणि डिलिट करा, कागदावर लिहा आणि फाडून टाका, काहीही करा पण शांत राहण्याचा प्रयन्त कराच. दुसऱ्यांची मदत घ्या तुम्हाला एकट्याला शांत होता येत नसेल तर. पण राग येऊ देऊ नका, आला तर दाबून टाकू नका आणि पसरवू नकाच. शांत होण्याचं सूत्र शोधून काढा तुमचं तुम्ही. 


असे छोटे छोटे बीज जर घरच्यांनी पेरले तर प्रत्येक जण कित्ती सुखी होईल बघा.


आपण कचेरीत किंवा बाहेरच्याला इतके टोकतो का सतत? नाही, अजिबात नाही. कारण तेथे घरच्या सारखे कदाचित संबंध नसतात, ते कदाचित आपले नसतात आणि असं बोलणं किंवा उणंदुणं काढणं वाईट दिसतं, आपलं आणि बाकीच्यांचं त्यात नुकसान होऊ शकतं. मग घरी हा नियम का नाही लागू पडत? किंवा घरच्यांशी नरमाईने वागून तर बघा, पाठीवर सतत थाप देऊन तर बघा तुम्हाला त्याचा किती फायदा होतो ते. पुढच्यांच सोडा, आधी तुमच्यातला बदल अनुभवा, कित्येक पटीने ऊर्जा मिळते, समाधान मिळते ते बघाच. साधा प्रयोग करायला काही पैसे लागत नाही किंवा खूप वेळ वाया जात नाही. फक्त कधी तरी शाब्बास म्हणा, सहज थोपटा, मेसेज करा, फक्त स्मित हास्य द्या, वरच्या दिशेने अंगठा दाखवा, एखादं चॉकलेट आणा, फुल आणा किंवा तुम्हाला सोयीचं ते करा, पण कराच, अगदी आत्तापासूनच. म्हणजे मग सर्वत्र सुदृढता नांदेल, निश्चितच आणि लवकरच. मानसिक त्रास होई पर्यंत ताणू नका मंडळी. 

https://www.esakal.com/saptarang/muktangan-vysanmukti-kendra-addiction-free-pune-pjp78


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...